वैज्ञानिकांविषयीच्या उदासिनतेमुळे देश संशोधनात मागे

0
112
कांपाल-पणजी येथे आयोजित भारतीय विज्ञान संमेलनाच्या समारोप समारंभात बोलताना केंद्रीय उर्जा मंत्री पियुष गोयल. व्यासपीठावर जयंतराव सहस्रबुध्दे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये व अन्य.

केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांची विज्ञान संमेलनात खंत
भारताने आपल्या वैज्ञानिकांची दखल घेतली नाही व त्यामुळे देश संशोधनाच्या क्षेत्रात मागे ढकलला गेला अशी खंत केंद्रीय कोळसा व उर्जा मंत्री पियुष गोयल यांनी काल भारतीय विज्ञान संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना व्यक्त केली. या पार्श्‍वभूमीवर आता केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी मारावी यासाठी पावले उचलायला सुरवात केली आहे. मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा नारा देशाला विज्ञान क्षेत्रात प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भारताने आता आपल्या वैज्ञानिकांची दखल घेणे सुरू केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर प्रथमच हे घडते आहे, असे ते म्हणाले. अमेरिका किंवा युरोपी देशांचे अनुकरण न करता आता आम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करायला हवे, असे एका मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. पुरातन काळात मोठमोठे शोध हे भारतातच लागले होते. ती परंपरा आम्ही पुढे न्यायला हवी असे मोदी यांना वाटत असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
संशोधनासाठी आमचे कोणतेही बजेट नाही. मात्र, संशोधनासाठी कितीही व अमर्याद पैसा खर्च करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले.
संमेलन वार्षिक व्हावे
भारतीय विज्ञान संमेलन हे दोन वर्षांनी एकदा नव्हे तर दरवर्षी घेतले जावे व त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. अशा संमेलनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. कारण नव्या कल्पना व संशोधन याविषयी अशा संमेलनामुळे मुलांमध्ये रस निर्माण होत असतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात भारतातील शास्त्रज्ञांना संशोधनासाठी देशाबाहेर जाऊ लागू नये यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याचे गोयल म्हणाले.
भारतात योग्य वातावरण नाही
यावेळी वरिष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. एम्. एस्. वालियाथन म्हणाले, की उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यंच्या मनात नव्या कल्पना व संशोधक वृत्ती वाढीस लागू शकेल असे वातावरण असावे लागते. मात्र, दुर्दैवाने भारतात तसे वातावरण नसल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या डोक्यातून येणार्‍या कल्पना या एकाप्रकारे दैवी कल्पना असतात व या क्रांतीकारी कल्पनांना खतपाणी घालण्याची आवश्यकता असते. नेमके तेथेच आम्ही कमी पडतो, अशी खंत त्यानी व्यक्त केली.
भारतीय विज्ञान संमेलनाचे राष्ट्रीय आयोजन सचिव जयवंतराव सहस्रबुध्दे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक एस. डब्ल्यू. ए. नक्वी, विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालक लेव्हिन्सस मार्टिन्स यांचीही यावेळी भाषणे झाली. सुहास गोडसे यांनी आभार प्रदर्शन केले.
गोवा विज्ञान संमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे प्रदान करण्यात आली.