– विष्णू सूर्या वाघ
(भाग- १)
इतिहास घडवणार्या महापुरुषांना समाज कधी विसरत नाही असे म्हणतात. पण नियतीचा खेळ कधीकधी फार विचित्र असतो. इतिहास घडवणारी माणसेही कधीकधी विस्मृतीच्या पडद्याआड फेकली जातात. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या कामगिरीचे श्रेयही भलत्यांनाच दिले जाते. मराठीतले पहिले संगीत नाटक लिहिले कृष्णंभट्ट बांदकरांनी. अण्णासाहेब किर्लोस्कर यांना संगीत नाटक लिहिण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. पण संगीत रंगभूमीचे जनक म्हणून इतिहासात नाव लिहिले गेले ते किर्लोस्करांचे! अशाच प्रकारचा अन्याय इतिहासाने आणखी एका व्यक्तीवर केला. त्यांचे नाव पं. रघुवीर रामनाथकर. आपल्या अंगभूत संशोधक वृत्तीने अथक मेहनत करून बावीस श्रुतींच्या पेटीचा शोध कै. रामनाथकर यांनी लावला. पण उभ्या हयातीत (आणि मृत्यूनंतरसुद्धा) या शोधाचे श्रेय त्यांना मिळाले नाही. अष्टपैलू प्रतिभेचा धनी असलेला हा किमयागार कलावंत आयुष्यभर उपेक्षितच राहिला. कलेचा व्यापार करणे त्याला कधी जमले नाही आणि स्वतःची टिमकी वाजवायला तो कधी शिकला नाही. त्यामुळे संगीत क्षेत्रातील आजच्या जाणकारांनाही ‘रघुवीर रामनाथकर’ म्हणजे कोण ते नीटसे सांगता येणार नाही.
भारतीय कलाक्षेत्राला गोमंतकाने जी काही रत्ने दिली त्यातलेच एक अद्वितीय रत्न म्हणजे रघुवीर रामनाथकर. आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि कला अकादमीच्या संगीत विभागाचे पहिले प्रमुख पं. रत्नकांतजी रामनाथकर यांचे रघुवीरमामा हे वडील. तल्लख हार्मोनियमवादक, उत्तम सारंगीपटू, अद्वितीय चित्रकार, शैलीदार शिल्पकार, कल्पक नेपथ्यकार अशा अनेक भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी वठवल्या. अनेक कलाकारांना मार्गदर्शन केले. बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनीत रंगमंच सजायचा तो रघुवीर पेंटरांनी रंगवलेल्या पडद्यांनी. शेकडो नाटकांचे दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. हार्मोनियम या वाद्यात अनेक गोमंतकीयांनी प्रावीण्य मिळवले, पण या वाद्याचा गाढ व्यासंग करून गोव्याबाहेर नाव मिळवणारे आणि मैफलीतील खानदानी गवय्यांना साथ देणारे रघुवीर रामनाथकर यांच्यासारखे फारच थोडे. तशात तालीममास्तर म्हणूनही त्यांचा जम अतिशय चांगला बसला होता. तालीममास्तर म्हणून एखाद्या गावी जायचे, तिथे नेपथ्याचे सर्व सामानही तयार करून द्यायचे, संगीत दिग्दर्शनही करायचे आणि ऐन वेळी पेटीचीही साथ करायची. प्रत्येक गावी एकदोन महिने मुक्काम करताना वर्ष कसे संपून जाई याची रामनाथकरांना दखलही नसायची.
