– विष्णू सूर्या वाघ
(भाग- 2)
रघुवीरमामा रामनाथकर हे स्वतः एक असामान्य हार्मोनियमवादक होते. वादनातील जोड, आलाप, तयार व बिकट तानपलटा या सर्वांगानी त्यांचे वादन परिपूर्ण होते. मात्र हार्मोनियमवादनाचा वापर त्यांनी व्यावसायिक हेतूने केला नाही. अनेकदा त्यांनी बड्याबड्या बुजुर्ग गायकांना संगीतसाथ केली, पण ती निव्वळ मित्रत्वाच्या भावनेने. भास्करबुवा बखले, अब्दुल करीम खॉंसाहेब, वझेबुवा अशा दिग्गजांसोबत कितीतरी वेळा ते साथीला हार्मोनियम घेऊन बसले. यामुळे त्यांचे वादन गायकी अंगाने अतिशय समृद्ध झाले. अवघड रागरागिण्या व चीजांचा फार अपूर्व संग्रह त्यांच्यापाशी होता. मूळचे अतिशय उत्तम पटीचे लयकार, अतिशय बहुश्रुत. घरातील मूळचे अनेक पिढ्यांचे संगीत संस्कार आणि हयातभर ऐकलेल्या लहानथोर कलावंतांच्या कलेचे दिव्य संस्कार यांची महत्त्वाची भर. यामुळे त्यांची कला सर्वांगाने पोसली गेली. रघुवीरमामा संगीतावर बोलू लागले की त्यांच्या प्रगाढ अनुभवाची प्रचितीच त्यांच्या शब्दाशब्दांतून येत असे.
मात्र संगीत असो की चित्रकला, रघुवीरमामा रामनाथकर यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. ‘पाहावे नि शिकत जावे’ हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांची निरीक्षण वृत्ती अत्यंत सूक्ष्म होती. यामुळेच व्हिक्टोरिया टर्मिनसची इमारत अभ्यासून त्यांनी रामनाथी मंदिराच्या कमानी उभ्या केल्या. टोप्यांवरचे जरीकाम कसे केले जाते याचे निरीक्षण करून त्यांनी नाटकातल्या कपड्यांवर जरीकाम करवून घेतले. पेटीला सारंगीसारख्या तरफा असतात हे पांडुमाम मंगेशकरांनी नुसते गमतीने म्हटले खरे पण त्यासाठी घरातील कोणाला न सांगता तडक मुंबईला जाऊन त्यांनी खातरजमा करून घेतली. आयुष्याच्या अगदी तरुण वयात त्यांनी हार्मोनियमवर सखोल संशोधन करून श्रुतींचा शोधही लावला, पण कोणीच दखल न घेतल्यामुळे हा शोध इतिहासाच्या पडद्याआड लपलेलाच राहिला.
ही गोष्ट आहे जवळजवळ १९०७-१९०८ सालची. हुबळीला सुबराव बेलहट्टी नावाचे नामांकित वकील होते. त्यांचे घर रंगवण्याचे काम रघुवीरमामांना मिळाले होते. वकीलसाहेबांनी रामनाथीच्या मंदिरात रामनाथकरांनी घडवलेला शिल्पाविष्कार पाहिला होता व त्याने प्रभावित होऊन त्यांनी रामनाथकरांना माझेही घर जरा बर्यापैकी रंगवून दे अशी गळ घातली होती. तिला मान देऊन रामनाथकर हुबळीला येऊन मुक्काम ठोकून राहिले.
