राज्यातील वीज ग्राहकांच्या विजेच्या बिलातील दंडाची रक्कम 12 जूनच्या सायंकाळपर्यंत मागे न घेतल्यास वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिला.
वीज ग्राहकांना देण्यात आलेली वाढीव वीज बिले अन्यायकारक आहेत. राज्य सरकारने वीज बिलातील दंड मागे घ्यावा आणि वीज ग्राहकांना विजेचा भार निश्चित करण्यासासाठी तीन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी वाल्मिकी नाईक यांनी केली.
वीज-भाराच्या मंजूर मर्यादेपेक्षा जास्त विजेचा वापर केल्याने राज्यातील हजारो वीज ग्राहकांच्या बिलात दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात दुप्पट, तिप्पट, चौप्पट अशी वाढ झाली आहे. वीज खात्याने ग्राहकांना वीज भार अधिक वापरल्यास दंड केला जाईल याबाबत योग्य प्रकारे सूचना केलेली नाही. आपच्या नेत्यांनी वाढीव बिले आलेल्या गोव्यातील अनेक कुटुंबांची भेट घेतली आहे. त्या ग्राहकांना वाढीव वीज बिलांची रक्कम भरण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
वीज बिलांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे लोक त्रस्त झाले आहेत. विजेच्या बिलातील वाढीबाबत वीज खात्याकडून योग्य स्पष्टीकरण दिले जात नाही, असा आरोपही नाईक यांनी केला.

