वैज्ञानिक गुरु होण्याचे भारताकडे सामर्थ्य

0
127
कांपाल येथे भारतीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर पाहणी करताना राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व इतर.

भारतीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटनावेळी राज्यपालांचे प्रतिपादन
प्राचीन काळातही विज्ञान होते. विज्ञान हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या देशात विज्ञानाचे प्रचंड ज्ञान असून त्याचा गंभीरपणे वापर केल्यास भविष्यकाळात भारत हा विज्ञानक्षेत्रात जगाचा गुरु होऊ शकेल, असा दृढ विश्‍वास राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी काल व्यक्त केला.गोवा सरकार, विज्ञान भारती व गोवा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कांपाल येथे आयोजित केलेल्या भारतीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल डॉ. सिन्हा बोलत होत्या. याप्रसंगी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची विशेष उपस्थिती होती.
आध्यात्मिक व विज्ञान यांचा समन्वय असणे आवश्यक असून विज्ञान विषयातील तांत्रिक शब्दांचा सोप्या पद्धतीने प्रादेशिक भाषांमध्ये वापर केल्यास जनतेला त्याचा अधिक फायदा होणार असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज राज्यपालांनी यावेळी प्रतिपादली. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा असे सांगून भारत बलशाली होण्यासाठी संशोधनाची कास धरा असे डॉ. सिन्हा म्हणाल्या.
या विज्ञान प्रदर्शनात एकूण १९२ दालने असून भारताने प्राचीन ते अत्याधुनिक युगापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या वैभवशाली प्रगतीचा साक्षात्कार घडविण्यात आला आहे. मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान मुद्यांवर प्रदर्शनात भर देण्यात आला असून युवा संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. युवा संशोधकांची सुमारे २० दालने लक्ष वेधून घेत आहेत. युवा संशोधकांनी प्रदर्शनात मांडलेली पायर्‍यांवर यांत्रिकपणे चालणारी व्हीलचेअर, व्यक्तीच्या विचारांनुसार फिरणारे हातमोजे लक्षवेधी ठरले आहेत.
प्रदर्शनात भारताच्या सुरक्षा सामर्थ्यांचे भव्य दर्शन घडविण्यात आले असून त्यात आकाश, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आकर्षण ठरली आहेत. इस्रोचे मंगलायान अभियान भारताच्या अंतराळ मोहिमेची यशोगाथा सांगत आहे. तसेच मध्य प्रदेशांतील ५० कारागिरांनी थाटलेली दालने विज्ञान प्रदर्शनाची शोभा वाढवीत आहेत.
आज विज्ञान संमेलनाचे उद्घाटन
आज सकाळी १० वाजता कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात प्रख्यात वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते विज्ञान संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भारताचा पहिला सुपरकॉम्प्युटर ‘परम’चे जनक पद्मभूषण डॉ. विजय भाटकर यांची विशेष उपस्थिती असेल.