हुबळी शहरातील गणेश पेठेत त्यावेळी विठ्ठलराव कोरगावकर यांचे एक दुकान होते. सायकल, गॅसच्या बत्त्या, किटसन् लाईटस्, हार्मोनियम वगैरे अनेक प्रकारची दुरुस्ती कामे ते करीत असत. मात्र, विठ्ठलरावांची खरी ख्याती होती ती आघाडीचे संवादिनीवादक म्हणून. १८८४ साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. नंतर ते कोरगाव या आपल्या जन्मगावी आले. तिथं काही वर्षे काढल्यानंतर पुन्हा मुंबईत येऊन त्यांनी पाटणकर नाटक मंडळीत शिकाऊ पेटीवादक म्हणून प्रवेश मिळवला. गिरगावातील पेटीवादक भाचूभाई भांडीर यांच्या हाताखाली पेटीवादनातील बारकावे त्यांनी शिकून घेतले. १९०५ साली त्यांनी मुंबईतला मुक्काम हलवला व हुबळीला येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांचे दुकान साधेच होते. हार्मोनिअम, स्टोव्ह, सायकलींची दुरुस्ती व विक्री असा किरकोळ व्यापार ते करायचे. हळूहळू हा व्याप वाढत चालला. शेवरलेट मोटर्स, एचएमव्हीच्या रिकॉर्डस् व ग्रामोफोन यांची एजन्सीही त्यांना मिळाली. स्वतःच्या बारा मोटारगाड्या ठेवून त्यांनी हुबळी-कारवार बस सर्विस सुरू केली. या व्यवसायातही त्यांचा चांगलाच जम बसला आणि हुबळीतील यशस्वी उद्योगपती म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पण उद्योगधंद्याबरोबरच त्यांची संगीतसाधनाही अखंडितपणे चालूच होती. ते रोज सहा-सहा तास रियाज करीत. हुबळी शहरात आलेला बाहेरगावचा कोणताही कलाकार कोरगावकरांच्याच घरी मुक्कामाला असायचा. गंधर्व नाटक मंडळीचा प्रयोग हुबळीत असला की बालगंधर्वांसह सारे कलाकार विठ्ठलरावांच्या वाड्यात. अशाच कलाकारांच्या नामावलीत पं. कृष्णराव शास्त्री हे एक नाव होते. पं. शास्त्री यांना हार्मोनियमचे वेड होते आणि विठ्ठलराव तर स्वतः हार्मोनियमवादक, शिवाय हार्मोनियमची दुरुस्ती करणारे. हार्मोनियमविषयीच्या आपल्या बर्याच शंकांचे निरसन ते कोरगावकरांकडून करून घेत असत.
या कृष्णराव शास्त्रींची गाठ एक दिवस कोरगावकरांच्या दुकानात येऊन बसलेल्या रघुवीर रामनाथकरांशी पडली. कृष्णराव लखनौवरून नुकतेच परतले होते. लखनौला एका संगीत परिषदेसाठी ते गेले होते. त्यांनी श्रुतीलहरींच्या बाबतीत काही संशोधन केले होते. ते लखनौच्या संगीत परिषदेत मांडण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु पं. भातखांडे यांनी त्यांना त्यांचा पेपर सादर करण्यास परवानगी नाकारली, म्हणून ते भातखंड्यांवर जाम चिडले होते. भातखंडे यांच्या सांगीतिक ज्ञानावर तसेच त्यांच्या गायकी शैलीवर ते वारंवार टीकाटिपण्णी करीत होते. कृष्णरावांची ही शेरेबाजी ऐकून रामनाथकरांना मनातून बराच राग आला. त्यांची थोडी फिरकी घ्यावी असे त्यांनी ठरवले. कृष्णराव येताना आपल्यासोबत आपल्या त्या तथाकथित संशोधनाचे पुस्तक घेऊन आले होते. त्या पुस्तकात त्यांनी निरनिराळे रंग वापरून लहरी दाखवल्या होत्या. स्वर कसे कंप पावतात त्याची सचित्र माहिती दिली होती.
रामनाथकरांनी कृष्णरावांचे ते पुस्तक उचलून कानाजवळ धरले व नकारार्थी मान हालवत ते शास्त्रीबुवांना म्हणाले ः ‘‘शास्त्रीबुवा, तुमच्या निरनिराळ्या रागलहरींचा आवाज मला कुठंच ऐकू येत नाही!’’
त्यांचे हे शब्द ऐकताच शास्त्रीबुवा रागाने बसल्याजागी उसळले. म्हणाले, ‘‘मी काय संशोधन केलंय ते समजण्याची तुझी पात्रता तरी आहे का? या बावीस श्रुती आहेत. त्या वाजवता येणं शक्य नाही. त्या अशा काढूनच ऐकल्या पाहिजेत.’’