रघुवीर रामनाथकर यांचा जन्म रामनाथी येथे १२ फेब्रुवारी १८७७ या दिवशी झाला. संगीताची साधना घरातच कर्तव्यनिष्ठेने चालायची. रघुवीरमामांना त्यांच्या मातोश्रींनीच संगीताची प्राथमिक तालीम दिली. समजायला लागले असेल नसेल, तोच त्यांच्या आईने धृपद-धमाराचे कठीण संगीत गळ्यातून काढायला शिकवले. त्यानंतर नारायणराव कवळेकर यांच्याजवळ तीन वर्षे त्यांनी सारंगीचे शिक्षण घेतले. घूमटवादनाचाही रियाज केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण चालू झाले. रघुवीर रामनाथकर यांना संगीताबरोबरच चित्रकलेचीही उपजत आवड होती. गोमंतकात त्यावेळी गावोगावच्या उत्सवात ‘दहीकाले’ करण्याची पद्धत होती. अशा दहीकाल्यात छोट्या रघुवीरने अनेकदा कृष्णाची भूमिका केली होती. यशोदा बनायच्या त्यांच्याच मातोश्री. कृष्णाची भूमिका करताना साहजिकच त्यांना अनेक पदे म्हणावी लागायची. पुढे दहीकाल्यांची जागा नाटकांनी घेतली. रघुवीरमामा मग नाटकातून कामे करायला लागले. एवढेच नव्हे तर गावच्या उत्सवांत स्वतःच नाटके बसवायला लागले. ‘वीरतनय’, ‘कमलजा’, ‘मनोविजय’, ‘सत्यविजय’, ‘संताप-शमन’, ‘विकल्पविमोचन’ अशी अनेक नाटके त्यांनी बसवली व मंचावर सादर केली. पुढची काही वर्षे तालीममास्तर व संगीत दिग्दर्शकाचा पेशा हा व्यवसाय म्हणूनच त्यांनी स्वीकारला. त्यावेळी नाटकाला लागणारे सर्व सामान ते घरातल्या घरातच तयार करायचे. नाटकाचे पडदे रंगवणे, जरीचे कपडे शिवणे वगैरे कामे ते स्वतःच करायचे. ही कामे त्यांना प्रत्यक्ष कुणी शिकवली नाहीत, पण इतर लोक कसे करतात ते पाहून रामनाथकरही करत असत. सुदैवाने चित्रकलेची आवड त्यांना मुळापासून होती. राजा रविवर्म्याची चित्रे हा त्यांच्या आकर्षणाचा विषय होता. कलाप्रिय गोमंतकाला त्याकाळी राजा रविवर्म्याच्या चित्रांनी वेड लावले होते. नकळत रविवर्म्याच्या चित्रांची रघुवीर रामनाथकर नक्कल करू लागले. त्याशिवाय बेळगावचे भाऊराव फडके नावाचे एक चित्रकार शिक्षक होते. त्यांच्या चित्रांचीही कॉपी करण्याचा ते प्रयत्न करीत. अशी नक्कल करता करताच रामनाथकरांना स्वतःची शैली सापडली. या चित्रकलेचा उपयोग त्यांना नाटकांचे पडदे रंगवताना झाला. पुढे चक्क गंधर्व नाटक कंपनीनेही त्यांच्याकडून पडदे रंगवून घेतले.
किशोरवयात रघुवीर रामनाथकर मुंबईला गेले होते. तिथे भाऊ मोरोबा ढगे यांच्या कारखान्यात जरीच्या टोप्या कशा बनवतात याचे त्यांनी निरीक्षण केले. त्यावरून त्यांनी जरीचे भरतकाम आत्मसात केले व रामनाथीला परतल्यानंतर त्या कलेचा उपयोग नाटकातले जरीचे कपडे बनवण्यासाठी केला. असा होता त्यांचा हरहुन्नरी स्वभाव.
निरनिराळ्या कला हस्तगत करण्यात रघुवीरमामांचे मन गुंतले असतानाच एका अनोख्या वाद्याने त्यांच्यावर भुरळ घातली होती. हे वाद्य म्हणजे बाजाची पेटी अर्थात हार्मोनियम. साधारणतः वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना हार्मोनियमचे प्रथम दर्शन झाले. तेही गावातल्या दहीकाल्यात- हरदासबुवांच्या कीर्तनात. तिला पॅरिसची पेटी म्हणत असत व बुवांनी ती मुंबईहून आणली होती. ती पाहून आपणही पेटी शिकावे असे रघुवीरमामांना वाटू लागले व यथाशक्ती त्यांनी पेटीवरून हात फिरवायला सुरुवात केली.
