Home बातम्या विस्मृतीत गेलेला श्रुतींचा संशोधक-पं. रघुवीर रामनाथकर

विस्मृतीत गेलेला श्रुतींचा संशोधक-पं. रघुवीर रामनाथकर

0

– विष्णू सूर्या वाघ

हार्मोनियमधील श्रुतींचा शोध लावूनदेखील या शोधाचे श्रेय रघुवीरमामा रामनाथकर यांना उभ्या हयातीत मिळाले नाही. चित्र-शिल्पकला, संगीत आणि नाटक या तिन्ही प्रांतात आपल्या चतुरस्त्र प्रतिभेने त्यांनी मनमोकळी मुशाफिरी केली, पण स्वत:ची टिमरी वाजवून मोठीपणा घेण्याची व्यवहारी वृत्ती अंगात नसल्यामुळे त्यांचा व्हावा तसा गवगवा झाला नाही. पण या महान कलावंताचे एकुणच योगदान लक्षात घेतले तर गोमंतकाच्या कलाक्षेत्रातील ध्रुवाचा अढळतारा म्हणूनच त्यांचे वर्णन करावे लागेल.

रघुवीर मामांच्या सांगितिक कार्याचा साद्यंत आढावा मी आतापर्यंत घेतला आहे. आता रंगभूमीवरील त्यांचे योगदान किती महत्त्वपूर्ण होते ते पाहू.

संगीताची देणगी रघुवीर रामनाथकर यांना त्यांची आई शहाणीबाई हिच्याकडून मिळाली हे मागे सांगितले आहेच. शहाणीबाई त्यावेळच्या एक सुरेल गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. संगीत आणि स्वर हे रामनाथकरांच्या रक्तात भिनले होते. घरातले व गावातले वातावरणही संगीताप्रियता वाढीला लावणारे होते. रघुवीरना दत्तू व सखाराम असे आणखी दोन बंधू होते. दोघेही शिक्षणात हुशार होते. पण रघुवीर रामनाथकरना मात्र शणैमामी पद्धतीच्या त्या शिक्षणात रस नव्हता. रंग, रेषा, स्वर नि ताल यातच ते मग्न होऊन जात असत. दोन्ही भाऊ मराठी शिक्षण पुरे करुन पोर्तुगीजकडे वळले पण रघुवीरने मात्र सारंगी हाती घेतली. कवळे येथील नारायण राव नावाच्या सारंगियाकडे त्यांनी तीन वर्षे सारंगीचा अभ्यास केला. बालपणीच दहीकाल्यात कृष्णाची भूमिकाही केली. गावच्या उत्सवात होणारी नाटके व दशावतारी खेळ ते पाहत होतेच. याच सुमाराला मुंबई-पुण्याकडे संगीत नाटकांची नवी टूम सुरू झाली होती. १८८५ साली किर्लोस्करांचे ‘शाकुंतल’ रंगभूमीवर आले. किर्लोस्करांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी संगीत नाटकांचे प्रयोग करणार्‍या नाटक कंपन्या सुरू झाल्या. गोव्यात तर संगीत नाटकांचे प्रयोग कृष्णंभट बांदकर यांच्या पुढाकाराने होतच होते. इतर देवस्थानातूनही स्थानिक लेखकांनी ‘बांधलेली’ नाटके होत. ही नाटके पौराणिक पद्धतीची असायची. पण ती काही छापली जात नसत. याउलट बाहेरून येणार्‍या कंपन्या जी नाटके करीत ती छापील स्वरूपात असत आणि त्यांचे प्रकारही विभिन्न असायचे. गोव्यातल्या नाटकात पडदे, विंगा, झालरी वगैरे नेपथ्याचा अभाव होता. पात्रांची वेशभूषाही यथातथाच. उलट पुण्या-मुंबईवाल्या कंपन्यांच्या नाटकात नेपथ्य व वेशभूषा यांचा झगझगाट असायचा. गोव्यातील लोकांवर साहजिकच अशा नाटकांची मोहिनी पडली. अशी नाटके आम्हीसुद्धा का करु नयेत अशी ईर्ष्या उत्पन्न होऊ लागली व त्यातूनच गावोगावी नाटक कंपन्या स्थापन करण्याची चढाओढ लागली. गावच्या उत्सवातच नाटके करण्याची प्रथा असल्यामुळे कंपन्यांची नावे एकतर गावावरून किंवा संबंधित देवतांवरून ठेवण्याची फॅशन निघाली. उदा. म्हापसेकर नाटक मंडळी, पर्वतकर नाट्य मंडळ, काकोडकर नाटक मंडळी किंवा रवळनाथ प्रासादिक हौशी नाट्यमंडळ, वेताळ प्रासादिक नाट्य समाज इ. इ. ठिकठिकाणच्या देवस्थानातील जत्रा-काल्यांतून ‘विडा’ घेऊन अथवा ‘पावणी’ नेऊन या मंडळ्या आपापल्या नाटकांचे खेळ करु लागल्या. (अर्थात तेव्हा ‘प्रयोग’ म्हणण्याची पद्धत नव्हती.)