रामनाथकरांना त्यांची अधिकच मस्करी करायची हुक्की आली. ते म्हणाले, ‘‘शास्त्रीबुवा, अहो नुसती रंगीत वेलबुट्टी काढून काय उपयोग? तुम्ही कागदावर काढण्यापेक्षा तुमच्या श्रुती पेटीतून काढून दाखवल्या असत्या तर कोणीतरी तुमच्यावर विश्वास दाखवला असता. मलाही अगोदर म्हटलं असतं तर मीसुद्धा काढून दाखवला असता की श्रुतींचा आवाज!’’
यावर शास्त्रीबुवा अतोनात संतापले. रागाच्या भरात रामनाथकरांना म्हणाले, ‘‘तुला काहीही समजत नाही. उगीच भलत्या गोष्टीत तोंड घालू नकोस.’’
शास्त्रीबुवांचे हे उपहासात्मक शब्द रामनाथकरांच्या जिव्हारी लागले. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी स्वतःच्या ज्ञानाने समजावून घेण्याचा प्रयत्न केला, मग या श्रुती तेवढ्या मला का समजू नयेत? हा प्रश्न सतत मनाला डंख करीत राहिला. ही श्रुतींची भानगड आहे तरी काय? त्या समजून घेण्याची पात्रता कुणाकडे आहे? हे समजून घेण्याची तीव्र इच्छा मनात जागी झाली.
त्यावेळी विठ्ठलरावांच्या दुकानात तीन हार्मोनियम दुरुस्तीसाठी आले होते. रामनाथकरांनी तिन्ही पेट्या आपल्या बिर्हाडावर नेल्या. पुढचे तीनचार दिवस ते एकटेच हार्मोनियमचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात रंगले होते.
एका सप्तकात बारा स्वर असतात. रामनाथकरांना चोवीस स्वरांची गरज असल्यामुळे दुसर्या पेटीचा उपयोग करावा लागला. गाण्यात बावीस श्रुतींचा उपयोग करतात, परंतु पेटीत चोवीसही श्रुतींचा उपयोग होतो. कारण गाण्याच्यावेळी पेटीची साथ असताना गाणारा आपल्याला योग्य त्या स्वरावर गात असतो. त्यावेळी या दोन श्रुतींचा साथीच्या वेळेला उपयोग होतो. अशा चोवीस श्रुतींच्या हार्मोनियमला ‘श्रुती हार्मोनियम’ म्हणतात. अशा श्रुतीसमृद्ध हार्मोनियमवर गाताना गाणार्याला काळजीपूर्वक गावे लागते. अशा रीतीने विचार करू लागल्यानंतर रामनाथकरांच्या लक्षात आले की श्रुतींविषयीच्या विचारात अगम्य किंवा गहन असे मुळातच काही नाही. ते एक अत्यंत साधे गणित आहे. प्रत्येक पेटीत षड्ज, पंचम व मध्यम या तीन स्वरांच्या पद्धतीने चोवीस सूर येऊ शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवाने पाहिले होते. हे सूर अगदी सहजासहजी व शास्त्रोक्त येतात. षड्जापासून पंचम जुळवला व तो पंचम षड्ज ठरवला तर पहिला जो षड्ज आहे तो त्या पंचमाचा मध्यम होतो, इतके हे शास्त्र सोपे असल्याचा अनुभव त्यांना आला. जे २४ स्वर एका पेटीच्या सप्तकात मिळत नाहीत ते त्यांनी दुसर्या पेटीत जुळवून घेतले, तेव्हा कुठं षड्ज, पंचम व मध्यम या क्रमाने २४ श्रुतींचा मेळ लागला. अशा रीतीने २४ श्रुतींची सांगता झाल्यावर रामनाथकरनी त्या पेट्या कृष्णराव शास्त्रांना दाखवल्या व म्हटले, ‘‘तुम्ही जे चित्रात दाखवले होते ते मी या पेटीत उतरवले आहे. नुसती कल्पना नाही, प्रत्यक्ष उदाहरण आहे. पाहिजे तर खात्री करून घ्या. शुद्ध, तीव्र, कोमल व अतिकोमल असे चार भेद स्पष्ट दाखवले आहेत. पाहिजे तर खात्री करून घ्या.’’
शास्त्रीबुवांची खात्री झाली व ते खूष झाले. रामनाथकरांचाही आत्मविश्वास वाढला व हे २४ श्रुतींचे गणित जे त्यांनी बसवले होते ते स्वतःजवळ ठेवून दिले.
