Home बातम्या वीज बिले उशिरा दिल्याने ग्राहकांच्या लुबाडणुकीचा दावा

वीज बिले उशिरा दिल्याने ग्राहकांच्या लुबाडणुकीचा दावा

0

कॉंग्रेसची वीजमंत्र्यांविरुध्द तक्रार

वीजेचे किती युनिट वापरले त्यावर युनिटचा दर ठरतो. त्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याला बिले दिली पाहिजेत. तीन ते चार महिने बिले दिली जात नसल्याने ग्राहकांची लुबाडणूक होते. बिले देताना तीन ते चार महिन्यात किती युनिट झाले त्यावरच बिले काढली जातात. या लुबाडणुकीच्या विरोधात आपल्या पक्षाने वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सुदिप ताम्हणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढील पंधरा दिवसात एक आय आर दाखल करून न घेतल्यास न्यायालयात याचिका सादर करण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडातील आपत्तीग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते डबे घेऊन फिरत आहेत. या पैशांचा हिशेब कोण देणार, असा प्रश्‍न करून पावती फाडूनच पैसे गोळा करावेत, असे आवाहन ताम्हणकर यांनी केले. आपल्या पक्षाच्या आमदारांनीही एका महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. अशावेळी सरकार ५ कोटी रुपये उत्तराखंडाला कसे पाठविणार, असा प्रश्‍न करून सरकारने स्थानिक समस्या सोडविण्याकडे आधी लक्ष केंद्रीत करावे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हट्टी स्वभावामुळेच गोव्याची स्थिती बिकट बनल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.