रघुवीर रामनाथकरनी आपल्या गावी अशीच एक कंपनी चालू केली. समवयस्क अशा गावातल्या तरुण मंडळींना त्यांनी या कंपनीत समाविष्ट केले. या मंडळीला देवळात किरकोळ कामे करण्यापलिकडे दुसरा उद्योग नव्हता. रिकामा वेळ मुबलक होता. त्या वेळेचा सदुपयोग करुन नाटकाद्वारे मिळकतीचेही साधन उपलब्ध करुन द्यावे हा रामनाथकरांचा हेतु होता. या कंपनीने मनोविजय , सत्यविजय, संतापशमन, अशी नाटके करायला सुरुवात केली. पुढे वीरतनय, विकल्प मोचन इत्यादी नाटकेही रंगभूमीवर आणली. या नाटकातील दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, नेपथ्य दिग्दर्शक, स्टेज मॅनेजर, पेटीवादक सबकुछ रघुवीरजीच असत. नेपथ्य, वेशभूषा इत्यादी कला त्यांनी हळूहळू आपल्या सहकार्‍यांनाही शिकवल्या.

रामनाथकरांची कंपनी तीन चार वर्षं चालली. चार वर्षांत तिचा गोव्यात चांगलाच बोलबाला झाला. त्यांची स्वत:ची कंपनी बंद पडल्यानंतर इतर धंदेवाईक कंपन्यांकडून व हौशी नाट्यमंडळ्यांकडून त्यांना कामासाठी आमंत्रणे येऊ लागली. पणजीच्या ‘रथसमाप्तीकर’ व चैत्रपौर्णिमाकारांचे पडदे त्यांनी रंगवून दिले. म्हापसाच्या रामनवमीकारांचे आणि धारगळ शिमगोत्सवाचे, काकोडेच्या शिमगोत्सवाचे मंडळाचे अशा अनेक मंडळाच्या नाट्यमंडळासाठी त्यानीच पडदे रंगवले.

याच सुमाराला पुण्याचे अनंत जोशी नावाचे एक गृहस्थ गोव्यात आले होते. पूर्वी तिकडच्या एका नाटक कंपनीत नट म्हणून त्यांनी काम केले होतं. जोशी गोव्यात येऊन भीषग्वर्य दादा वैद्य यांना भेटले व एखादी नाटक कंपनी तुम्ही काढाच असा हेका त्यांनी दादा वैद्य यांच्या मागे लावला. कंपनी काढून पैसे कमावण्याची कल्पना दादा वैद्य यांना मान्य नव्हती. त्यामुळे सुरूवातीला त्यांनी नकारच दिला. पण जोशींनी अधिकच लकडा मागे लावल्यावर आणि नाटक कंपनी काढली तर निदान पाच पंचवीस कलाकारांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन प्राप्त होईल, या सद्भावनेने त्यांनी नाटक कंपनीत भांडवल गुंतवण्याचे कबूल केले. आजूबाजूच्या लोकांना कलाकारांना एकत्र आणून कंपनी स्थापन झाली. बर्‍याच मसलतीअंती कंपनीचे नावही ठरले – ‘श्री विजयादुर्गा नाटक मंडळी’ – कंपनीने निवडलेले पहिलेच नाटक होते ‘मृच्छकटिक’ या नाटकाचे ठिकठिकाणी चांगले प्रयोग झाले. पुढे कंपनीने आणखी दोन नाटके बसवली. तीन वर्षे उलटायच्या आत दादा वैद्यांनी सर्वच कंपनी अनंत जोशींच्या हवाली केली.

