वैमानिका, तुला सलाम!

0
20
  • अरुण जयराम कामत

वैमानिकाचे हवामानावर नियंत्रण नसते. हवाई वाहतूक नियंत्रणाच्या सूचनांकडे त्यांना दुर्लक्ष करता येत नाही. तांत्रिक सुरक्षिततेच्या बाबतीत वेळेची घाई करता येत नाही. या सगळ्या गोष्टी आपण जबाबदार प्रवासी या नात्याने समजून घ्यायला हव्यात.

आम्ही राहत असलेल्या इमारतीतील दर मजल्यावर प्रत्येकी चार सदनिका. दोन एकमेकांना खेटून तर राहिलेल्या दोन त्यांच्या समोर अशी रचना. आमच्या सदनिकेला खेटून असलेला फ्लॅट हा मूळ घरमालक दर अकरा महिन्यांसाठी भाडेपट्टी तत्त्वावर देत असतो. मागच्या वर्षीच्या म्हणजे 2025 सालातील एप्रिल महिन्यात या शेजारच्या सदनिकेत दोन तरुण मुलगे राहायला आले. चेहऱ्यावर गांभीर्य, कुणाशी बोलणं नाही, पण दिसायला रुबाबदार असे तरुण होते. आठेक दिवसांनंतर त्यांच्या युनिफॉर्मवरून आम्हाच्या लक्षात आलं की हे दोघे कुठल्यातरी विमान कंपनीत वैमानिक आहेत. एकदा ‘लिफ्ट’मध्ये त्यातील एकाची भेट झाली असता चौकशी केली तर फ्लाय 91 या विमान कंपनीत ते वैमानिक असल्याचे त्याने सांगितले. काहीसा मख्ख चेहरा करून त्याने उत्तर दिल्यामुळे आमचे संभाषण काही त्यापुढे सरकू शकले नाही.
मे महिन्यातीत शेवटच्या आठवड्यातील एका संध्याकाळी आम्ही- मी आणि सौ.- वर येताना ‘लिफ्ट’मध्ये भली मोठी सुटकेस घेतलेली साठीच्या आसपासची बाई भेटली. मी आमच्या सातव्या मजल्याचे बटण दाबताच ‘धन्यवाद, मीही सातव्या मजल्यावर चालले’ असे म्हणत त्यांनी प्रसन्न हास्य केले. जुजबी गप्पांतून त्या आमच्या शेजारी असलेल्या दोन वैमानिकांपैकी एका वैमानिकाची आई असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात-साडेसात वाजता दरवाजावरील बेल वाजली. बायकोने दरवाजा उघडला. काल भेट झालेल्या शेजारच्या त्या बाई हातात उंची परदेशी चॉकलेटस्‌‍चे बॉक्स घेऊन उभ्या होत्या. बायकोने त्यांना आत बोलविले. औपचारिक गप्पा झाल्या. ओळख झाली आणि बाई मोकळेपणी बोलू लागल्या. नवरा-बायको आणि दोन मुलगे असे त्यांचे कुटुंब. मूळ दिल्लीतील पण गेली 35 वर्षे ऑस्ट्रेलियाला स्थायिक. दोन मुलांपैकी हा मोठा- वैमानिक बनलेला- रोहन. त्याला लहानपणापासून विमान प्रवासाची आवड. त्यातूनच त्याला वैमानिक बनण्याची इच्छा निर्माण झाली. पण त्याच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांचा आणि माझा सक्त विरोध होता. जगभर विमानाने प्रवास केला पण आजही मला विमानप्रवासाची भीती वाटते. बाई अगदी निरागस चेहऱ्याने सांगत होत्या. रोहनने सिडनीत पायलट ट्रेनिंग पूर्ण केली होती. त्यानंतर वडिलांनी दिल्लीतील मित्रांमार्फत रोहनसाठी भारतात वैमानिक अनुभवासाठी प्रयत्न केले. रोहनने भारतातील सगळ्या पायलटसाठीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि तो आता फ्लाय 91 मध्ये रूजू झाला होता. त्या बाईंशी दीड-दोन तास झालेल्या गप्पांमधून एक वैमानिक बनण्यासाठीचे खडतर परिश्रम, प्रचंड आर्थिक खर्च, प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे अतूट मानसिक धैर्य असण्याची गरज याची जाणीव झाली. आणि अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, हवेत विमान उडवणाऱ्या वैमानिकांच्या कुटुंबीय मंडळीची भीतीपोटी-काळजीपोटी येणारी अस्वस्थता. हवेत उडालेलं रोहनचं विमान जमिनीवर उतरेपर्यंत मन कुठेच लागत नाही. त्या बाई हळव्या होऊन सांगत होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेल्या. माझ्या रोहनवर जरा लक्ष ठेवा असं जाताना मुद्दाम सांगून गेल्या. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला प्रचंड अपघात झाला. वैमानिक रोहनची आई सांगत होती ती गोष्ट परत एकदा आठवली. त्यानंतर प्रत्येक विमानप्रवासात वैमानिकांप्रती अधिक आदर वाटू लागला.