१९१७ च्या सुमाराला रामनाथकर गोवा सोडून मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळी एच. पी. भगत नावाचे हार्मोनियमपटू कांदेवाडीत राहत होते. रामनाथकरांनी त्यांना २२ श्रुतींची पेटी बनवून द्या असे सांगितले व पेटीबाबतची आपली योजनाही सांगितली. ‘प्रयत्न करून बघतो’ असे भगत म्हणाले. मात्र, अशी पेटी बनवायला ४०० रुपये खर्च येईल हे सांगायला ते विसरले नाहीत. रामनाथकरांपाशी त्यावेळी एवढे पैसे नव्हते. त्यामुळे पुढे कधीतरी बघू असा विचार त्यांनी केला व भगत यांच्याकडे पेटीचा विषय नंतर काढला नाही.
पुढे बारा-तेरा वर्षांनंतर म्हणजे सुमारे १९३३ साली रामनाथकरांच्या कानावर एक बातमी आली की प्रा. गंगाराम आचरेकर नामक एका संगीतविद्वानाने २२ श्रुतींची पेटी तयार केली आहे. ती पेटी घेऊन प्रा. आचरेकर मुंबईत आले व त्यांनी २२ श्रुती काढण्यासाठी पेटीचा उपयोग कसा करावा यासंबंधी प्रात्यक्षिकेही दाखवली. ‘नवाकाळ’मध्ये या विषयावरची त्यांची भाषणेही छापून आली. आचरेकर संगीताचे प्राध्यापक बनण्यापूर्वी त्यांची व रामनाथकरांची ओळख होती. तेव्हा त्यांनी हा २२ श्रुतींचा शोध लावला म्हणून रामनाथकरांना स्वाभाविकपणे आनंदच झाला, पण आचरेकरांची एकच गोष्ट त्यांना आवडली नाही. ती म्हणजे, आचरेकरांनी याबाबत केलेला मोठा गाजावाजा व हे शास्त्र काहीतरी प्रचंड कठीण व अनाकलनीय असल्याचा आणलेला आव.
आचरेकरांची श्रुतींबद्दलची भाषा ही जणू काही पेटंटची भाषा होती. ऋषभ-गांधार हे अमुक डिग्रीचे आहेत ही भाषा वापरून हे शास्त्र अत्यंत अवघड असल्याचा जो प्रयत्न त्यांनी चालवला होता तो रामनाथकरांना आवडला नाही. पण सांगणार कुणाला?
त्यानंतर काही दिवसांनी रामनाथकरांची गाठ प्रख्यात संगीतदिग्दर्शक व पेटीवादक गोविंदराव टेंबे यांच्याशी पडली. टेंबे नारायण देव्हारे यांच्या दिग्वीर सिनेटोन या सिनेमा कंपनीचे संगीतदिग्दर्शक होते. रघुवीर रामनाथकर या कंपनीचे पोस्टर्स बनवीत. रामनाथकरांना पाहून टेंबे म्हणाले, ‘‘बरं झालं तुम्ही भेटलात. प्रो. आचरेकरांनी एक नवीन पेटी बनवली आहे. तुम्ही पुण्याला जा व ती पेटी ऐकून या. फारच सुंदर काम केलंय त्यांनी.’’
यावर रामनाथकर सहज, परंतु आत्मविश्वासाने म्हणाले, ‘‘तशी पेटी तुम्हालासुद्धा बनवता येईल. त्यामध्ये विशेष कठीण काही नाही. फारच सोपं आहे हे तंत्र.’’
‘‘तुम्ही पेटी बघून तर या म्हणजे मी काय म्हणतो त्याची तुम्हाला कल्पना येईल,’’ टेंबे पुन्हा म्हणाले.
रामनाथकरांचा स्वाभिमान जागा झाला. तरी तोल ढळू न देता ते म्हणाले, ‘‘पुण्याला जाऊन ती पेटी पाहण्याची मला गरजच नाही. २२ श्रुतींच्या पेटीचा विचार मी २४ वर्षांपूर्वीच केला आहे. तेव्हा प्रो. आचरेकरांची पेटी ऐकण्याची मला इच्छा नाही.’’
टेंबे आता जरासे रागावले. स्वर किंचित चढा करत त्यांनी रामनाथकरांना विचारले, ‘‘मग तुम्ही तशी पेटी का नाही बनवली?’’