रघुवीरजीची नाटकातील कीर्ती आता पंचक्रोशीपलीकडे पसरली होती. जवळजवळ संपूर्ण गोव्यात त्यांचे नाव झाले होते. गोव्याची सीमा ओलांडून कर्नाटक – महाराष्ट्रातही त्यांचा दबदबा होऊ लागला होता. अशीच एकदा वाशीमकर नाट्य मंडळी नावाची कंपनी गोवा दौर्‍यावर आली. पणजीला त्यांचा मुक्काम होता. याच सुमाराला रामनवमीच्या उत्सवानिमित्त स्थानिक मंडळींची नाटके चालू होती. वाशिमकर कंपनीचे काही कलाकार ही नाटके बघायला गेले होते. व्यावसायिक कंपनीच्या तोडीचा तो प्रयोग पाहुन ते थक्क झाले. तबल्याच्या दत्ताराम नानोडकर व पेटीला रघुवीर रामनाथकर, रघुवीर मामांची हार्मोनियम त्या दिवशी सुरेख वाजली होती. तशाच नाटकाचे पडदेही त्यानीच रंगवलेले. त्यांचे कौशल्य पाहुन वाशिमकर मंडळी एवढी खुष झाली की पेटीवादक कम पेंटर अशी दुहेरी भूमिका बजावणारा हा हरहुन्नरी कलावंत आपल्या कंपनीत असायला हवा असे त्यांना वाटू लागले. तसा त्यांनी आग्रहही केला. परंतु रामनाथकर यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र दत्ताराम नानोडकरांना त्यांनीच मागे लागून वाशिमकर कंपनीत दाखल व्हायला भाग पाडले.

व्यावसायिक नाटक कंपनीत जाण्याची ही हुकलेली संधी रामनाथकरांच्या आयुष्यात पुन्हा आली. पण योगायोग असा की रामनाथकरांना गोव्यातून ‘सीमोल्लंघन’ करायला लावणारी ही कंपनी मराठी नसून कानडी होती.

त्याचे असे झाले – सुमारे १९०६ सालची गोष्ट असावी. पणजीतील सुप्रतिष्ठित नागरिक विष्णुबाब धेंपे यांचे घर रंगवण्यासाठी रघुवीरजींचा मुक्काम पणजीला होता. महालक्ष्मी देवालयात रथसमाप्तीनिमित्त नाटके चालू होती. रामनाथकरांनी रथसप्तमीकरांचे पडदे रंगवून दिले होते. पेटीची साथही त्यांचीच होती. ही नाटके पहायला हुबळीचे सुबराव बेहट्टी नावाचे एक वकील येत असत. प्रेक्षकांत बसून ते ही नाटके पाहायचे. नाटकातले नेपथ्य व पडद्यांचे रंगकाम त्यांना अतिशय आवडायचे. पडदे रंगवणारा कोण हा चित्रकार ही चौकशी केली असता त्यांना रघुवीरजींचे नाव कळले व त्यांनी त्यांच्याशी ओळख करुन घेतली. हुबळीत आपला नवा बंगला बनतोय, तो रंगवायचे काम तुम्ही कराल का अशी विचारणा केल्यावर रघुवीरजीनी हुबळीला यायचे मान्य केले.

बेहट्टी वकीलांचे घर रंगवण्यासाठी रघुवीरजी हुबळीला गेले तेव्हा त्यांनी हरीराम नावाच्या आपल्या एका शिष्याला सोबत नेले होते. हरीराम हा चित्रकलेप्रमाणेच हार्मोनियम व तबला वाजवण्यातही प्रवीण होता. याच वेळी हुबळी येथे शिरहट्टी नाटक मंडळी या कानडी नाटक कंपनीचे खेळ चालू होते. रघुवीरजींचे चित्रकलेतील प्रावीण्य पाहुन या कंपनीचे पडदे रंगवण्याचे म त्यांच्यावर सोपवले व हरीरामला नाटकात पेटीची साथ करण्याचे काम दिले.

एक वर्षभर या कंपनीतील पडदे रंगवण्याचे काम करुन रघुवीरजी जावी गेले. हरिराम मात्र कंपनीतच राहिला. पुढे कंपनीचा मुक्काम हलला व ती हुबळीवरून शिरसीला गेली. तिथे हरिराम देवीची लागण होऊन मरण पावला. कंपनीने ताबडतोब रघुवीरजींना बोलावून घेतले व पेटीवादकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या कंपनीचे प्रयोग संपूर्ण कर्नाटकात तसेच म्हैसूर प्रांतात होत असत. त्यामुळे एक दोन वर्ष रघुवीरजीनी संपूर्ण कर्नाटकभर भ्रमंती केली.

या शिरहट्टी नाटक कंपनीत चैन्नेय्या व कुट्रैया नावाची स्त्रीभूमिका करणारी दोन मुलं होती. दोघांचाही आवाज बारीक परंतु पहाडी होता. पुढं कुट्रैयाचा आवाज फुटला तेव्हा यघुवीर रामनाथकर यानी त्याला पेटी वाजवायला शिकवले. सहा महिन्यात तो बर्‍यापैकी तयार झाला तेव्हा कंपनीनं पेटीवादक म्हणून त्याची नियुक्ती केली.

