गोवा मुक्त होऊन ५० वर्षे लोटूनही साधनसुविधांची वानवा
गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे सरली तरी वाळपई शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेला वायंगिणी गाव अजूनही मूलभुत साधनसुविधांपासून वंचित आहे. पाणी, वीज, रस्ते तसेच शिक्षणाची सोय या गावात नसल्याने तेथील ग्रामस्थांना अनंत अडचणींशी दोन हात करत जीवन जगावे लागत आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी या गावातील लोकांना आश्वासने देऊन केवळ मतांसाठी वापर केला जातो; मात्र निवडणुकीनंतर कोणीही विकास साधण्यासाठी पुढे येत नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीच्या सुरात सांगितले.
वीज-पाणी नाही
गावात वीज व पाण्याची सोय अद्याप करण्यात आलेली नाही. या गावातील लोक अजूनही रात्रीच्या वेळी वीजेविना राहतात यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. शुद्ध पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांना नैसर्गिक झरा किंवा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. रस्ता, वीज व पाणी या जीवनोपयोगी सुविधा तेथील ग्रामस्थांना मिळालेल्या नाहीत. उन्हाळ्यात तर येथील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागते. मात्र, सरकार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास पुढे येत नसल्याचे ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले.
शाळेचे फक्त आश्वासन
या गावात शाळा सुरू करण्याची मोठमोठी आश्वासने दिली जातात; पण अजूनपर्यंत शाळा सुरू झालेली नाही. गावातील मुलांच्या शिक्षणाचे शाळेअभावी हाल होत असतात. गावात शाळा नसल्याचे प्राथमिक शिक्षणासाठी मुल ६ वर्षांचे झाले की त्यांना पाहुण्याच्या घरी शिक्षणासाठी ठेवावे लागत असल्याने अनेक आईवडिलांना आपल्या मुलांपासून दूरच राहावे लागते. प्राथमिक शिक्षणाची सोय कधी होणार असा सवाल येथील भोळेभाबडे ग्रामस्थ करीत आहेत.
आरोग्य सुविधांची वानवा
आरोग्य सुविधा या गावात अजून नावाला नाहीत. त्यामुळे कुणीही आजारी असले की चालत वाळपई गाठावे लागते. जर वेळेवर इस्पितळात पोहोचण्यास उशीर झाला तर जीवावर बेतण्याची शक्यता असते.
केवळ मतांसाठी वापर
वायंगिणी गावाचा फक्त मतांसाठी वापर होत असल्याचे येथील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असो आजपर्यंत राजकर्त्यांनी निवडणुकांवेळीच या गावाला पदस्पर्श केला आहे. मात्र, निवडणुका झाल्यानंतर कोणीही या गावाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकारामुळे लोकांचा राज्यकर्त्यांवरील विश्वासाला तडा गेला आहे. गावचा विकास कधी तरी होणार या आशेवर या गावातील लोक जगत आहेत. त्यांना सोसाव्या लागणार्या मरणयातना दूर करणारा देवदूत भेटणार अशी त्यांना आशा वाटत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

