वेळेचा सदुपयोग

0
184
  •  डॉ. रेखा पौडवाल
    (बांबोळी)

संपूर्ण दिवस घराच्या चार भिंतीत दडून राहून करायचं तरी काय? आमच्या अवतीभवती दाटत असलेल्या या निराशामय व नकारात्मक वलयातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक व बुद्धीला चालना देणारा उपाय शोधून काढला आहे तो म्हणजे ऑनलाईन बुद्धीबळाच्या सामन्यांचे आयोजन.

‘कोरोना’ हा केवळ शब्द जरी कानी पडला तरी आजच्या घटकेला माणूस भीतीने थरथर कापतो आहे. या संपूर्ण जगाला गिळंकृत करणार्‍या विषाणूने माणसाची झोप घालवली आहे. या जीवघेण्या सूक्ष्म जीवाने सार्‍या विश्‍वाला दहशत बसवली आहे. संपूर्ण जगाबरोबर भारतातही कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर, उत्तर प्रदेश या शहरांमध्ये कोरोनाने मृत्युचे तांडव चालवले आहे. आपला जीव मुठीत धरून भयाच्या सावलीत माणूस स्वतःला घरात कोंडून घेत आहे. पूर्वी प्राणी पिंजर्‍यामध्ये बंद असायचे व माणसं फिरताना दिसायची. आज मात्र कोरोनाच्या भीतीने चित्र पालटले आहे. मनुष्य घराच्या चार भिंतीत बंदिस्त आहे व पशू-प्राणी अगदी मजेत बिनधास्त मोकाट फिरताना दिसताहेत.
शाळा, कॉलेज, ऑफिस, दुकान, मॉल, समुद्रकिनारे सारं काही बंद आहे. माणूस हा समाजप्रिय आहे. एक वेळ खायला-प्यायला नसेल तर चालेल मात्र त्याला दुसर्‍यांशी बोलायला हवं. आता निरुपाय म्हणून जबरदस्तीने त्याला घरी राहावं लागतं आहे. बरं.., एक- दोन दिवसांची गोष्ट नाहीये, हा लॉकडाऊन मारुतीच्या शेपटीसारखा ‘वाढता वाढता.. वाढे…. आहे. मग दिवसभर घरी बसून करायचं तरी काय? मनाला विरंगुळा हा तर हवाच ना! मग वेळ घालवण्यासाठी टीव्ही लावला तर काय? मनोरंजन तर होत नाहीच उलट कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा पाहून उगाचच मनाला नैराश्य येतं. असा नकारात्मक कार्यक्रम बघण्यापेक्षा टीव्हीचे बटन बंद केलेलेच बरे, असा मनात विचार येतो आणि शेवटी मग हे कोरोनाचं संकट केव्हा टळेल व सारं पूर्ववत केव्हा सुरू होईल याची माणूस वाट पाहतो आहे.

आनंदाची बाब म्हणजे आमचा गोवा ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित झाला आहे. आजच्या घटकेला गोव्यात एकही कोरोनाने बाधित रुग्ण नाही… ही जरी सत्य स्थिती असली तरी .. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या उक्तीप्रमाणे गोव्याच्या जवळचे राज्य म्हणजे बेळगाव आणि बेळगाव शहरात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची बरीच मोठी संख्या आहे. तेथील कुण्या कोरोना बाधित रुग्णाने चोरून, लपून, पळवाटेने येऊन गोव्यात शिरकाव केला नसेल ना? आणि तो संशयित रुग्ण आपल्या आजुबाजूला भटकत तर नसेल ना… अशी अमंगळ शंका मनात डोकावल्याशिवाय राहात नाही.

मग या संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर घरातच राहणे हा सर्वोत्तम उपाय. परत प्रश्‍न उभा राहतो तो संपूर्ण दिवस घराच्या चार भिंतीत दडून राहून करायचं तरी काय? आमच्या अवतीभवती दाटत असलेल्या या निराशामय व नकारात्मक वलयातून बाहेर काढण्यासाठी डॉ. रुपा बेलुरकर या महिलेने एक छानसा सकारात्मक व बुद्धीला चालना देणारा उपाय शोधून काढला आहे तो म्हणजे तिने ऑनलाईन बुद्धीबळाचे सामने आयोजित केले.
प्रथम ते बुद्धीबळाचे सामने गोव्याच्या खेळाडूंपुरतेच मर्यादित ठेवले गेले. ‘क्वीन्स चेस क्लब’ या संस्थेतर्फे मग राष्ट्रीय पातळीवरही ऑनलाईन बुद्धीबळ सामने आयोजित केले. दोन्ही सामन्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. असा अगळावेगळा बुद्धीला चालना देणारा उपक्रम सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली याबद्दल डॉ. रुपा यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. अशाच नवीन कल्पनांच्या माध्यमाने थोडा वेळ का होईना पण कोरोनाच्या भीतिपासून लोकांना मुक्त करतील यात शंका नाही. हा वेळेचा सदुपयोग स्पृहणीय आहे.