वीज बिलांचे एसएमएस पाठवून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार

0
12

राज्यातील वीज ग्राहकांना भामट्याकडून वीज बिलाचा भरणा करण्यासाठी एसएमएस संदेश पाठवून लुबाडण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला आहे. राज्यातील काही वीज ग्राहकांना विजेच्या बिलांचा भरणा न केल्याने त्यांची वीज जोडणी तोडण्याबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठवले जात आहेत. वीज जोडणी नावावर नसलेल्या काही नागरिकांनासुद्धा वीज जोडणी तोडण्याबाबत एसएमएस संदेश पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

भामट्यांकडून वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस संदेश पाठवून प्रलंबित वीज बिलाचा भरणा निर्धारित वेळेत न केल्यास वीज खात्याकडून रात्री ९ वाजता कनेक्शन तोडण्यात येणार आहे, असा संदेश पाठविला जात आहे. त्या संदेशामध्ये वीज बिलाचा भरणा करण्यासाठी एक संपर्क क्रमांक दिला जातो.
या वर्षीच्या सुरुवातीला राज्यातील वीज ग्राहकांना एसएमएस संदेश पाठवून वीज बिलाचा भरण्याची सूचना करण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर वीज खात्याने तातडीने खुलासा करून वीज ग्राहकांना सावध केले होते. वीज खात्याकडून वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना एसएमएस संदेश किंवा वॉटस्‌ऍप संदेश पाठविला जात नाही.

वीज ग्राहकांनी बिलाच्या भरणासंबंधीच्या कुठल्याही एसएमएस संदेशाला बळी पडू नका, असे आवाहन वीज खात्याने केले. तथापि, काही वीज ग्राहक भामट्याच्या संदेशाला बळी पडत आहेत आणि अशा भामट्यांकडून लुबाडले जात आहेत.
वीज खात्याने वीज ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या एसएमएससंबंधी पणजी पोलीस स्थानक आणि सायबर गुन्हा विभागाकडे तक्रार केली आहे. तथापि, वीज ग्राहकांना एसएमएस पाठवून फसविण्याचे प्रकार अजून बंद झाले नाहीत.