‘‘माझ्याजवळ त्यावेळी पेटी बनवून घेण्यासाठी चारशे रुपये नव्हते. आणि पेटी बनवून तरी काय उपयोग झाला असता? मी कोणातरी तज्ज्ञाला दाखवली की झालं. इतरांना त्याची काय मातब्बरी?’’ रामनाथकरही आपला हेका सोडायला तयार नव्हते. टेंबेही मागं हटत नव्हते. रामनाथकरना चिडवत ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांची पेटी तर ऐका. त्यांच्या पेटीमध्ये तोडीला अतिकोमल गांधार लागतो. आपल्या चालू हार्मोनियममध्ये तो नाही. तो कोमल गांधार आहे. अतिकोमल नाही. अतिकोमल गांधार हाताला कुणी अद्याप पकडलेला नाही.’’
टेंबे आपली टर उडवत आहेत हे रामनाथकरांच्या लक्षात आले. तरी ते एवढेच म्हणाले, ‘‘अहो, इथं लोकांना अद्याप बेसुरी पेटी समजत नाही, तिथं सुरेल काय समजणार?’’ बाण वर्मी लागला. टेंबे घुश्श्यातच रामनाथकरांना म्हणाले, ‘‘तुम्हालाच काही समजत नाहीए. तुम्हाला तर एवढं कळत होतं तर तुम्ही स्वतःच तशी पेटी का नाही केली?’’
‘‘पैसे नव्हते म्हणून केली नाही. असते तर केली असती!’’ रामनाथकरांचे रोखठोक उत्तर.
‘‘तुम्हाला दुसर्यानं केलेलं आवडत नाही. तुम्ही दुसर्यांचा मत्सर करता,’’ टेंबेंचा पलटवार.
रामनाथवर यावर काहीच न बोलता थांबले. टेंबे यांच्या वाग्बाणांनी ते दुखावले होते. आपलं कौशल्य टेंबे यांना दाखवण्याची वेळ एक दिवस तरी नक्कीच येईल या विश्वासाने त्यांनी त्या संभाषणाला विराम दिला.
अन् तशी वेळ लवकरच आली.
या घटनेनंतर दोनतीन दिवसांनी गोविंदराव टेंबे श्री. भगत यांच्याकडे गेले. टेंबे यांनी भगतांना २२ श्रुतींची पेटी बनवून देण्याची ऑर्डर दिली. भगत म्हणाले, ‘‘अशी पेटी मी काही प्रत्यक्ष पाहिलेली नाही तर बनवून कशी देऊ? पाहिली असती तर हवा तसा फेरबदल पेटीत करून दिला असता. पण तुमच्या त्या श्रुती आम्हाला कशा समजणार? पाहिजे तर एक करा- तुम्ही सवातीन सप्तकांची पेटी तयार करून घ्या व पुण्याला प्रो. आचरेकरांकडे जाऊन हवं तसं ट्युनिंग करून घ्या.’’
भगत यांनी ती ऑर्डर घेतली. चारपाच दिवस खर्चून स्वर बदलण्याची पेटी तयार केली. आता पुण्याला जाऊन ट्युनिंग करून कोण आणणार? असा कोण कारागीर तज्ज्ञ आहे. त्यावर भगतांचे धाकटे बंधू चुनीलाल म्हणाले, ‘‘तुम्ही रामनाथकरांना का भेटत नाही?’’
त्याप्रमाणे श्री. भगत रात्री रामनाथकरांजवळ आले. टेंबे यांच्या ऑर्डरची कहाणी त्यांनी रघुनाथमामांना सुनावली. रामनाथकरांच्या दृष्टीने हा एक दैवदत्त योग होता. आपली प्रतिभा टेंबे यांना दाखवण्याची नामी संधी आयती चालून आली होती. ते भगतांना म्हणाले, ‘‘मी सांगतो तसं ट्युनिंग करा. मी स्वतः पेटीला हात लावणार नाही. ट्युनिंग तुम्हीच करून घ्या. काहीच कठीण नाही त्यात. षड्ज, पंचम व मध्यम यांच्यात फरक ठेवायचा नाही. हे सर्व एकजीव करायचे. सर्व मिळून बारा स्वर झाले पाहिजेत. ही स्वर बदलण्याची पेटी आहे तेव्हा मधल्या सप्तकांचे टुनिंग करा. म्हणजे पंचम, मध्यम बरोबर मिळणार. कुठल्या तरी एका स्वराला मध्यम पंचमाचा फरक येईल. तो आला तर टुनिंग बरोबर झाले म्हणून समजा.’’
