Home बातम्या वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचे अमरसिंगांना आदेश

वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचे अमरसिंगांना आदेश

0

राज्यसभेचे खासदार व समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांना वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचे आदेश तीस हजारी न्यायालयाने काल दिले. अमरसिंग यांनी आपले वैद्यकीय अहवाल दिलेले नाहीत व स्वतःची रक्त चाचणी करण्यासही ते तयार नाहीत अशी तक्रार तिहार तुरुंगाच्या अधिकार्‍यांनी केल्याने न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सेहगल यांनी हे आदेश दिले.

खासदार सौदेबाजीप्रकरणी सध्या सिंग अटकेत असून जामीनाच्या प्रतीक्षेत आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आल्याने तोवर त्यांना तुरुंगात राहावेच लागणार आहे. सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय होईल.

आपल्याला मूत्रपिंड विकार असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असा दावा अमरसिंग यांनी केलेला आहे. परंतु सिंग यांनी आपले वैद्यकीय अहवाल दिलेले नाहीत असे तिहार तुरुंगाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अमरसिंग यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवले गेले आहे, कोठडीत ठेवण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.