रघुवीर रामनाथकर यांचा जन्म रामनाथीचा. पण कुलदेवी मात्र मडकईची नवदुर्गा. प्रतिवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवदुर्गेची जत्रा व्हायची. या जत्रेला न चुकता सारे आप्तवर्गीय जमायचे. मुंबईवरूनही पाहुणे मंडळी यायची. त्यात कित्येक गायक-वादक असायचे. जत्रेनिमित्ताने एकत्र आले की गाणे-बजावणे हटकून व्हायचे. संगीतावर चर्चा झडायची.
एक वर्षी नवदुर्गेच्या जत्रौत्सवात मूळ गोमंतकीय परंतु मुंबईतच स्थायिक झालेले व प्रचंड नावलौकिक कमावलेले प्रसिद्ध सारंगीवादक पांडुमाम मंगेशकर आले होते. त्यांनी रघुवीरचा पेटीवरचा हात पाहिला आणि ते सहज म्हणाले, ‘‘रघुवीर, अरे पेटी ऐकावी तर ग्वाल्हेरच्या भैय्यासाहेबांची. हत्यार वाजते असे वाटतच नाही. त्यांची पेटी ऐकताना कुणीतरी गात आहे असेच वाटते रे. मींड, गमक आणि तनायत तर हुबेहूब कसलेल्या गायकाच्या गळ्यातून निघावी तशी. भैय्याजी पेटीवर मींड वाजवतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या पेटीला सारंगीसारख्या तरफाही बसवलेल्या आहेत.’’
एवढं सांगून झाल्यावर पांडुमामनी रघुवीरला सांगितलं की भैय्यासाहेब सध्या मुंबईत आले आहेत. अजून काही दिवस त्यांचा मुक्काम तिथे असेल. नंतर ते कलकत्त्याला जातील. त्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या पेटीचे दर्शन घेणे जमेल का बघ.
पांडुमामनी दिलेली ही माहिती ऐकून रघुवीर रामनाथकरांची झोप उडाली. पेटीतून मींड निघू शकते आणि पेटीला सारंगीसारख्या तरफा बसवल्या आहेत या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसेना. हे काहीतरी अद्भुत आहे. आयुष्यात एकदा तरी या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. पण प्रश्न एकच होता- ‘मुंबईला जायचे कसे?’ आयुष्यात घराबाहेर पडण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. घरचे लोक एकट्याला जायला परवानगी देतील याची खात्री नव्हती. खिशात पैसेही नव्हते. शेवटी त्यांनी मनाचा धीर केला आणि मडकईला बाबा कामत नावाचे दाते होते त्यांचे घर गाठले. रामनाथकरांचा पैशा-अडक्याचा व्यवहार हेच बाबा कामत बघायचे. पैशांची गरज भासली की रामनाथकरांचा गडी बाबांकडे जायचा व पैसे घेऊन यायचा. यावेळी दस्तुरखुद्द रघुवीर आलेला पाहून बाबांना आश्चर्य वाटले. परंतु रघुवीरने काहीतरी थातुरमातुर सांगून वेळ मारून नेली. उलट कामतांना संशय येऊ नये म्हणून जेवण झाल्यावर लगेच निघायची घाई पण केली नाही. उन्हे जरा कलल्यानंतर बाबा कामतनी दिलेले दोनशे रुपये खिशात घालून ते रामनाथीला जातो म्हणून बाहेर पडले ते तडक मडकईला तारीच्या धक्क्याच्या दिशेने निघाले.
त्याकाळी दोनशे रुपये ही मोठी रक्कम होती. सर्वसामान्य माणसांच्या नशिबी बंदा रुपया दिसण्याची मारामार. त्यांचा सगळा व्यवहार तांगावर चालायचा. एक तांग म्हणजे पाच पैसे व एक पै. पाच तांगा म्हणजे असुरफी आणि बारा तांगांचा एक बंदा रुपया. या हिशेबाने त्या काळचे दोनशे रुपये म्हणजे आजचे जवळ जवळ दोन लाख रुपये!