30 सप्टेंबर 2026 रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्या विलक्षण साहसाने वैमानिकांप्रती असणारा हा आदरभाव तर अधिकच दुणावला आहे. स्मिथ हे सहवैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही त्यांनी कॉकपिटचे दार उघडण्याची कृती केली. प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना हस्तक्षेपाची संधी मिळाली. विमानात असलेल्या अन्य दोन वैमानिकांनी कॉकपीटचा ताबा घेतला आणि सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग झाले. विमानातील 174 प्रवासी सुरक्षित राहिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. या घटनेतील सहवैमानिकाच्या हेतूचा तपास सुरू असल्याने त्याविषयी अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पण कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
रस्ता, रेल, सागर आणि विमान/हवाई हे वाहतुकीचे चार मार्ग. यातील सर्वात जास्त जोखीम असते ती हवाई वाहतुकीत. आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या सेकंदात किंवा सेंकदाच्या शतांशात निर्णय घ्यावा लागतो नाहीतर सरळ मरणाशी गाठ. नागरी हवाई वाहतुकीत तर एक-दोन नव्हे तर शेकडो जीवांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न वैमानिकांच्या त्या शंताशातील निर्णयाशी जडलेला असतो. त्यामुळे बहुतेक विमान अपघातानंतर वैमानिकाची चूक नसतानाही सर्वप्रथम खापर त्यांच्यावर फोडले जाते.