रामनाथकरांनी सांगितल्याप्रमाणे भगतांनी ट्युनिंग केलं. त्याप्रमाणं फरक आला तीव्र मध्यमाचा. मध्यम कमी व निषाद चढी असा फरक पडला.
मग रामनाथकर म्हणाले, ‘‘ट्युनिंग बरोबर झालं. जो तीव्र मध्यम कमी वाटतो तो षड्ज धरून त्या षड्जावर या दुसर्या लायनीतील मध्यम पंचम जोडा म्हणजे ते बारा व हे बारा मिळून नैसर्गिकरीत्या २४ स्वरांचा मिलाफ होईल.’’
भगत यांनी सुचनेबरहुकूम सर्वकाही केले. पेटी वाजवून बघितली. रामनाथकरांचे पाय धरले व म्हणाले, ‘‘तुम्ही गुरुजी आहात.’’
भगतांनी टेंबे यांना निरोप पाठवला. टेंबे मास्तरांनी पेटी वाजवून पाहिली. त्यांना ट्युनिंग बरोबर वाटलं. आचरेकरांकडे न जाता इतके परफेक्ट ट्युनिंग झालेच कसे हा टेंबे यांना पडलेला प्रश्न होता. भगतांनी रामनाथकरांकडे बोट दाखवले, परंतु नम्रपणे हसत ते म्हणाले, ‘‘छे छे! मी तर या पेटीला हातसुद्धा लावलेला नाही.’’
टेंबे म्हणाले, ‘‘मग ही किमया घडली कशी?’’
त्यावर रामनाथकर म्हणाले, ‘‘त्यात विशेष असं काहीच नाही. वीस वर्षांपूर्वी जो प्रयोग मी केला होता त्याची कल्पना मी भगतांना दिली. त्याप्रमाणे त्यांनी ट्युनिंग केलं. ते बरोबर साधलं. त्यात अवघड काहीच नव्हतं. मी स्वतः पेटीला हातच लावलेला नाही.’’
टेंबे यावर काहीच बोलले नाहीत. काय समजायचं ते ते समजून चुकले होते.
टेंबे यांच्यासारख्या श्रेष्ठ संवादिनीवादकालाही अखेर रामनाथकरांच्या प्रतिभेपुढे मान झुकवावी लागली. पण इतिहासाने मात्र रामनाथकरांशी घोर प्रतारणा केली. या २२ श्रुतींच्या शोधाचे श्रेय मात्र रामनाथकर यांना कधीच मिळाले नाही. पहिल्यांदा या यशाचे धनी ठरले प्रो. आचरेकर आणि दुसर्यांना? ती तर एक क्रूर चेष्टाच होती.
आपल्या २४ श्रुतींच्या पेटीचा इतिहास कुठेतरी छापून यावा ही रामनाथकरांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी ‘प्रावीण्य’ मासिकाचे संपादक का. म. ताम्हणकर यांना तशी विनंती केली. या मासिकासाठी रामनाथकर चित्रे काढत असत. रामनाथकरांनी ताम्हणकरना पेटी समक्ष वाजवून दाखवली होती. पण मजकूर मात्र भलताच होता. ‘‘२२ श्रुतींचा हार्मोनियम एच. भगत यांनी तयार केला आहे. श्री. रामनाथकर यांच्या पेटीचे ट्युनिंग या हार्मोनियमसारखेच आहे!’’ या आशयाचा तो मजकूर होता.
२४ श्रुतींवर मूळ विचार केला रामनाथकरांनी, पण श्रेयाचे धनी मात्र वेगळेच ठरले. श्रुतींचा संशोधक विस्मृतीत गेला. पेंटर व पेटीवाला ही दोनच विशेषणे रघुवीर रामनाथकर नावाच्या प्रतिभावान कलाकारासाठी मागे राहिली. त्यांचं यथार्थ वर्णन करील असं एकच विशेषण होतं- आणि ते म्हणजे ‘श्रुतीभास्कर!’