वीज बिलांतील दंडाची रक्कममाफीबाबत परिपत्रक जारी

0
13

वीज खात्याने ग्राहकांच्या वाढीव वीज बिलांतील दंडाची रक्कम माफ करण्याबाबतचे परिपत्रक काल जारी केले. नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या काळात वीज ग्राहकांच्या बिलातील दंडाची रक्कम वगळली जाणार आहे, अशी माहिती वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

वीज खात्याने 5 किलोवॅट आणि 10 किलोवॅट असे भार मंजूर केले आहेत. 5 किलोवॅटपेक्षा कमी मंजूर भार असलेल्या ग्राहकांचा भार आपोआप 5 किलोवॅटपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे त्या ग्राहकांना भार वाढविण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही, तर 5 किलोवॅटपेक्षा भार वाढल्यास त्या वीज ग्राहकाला थ्री-फेज कनेक्शनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.

10 किलोवॅटपेक्षा कमी मंजूर भार असलेल्या ग्राहकांचा भार लागू असलेल्या भार श्रेणीनुसार आपोआप 10 किलोवॅटपर्यंत वाढवला जाणार आहे. एखाद्या ग्राहकाचा भार 6 किलोवॅट आहे. त्याचा भार आपोआप 10 किलोवॅटपर्यंत वाढविला जाणार आहे, असे स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.

ज्या ग्राहकांचा वीज भार 10 किलोवॅटच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना भार वाढवण्यासाठी विभागाकडे स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. त्या ग्राहकांना आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि सुधारित नियमांची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधीही दिला आहे, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.