इथे ऑगस्ट 2020 मधील कोझीकोड केरळ येथील विमान अपघाताची आठवण होते. 7 ऑगस्ट 2020 रोजी कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून दुर्घटनाग्रस्त झाले. मुसळधार पाऊस, धावपट्टीची परिस्थिती, विमानाचा वेग, दृश्यमानता आणि लँडिंगच्या निर्णयाशी संबंधित अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाले. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वीच वैमानिकांवर दोषारोप करण्याची घाई प्रसारमाध्यमांनी केली होती. कोझीकोड विमानतळ हे ‘टेबलटॉप’ (डोंगराच्या माथ्यावर असलेले) आहे. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगचे दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीवरून पुढे घसरले. अपघाताच्या वेळी अंतिम क्षणात विमान धावपट्टीवरून घसरत असताना कॅप्टन साठे यांनी प्रसंगावधानामुळे विमानाचे इंजिन वेळीच बंद केले. यामुळे विमानाने पेट घेतला नाही आणि मोठी आग टळली. विमान दरीत कोसळले आणि त्याचे तीन तुकडे झाले. या अपघातात मुख्य वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे आणि सह-वैमानिक अखिलेश कुमार यांच्यासह 21 जणांचा मृत्यू झाला. परंतु, वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे विमानाला आग न लागता 160 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले. ही बाब लक्षात न घेता मृत वैमानिकांवर बेजबाबदारपणे टीका करण्यात आली होती.
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-171 विमानाला झालेली दुर्घटना ही हल्लीच्या काळातील मोठी घटना होती. या विमान अपघातात 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. कोझीकोडप्रमाणेच या दुर्घटनेत वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याविषयीही प्रश्न उपस्थित झाले. विमानाच्या प्राथमिक तपास अहवालातील कॉकपिट संभाषणाच्या उल्लेखामुळे वैमानिकांच्या कृतीविषयी चर्चा झाली. दुसरीकडे वैमानिक संघटनांनी तपासाच्या काही बाबींवर प्रश्न उपस्थित केले. वैमानिकांच्या संघटनेनुसार, बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांच्या विद्युत जाळ्यात आणि संगणक यंत्रणेत तांत्रिक त्रुटी येण्याचा इतिहास आहे. यामुळे कॉम्प्युटर सिस्टीम रीबूट झाली असावी आणि स्विच आपोआप ‘बंद’ झाले असावेत, असा त्यांचा दावा आहे. या आरोपांच्या खऱ्याखोट्या चिखलफेकीत मृत वैमानिकांच्या जवळच्या नातेवाईकांना जो मानसिक त्रास सोसावा लागतो त्याचा विचार मात्र कुणीच करीत नाही. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सनसनाटी बातमी निर्माण करण्याच्या प्रसारमाध्यमांच्या हव्यासापोटी मृतांच्या परिवारांची मात्र ससेहोलपट झाली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून सर्व अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी विमानचालनाच्या इतिहासाला कायमचं वेगळं वळण दिलं. प्रवासासाठी, व्यापारासाठी आणि माणसांना जवळ आणण्यासाठी निर्माण झालेले विमान दहशतवादाचे शस्त्र बनले. या घटनेने वैमानिकांच्या व्यवसायात आणखी एक अदृश्य जबाबदारी जोडली- आकाशातील सुरक्षिततेबरोबरच विमानाचा दहशतवादी कृत्यांसाठी गैरवापर रोखण्याची.
विमानचालनात शारीरिक तंदुरुस्तीला मोठे महत्त्व आहे. वैद्यकीय तपासण्या, दृष्टी, श्रवणशक्ती, हृदयाचे आरोग्य आणि इतर निकष काटेकोरपणे तपासले जातात. परंतु इथे मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा असतो. मानसिक स्वास्थ्य असले तरच वैमानिक निमिषार्धात योग्य निर्णय घेऊ शकतो. थकवा, नैराश्य, चिंता, वैवाहिक संघर्ष, आर्थिक अडचणी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा कामाचा असह्य ताण हे कोणत्याही माणसाच्या आयुष्यात येऊ शकतात. वैमानिकही त्याला अपवाद नाहीत. विमान कंपन्यांनीही वैमानिकाच्या मानवी क्षमतांची जाण ठेवून वैमानिकांना यंत्राप्रमाणे न वागविता माणूस म्हणून वागवणे गरजेचे आहे.

या सगळ्यात प्रवासी म्हणून आपली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडतो का, हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. विमानाला विलंब झाला की आपली अस्वस्थता वाढते. कनेक्टिंग फ्लाइट चुकण्याची चिंता, महत्त्वाची बैठक, घरातील कार्यक्रम किंवा व्यावसायिक नुकसान यामुळे प्रवासी संतप्त होतात. पण त्या विलंबामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. वैमानिकाचे हवामानावर नियंत्रण नसते. हवाई वाहतूक नियंत्रणाच्या सूचनांकडे त्यांना दुर्लक्ष करता येत नाही. तांत्रिक सुरक्षिततेच्या बाबतीत वेळेची घाई करता येत नाही. या सगळ्या गोष्टी आपण जबाबदार प्रवासी या नात्याने समजून घ्यायला हव्यात.

फ्लाय दुबई या विमानातील घटनेने एक गोष्ट निर्विवादपणे अधोरेखित केली- विमानचालनात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी निर्णायक क्षणी माणसाचे धैर्य, प्रसंगावधान आणि सहकार्य यांची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही. त्यामुळेच याच्या पुढे आपण प्रवास करताना विमानातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर (मनोमन तरी) वैमानिकांचे आभार मानायची आठवण ठेवूया!