कामतीच्या घरातनं बाहेर पडलेला रघुवीर चालत चालत मडकईच्या तारीकडे पोहोचला. मडकईला होडी करून कुठ्ठाळीला आला. तिथून त्याने पणजीला जाणारी कार्रेर पकडली. मुंबईला जाण्याची बोट रात्री बारा वाजता सुटत असे. रघुवीरने बोटीचे तिकीट काढले व बोटीत पाऊल टाकले. त्याक्षणी त्याला काहीच सुचत नव्हते. आईला न सांगताच आपण घराबाहेर पडलो आहोत. सकाळी निघालेला मुलगा रात्र झाली तरी घरी आलेला नाही. तिची काय मनःस्थिती झाली असेल याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. त्याक्षणी त्याच्या मस्तकात होता एकच ध्यास- ‘मुंबईला जाऊन भैय्यासाहेबांची पेटी ऐकण्याचा!’
तिसर्या दिवशी बोट मुंबईला पोचली. मोतीराम कवळेकर नावाचे रामनाथकरांचे नातेवाईक मुंबईत राहायचे. कसाबसा पत्ता शोधीत त्यांनी कवळेकरांचे घर गाठले. आपण मुंबईत का आलो ते सांगितले. घरी तार करून आईलाही कळवण्याची विनंती केली. कवळेकर म्हणाले, ‘‘भैय्याजींना तबल्याची साथ करायला रामचंद्र नांदोडकर जातात. तुला त्यांच्याबरोबर जाता येईल.’’
रामचंद्र नांदोडकर त्यावेळी रामजी पुरुषोत्तमच्या चाळीत राहत असत. मोतीराम कवळेकरांची खोली ऑपेरा हाऊसजवळील विठोबा जीवनजीच्या वाडीत होती. दोन्ही घरांमधले अंतर तसे फार नव्हते. रघुवीर रामनाथकर सायंकाळी नांदोडकरांकडे गेले. आपण का आलो आहोत त्याचे स्पष्टीकरण केले. नांदोडकर म्हणाले, ‘‘आज वाळकेश्वरला गोकुळदास तेजपाल यांच्याकडे गणपतभैय्यांचा पेटीवादनाचा कार्यक्रम आहे. तिथे मी जाणार आहे. जाताना तुलाही सोबत घेऊन जाईन!’’
गणपतभैय्या ही साधीसुधी असामी नव्हती. ग्वाल्हेरच्या राजदरबारात आद्य हार्मोनियम वादनाचार्य म्हणून त्यांची ख्याती होती. नांदोडकरांसोबत त्या रात्री रघुवीर रामनाथकर तेजपाल यांच्या घरी गेले. भैय्यासाहेबांच्या पेटीवादनाची मैफिलही झाली. गणपतभैय्यांनी गझल, कव्वाली पेटीवर वाजवली. पण पांडुमामकडून मींड, तरफा वगैरेच्या ज्या गोष्टी रघुवीरमामानी ऐकल्या होत्या त्या त्यांना कुठेच जाणवल्या नाहीत. मध्यंतरात सर्व मंडळी चहा प्यायला पलीकडच्या दालनात गेली तेव्हा रामनाथकर मुद्दामहून मागे राहिले व गुपचूपपणे भैय्याजींची पेटी त्यांनी उघडून पाहिली. पण त्या पेटीत कुठे मींड दिसली नाही व तरफाही दिसल्या नाहीत. रामनाथीला जी हरदासाची पॅरिसची पेटी त्यांनी पाहिली होती, तशीच ही पेटी होती. त्यानंतर पेटीचे कुतूहल त्यांना विशेष राहिले नाही. सारंगीप्रमाणेच हार्मोनिअम वाजवण्यातही आपण प्रवीण होऊ असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. दीड महिना मुंबईत राहून ते गोव्यात परतले.
