Home बातम्या विहिंप, रा. स्व. संघावर बंदी घालावी

विहिंप, रा. स्व. संघावर बंदी घालावी

0

मायावती यांची मागणी

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ज्ञाती मेळाव्यांचे समर्थन केले असून न्यायालयाने विश्‍व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या संघटनांवर बंदी घालायला हवी असे मत व्यक्त केले आहे. या संघटना भाजपसारख्या राजकीय पक्षांवर नियंत्रण ठेवणार्‍या रिमोट कंट्रोलची भूमिका बजावतात असा दावा त्यांनी केला आहे, असे धर्माधारीत राजकारण देशासाठी घातक असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

गुजरातमधील २००२ च्या दंगलग्रस्तांची तुलना कुत्र्याशी करणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या विधानाला पाठिंबा देणार्‍या आपल्याच पक्षाच्या खासदार विजय बहादूर सिंग यांना त्यांनी इशारा दिला. सिंग यांनी मोदींना पाठिंबा देणारे वक्तव्य वैयक्तिक पातळीवर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिंग यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय बसपने घेतल्यामुळे सिंग यांनी पक्षाला आव्हान देणारे विधान केल्याचे त्या म्हणाल्या. मोदी यांची वक्तव्ये असंवेदनशील व जातीय स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला.

न्यायालयाने जातीय स्वरूपाच्या मेळाव्यांना स्थगिती देण्याचा निवाडा दिल्याच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना आपला पक्ष असे मेळावे लोकांना एकसंध करण्यासाठी करत असल्याचे सांगितले. त्यात सर्व सामाजिक घटकांचा समावेश असून आपले मेळावे राजकीय लाभासाठी नसल्याचा दावा त्यांनी केला.

यापुढेही सर्व जाती व समाजांमध्ये बंधुभाव वाढविण्यासाठी असे मेळावे घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्था बिघडल्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी त्यांनी केली.