22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

>> तिस्क-उसगाव व दाबोळी-शिरोड्यातील घटना

तिस्क – उसगाव व दाबोळी – शिरोडा येथे काल मंगळवारी झालेल्या दोन विविध अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. तिस्क – उसगाव येथील अपघातात महेश वासुदेव गावडे या दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तर दाबोळी – शिरोडा येथे झालेल्या अपघातात जावेद जब्बीर शेख हा दुचाकीस्वार ठार झाला.

तिस्क – उसगाव येथील अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. जीए ०५ डी ५९०६ ही कार व जीए ०५ एच २०५२ ही दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. तिस्क – उसगाव येथे औषधाच्या दुकानासमोर कारचालकाने गाडी थांबवून अचानक दरवाजा उघडला. याचवेळी मागून येणार्‍या महेश गावडे या दुचाकीस्वाराची जोरदार धडक या दरवाजाला बसली आणि महेश रस्त्यावर फेकला गेला. कारचा दरवाजा महेशच्या डोक्याला धडकल्याने त्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर लगेच त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले असता संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्याचे निधन झाले.

मूळ केरळमधील पण सध्या कसलये – तिस्क उसगाव येथे राहणार्‍या कारगाडीचा चालक टॉम अब्राहम झेवियर (३१) याने अचानकपणे कारचा दरवाजा उघडल्यामुळेच हा अपघात झाला. कारचालकाने दरवाजा उघडण्यापूर्वी मागे वळून पाहिले असते, तर हा अपघात झाला नसता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महेश हा रोजंदारीवर काम करीत होता.

दाबोळी – शिरोडा येथे घडलेल्या दुसर्‍या अपघातात सावर्डेहून फोंड्याच्या दिशेने येणार्‍या जीए ०५ टी २६७० या ट्रकची फोंड्याहून सावर्डेच्या दिशेने जाणार्‍या जीए ०७ एए ९९५३ या दुचाकीशी टक्कर झाली. या अपघातात दुचाकीचालक साफीकूर रेहमान (२२) व दुचाकीच्या मागे बसलेला जावेद जब्बीर खान (२४, दोघेही मूळ उत्तर – प्रदेश) हे सध्या शांतीनगर – फोंडा येथे राहणारे रस्त्यावर फेकले गेले.

यात जावेद खान हा ट्रकच्या खाली आल्याने जागीच ठार झाला, तर साफीकूर रेहमान हा किरकोळ जखमी झाला. दोघेही एअर कंडिशनर टेक्निशियन होते. फोंडा पोलिसांनी या दोन्ही अपघातांचा पंचनामा केला. कारचालक व ट्रकचालकांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह बांबोळी शवागारात ठेवण्यात आले आहेत. फोंडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION