केबलकरिता वीज खात्याच्या खांबांच्या वापरासाठी परवानगी घेण्यासाठी केंद्रीय दूरसंचार खात्याच्या गतिशक्ती संचार पोर्टलवर अर्ज करण्याची सूचना राज्यातील केबल, इंटरनेट सेवा पुरवठादारांना करण्यात आली आहे.
ऑपरेटरांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यावर त्यावर वीज खात्याकडून प्रक्रिया केली जाईल. वीज खात्याकडून ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पाहणी करून आवश्यक शुल्क भरल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर परवाना दिला जाणार आहे. केबल ऑपरेटरांना सेवा देण्यासाठी वीज खात्याने उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असे माहिती-प्रसिध्दी खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दूरसंचार नियम 2024 च्या तरतुदींनुसार यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. त्यामुळे यापूर्वी ज्यांनी हार्ड कॉपीमध्ये अर्ज सादर केले आहेत. त्यांच्यासह अन्य सर्व सेवा पुरवठादारांनी राज्यातील वीज विभागाच्या पायाभूत सुविधांच्या वापरासाठी या पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
सर्व सेवा पुरवठादारांनी वीज खांबांवर केबल घालताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे. वीज खांबांवरील केबलमुळे वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, पुरवठादारांनी वापरात नसलेल्या किंवा जुन्या केबल ताबडतोब काढून टाकाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

