रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत वाद आता पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला आहे. आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्या काही समर्थकांनी पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात काल तक्रार दाखल केली. विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांच्यावर पक्षाच्या निधीचा गैरवापर आणि बदनामी केल्याची तक्रार केली आहे.
विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांनी पक्षनिधीचा गैरवापर आणि कटकारस्थान रचून आमची बदनामी केली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे लिसिओ रॉनकॉन यांनी सांगितले. आरजीपाला येणाऱ्या निधीचा कसा वापर होतो, त्याचा हिशोब आम्ही मागत होतो. मात्र, दरवेळी पक्षाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात येईल, असे उत्तर दिले जात होते. निधीबाबत स्पष्टीकरण मागितल्याने आमच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला, असेही रॉनकॉन यांनी सांगितले. यावेळी आरजीपीतून हकालपट्टी केलेले सॅम नाईक, डॅगली फर्नांडिस, मॅल्विन डिसिल्वा व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