चित्रकला आणि संगीत अशा दोन्ही प्रांतात रघुवीरमामांची मुशाफिरी चालू होती. वयाच्या विसाव्या वर्षी चित्रकलेच्या शिक्षणासाठी ते बेळगावला आले. त्यापूर्वी अवघा एक पंधरवडा आधी खॉंसाहेब अब्दुल करीम खॉं हे कायमचे स्थायिक होण्यासाठी बेळगावला आले होते. त्यांचा व रघुवीरमामांचा परिचय झाला व पुढे हे स्नेहसंबंध अधिक दृढ होत गेले. खॉंसाहेबांकडे दत्तूबाई कोलवाळकर यांची तालीम रघुवीरमामांनीच सुरू करून दिली. मध्यंतरी चित्रकलेच्या काही महत्त्वाच्या कामामुळे कोल्हापूरचे कलाप्रेमी जहागिरदार श्रीमंत बाळासाहेब गायकवाड यांच्या बंगल्यात रघुवीरमामा आणि खॉंसाहेब ही सर्व मंडळी कोल्हापुरात राहू लागली. याचवेळी ख्यातनाम गायिका केशरबाई केरकर या त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी अब्दुल करीम खॉंसाहेबांकडे गाणे शिकण्यासाठी आल्या होत्या.
वयाच्या एकविसाव्या वर्षी रघुवीर रामनाथकर गृहस्थाश्रमी झाले. बेळगावमधून गोव्यात आल्यावर रामनाथीच्या काही उत्साही व कलाप्रेमी तरुणांना जमवून त्यांनी स्वतःची नाटकमंडळी सुरू केली. संगीत, नाट्य, अभिनय, नेपथ्य, सीनसीनरी, वेशभूषा या सर्व गोष्टी त्यांच्याकडेच असत. शिवाय हार्मोनियमही ते स्वतःच वाजवत.
याच काळात शिल्पकलेतील एक अजोड कामगिरीही त्यांच्या हातून घडली. रामनाथीच्या मंदिराचे तीन चौक आणि रोमन पद्धतीच्या कमानी त्यांनी स्वहस्ते घडवल्या. रोमन पद्धतीच्या या कमानींची कल्पना त्यांना मुंबईच्या व्हिटी स्टेशनच्या इमारतीवरील नक्षीकाम पाहून सुचली होती. रामनाथीचे हे देऊळ बांधायला रामनाथकरांना तब्बल चार वर्षे लागली. त्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत केली. पण या कामाचा मोबदला म्हणून एका पैचाही मोबदला घेतला नाही. असा होता हा अवलिया कलाकार!
रामनाथीचे अप्रतिम शिल्पकाम बघून गोव्याबाहेरील मोठमोठे लोक व देवस्थानांचे पदाधिकारी रघुवीरमामांना कामाच्या ऑफर्स देऊ लागले. त्यामुळे कुटुंबासहित स्थलांतर करत फिरण्याची पाळी त्यांच्यावर आली. पत्नी, चार मुले व बंधू असा त्यांचा परिवार होता. १९१२ च्या सुमाराला कामानिमित्त कर्नाटकातील बळ्ळारी येथे मुक्कामाला असतानाच त्यांच्या पत्नीचे कॉलर्याची लागण होऊन निधन झाले. याच वेळी म्हैसूर दरबारकडून त्यांना दरबारी नोकरीचे निमंत्रण आले होते, परंतु कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना या नोकरीचा स्वीकार करता आला नाही. त्याऐवजी गोव्यात येऊन नाटके करण्याचा व पडदे रंगवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. १९१३ साली बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीचे पडदे रंगवण्याचे काम त्यांना मिळाले. साहजिकच गंधर्वांशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. गंधर्व कंपनीच्या नाटकात त्यावेळी पायपेटी वाजवली जात असे. रघुवीरमामांनी बालगंधर्वांना पायपेटीऐवजी ऑर्गन वाजवण्याची सूचना केली. तुमच्या आवाजाला पायपेटीऐवजी ऑर्गनची साथ योग्य ठरेल असे त्यांनी सांगितले. बालगंधर्वांनी लगेच या सूचनेचे पालन केले व त्यांचे गाणे पूर्वीपेक्षा अधिक खुलू लागले.
मा. दीनानाथ म्हणजे संगीत रंगभूमीला लाभलेला एक अद्वितीय हिरा. पण या हिर्याला रंगभूमीच्या कोंदणात चढवण्याचे काम केले ते मात्र रघुवीरमामांनी. दीनानाथांनी बालपणात केलेल्या नाटकातील भूमिका त्यांनी पाहिल्या होत्या. एकदा किर्लोस्कर नाटक मंडळी गोव्यात आली असताना रघुवीरमामांनीच कंपनीच्या चालकांना ‘हा दीना चांगला गातो. याला कंपनीत घेऊन जा’ असा सल्ला दिला. कंपनीने तो मानला. पुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
मा. दीनानाथांप्रमाणेच पुढे ‘रंगदेवता’ म्हणून प्रसिद्धी पावलेले मा. रघुवीर सावकार यांनाही महाराष्ट्राच्या रंगभूमीवर नेण्याचे श्रेय रामनाथकरांना द्यावे लागेल. सावकार यांना रघुवीरमामांनीच गंधर्व नाटक कंपनीत आणले.
रघुवीरमामांची मुले आता मोठी होत होती. त्यांच्या शिक्षणाचा, संगोपनाचा प्रश्न होता. त्यामुळे १९१७ साली पुनर्विवाह करून नव्या कुटुंबकबिल्यासह ते मुंबईत स्थायिक झाले. यानंतर त्यांनी अनेक मराठी, हिंदी, गुजराती नाटक कंपन्यांचे पडदे रंगवणे, सीनसीनरी तयार करून देणे, नाटकातील संगीत बसवणे व हार्मोनियम वाजवणे अशा प्रकारची अनेक कामे केली. मुंबईत त्याचवेळी बोलपटांचे युग सुरू झाले होते. सिने कंपन्यांची मोठमोठी पोस्टर्स तयार करून देण्याचे काम रघुवीरमामा करीत असत. दोनतीन चित्रपट कंपन्यांत संगीतदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. त्यामध्ये नारायणराव देव्हारे यांची दिग्वी सिनेटोन ही कंपनीही होती.
१९२७ साली भारतात रेडिओच्या युगाला प्रारंभ झाला. ‘बॉम्बे रेडिओ कंपनी’ या नावाची एक खाजगी कंपनी निघाली. या कंपनीने संगीततज्ज्ञ म्हणून रघुवीर रामनाथकर यांना करारबद्ध केले व संगीताचे सर्व कार्यक्रम ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे बहाल केले. दुसरीकडे फाजलभाय चिनाय या उत्साही उद्योजकाने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ नावाची दुसरी कंपनी काढली. चिनायसेठकडे फारसे पैसे नव्हते. त्यांनी रघुवीरमामांच्या पायांवर लोटांगण घातले व ‘सुरुवातीला कलाकारांना मानधन देण्याची माझी ऐपत नाही. सहा महिने कृपया मला मोफत कार्यक्रम मिळवून द्या’ अशी गळ घातली. सहृदयी रघुवीरमामांनी ती मान्यही केली व ‘आयबीसी’ला तब्बल सहा महिने त्याकाळच्या दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम फुकटात मिळवून दिले. त्यात उस्ताद फैयाज खॉं, सरस्वतीबाई फातरपेकर, इंदिराबाई वाडकर, इंदोर दरबारचे नासीरुद्दीनखॉं धृपदीये अशा बड्या कलावंतांचा समावेश होता हे लक्षात घेतले म्हणजे इंडस्ट्रीत रघुवीरमामांच्या शब्दाला किती मान होता याची प्रचिती येते.
रघुवीरमामा रामनाथकर यांच्या कलासाधनेचा वारसा त्यांचे प्रतिभावान पुत्र पं. रत्नकांत रामनाथकर यांनी समर्थपणे पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मोहनलाल रामनाथकर हेदेखील सिद्धहस्त पेटीवादक म्हणून पुढे आले असते, पण दुर्दैवाने तरुण वयातच त्यांना अपमृत्यू आला.
रघुवीरमामा रामनाथकर यांना दीर्घायुष्य लाभले. ते नव्वदीच्याही पुढे जगले. पण ऐन तरुण वयात सांगीतिक क्षेत्रात लावलेल्या एका शोधाचे श्रेय मात्र त्यांना शेवटपर्यंत लाभले नाही. १९०७ साली म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी हा शोध लावला होता. दुर्दैवाने त्याची अधिकृत दखल कुणीच घेतली नाही. कसला होता हा शोध? वाचू पुढील आठवड्यात… (क्रमशः)