पुढं कंपनीच्या मुक्काम बंगळूरला हलला. एक दिवस म्हैसुरचे महाराज कृष्णराजे वोडीयार व त्यांचे माता कातराजर्स नाटक पहायला आले. रघुवीरजींनी या नाटकातील पदे काही मराठी चाली देऊन बसवली होती. पदांच्या या वेगळ्याच चाली ऐकून व रामनाथकरांचे पेटीवादनातील कौशल्य पाहुन महाराज व त्यांचे मामा खूष झाले. दुसर्‍या दिवशी कातराजर्सनी आपल्या मुलींना हार्मोनियम शिकवण्यासाठी तुम्ही याल का अशी विचारणा रामनाथकरांना केली. त्यावर आपणाला शक्य नाही, पण आपला शिष्य कुट्रैय्या ते काम करु शकेल अशी ग्वाही त्यांनी महाराजांच्या मामांना दिली. रघुवीरजींची परवानगी घेऊन कुट्रैय्या राजदरबारी रुजू झाला व तिथेच रमला. म्हैसूर महाराजांनी ‘कुट्रैयस्वामी’ असा किताब देऊन त्यांची नेमणूक केली.

दोन-तीन वर्षांनंतर रामनाथकरांनी बेळगावकर स्त्री संगीत नाटक मंडळीत एक वर्षभर पडदे रंगवण्याचं काम केलं. १९११ साली त्यांनी कोण्णूर नाटक मंडळीत प्रवेश केला. कामं तीच-पेटी वाजवणे आणि पडदे रंगवणे !

या कोण्णूर नाटक कंपनीचा मुक्काम बंगळूरला पडला असतानाची गोेष्ट. या शहरात म्हैसूर नरेशांच्या प्रोत्साहनानं स्थापन झालेली एक खास नाटक कंपनी होती. वरदाचार्य नावाचे एम. ए. झालेले व संगीताचा शौक असलेले गृहस्थ या कंपनीचे मॅनेजर होते. कोण्णूर नाटक कंपनीची नाटके पहायला ते नियमित यायचे. एक दिवस रघुवीरजींची पेटी ऐकायला ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. त्यांचं बहारदार पेटीवादक ऐकून वरदाचार्यांना एवढा आनंद झाला की त्या भरात त्यांनी आपल्या हातातील सलकडी रघुवीरजींच्या हातात घातली. म्हैसूरला जाऊन तुमचं पेटीवादन महाराजांना ऐकवा, मी सगळी व्यवस्था करतो असंही आश्‍वासन त्यांनी दिलं पण नोकरीची जबाबदारी असल्यामुळं म्हैसूरला जाण्याचा बेत रामनाथजीना रहित करावा लागला.

कोण्णूर नाटक कंपनी पुढं बळ्ळारीला गेली. हा बळ्ळारीचा मुक्काम त्यांच्या जीवनात अतिशय दुर्दैवी ठरला. रघुवीरजींच्या पत्नीला कॉलर्‍याची लागण झाली व अवघ्या पाच सहा तासांत तिला मृत्यू आला. हंपीविरुपाक्ष क्षेत्रात रघुवीरजीनी तिचे अंतिम संस्कार केले व चार मुलं आणि एक बंधु असा परिवार घेऊन ते गोव्याकडे निघाले.

पत्नीच्या मृत्यूचा मोठाच आघात रघुवीरजींच्या मनावर झाला होता. सारं काही सोडून, संन्यास स्वीकारून हिमालयात पळून जाण्याचे विचार मनात उफाळत होते. पुत्र आणि बंधु यांना त्यांनी गोव्यात पुढं पाठवलं व आपण हुबळीला विठ्ठलराव कोरगावकर यांच्याकडे आले. याच ठिकाणी वरदाचार्य यांचा त्यांना दुखवट्याचा संदेश आला. रघुवीरजींचे सांत्वन करतानाच ‘चार दिवस मन:शांतीसाठी म्हैसुरला येऊन जा’ अशी प्रेमळ सूचनाही वरदाचार्यानी केली होती. रघुवीरजी त्या सूचनांचा आदर करत म्हैसूरला निघाले. म्हैसूर नगरीत तेव्हा दसरा महोत्सव चालू होता. वरदाचार्यांच्या सहवासात काही दिवस राहिल्यावर रघुवीरजी कातराजर्स यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या राजवाड्यावर रहायला गेले. दरबारी नोकरी पत्करून कायमचे इथंच रहा असा कातराजर्सचा आग्रह होता. ही ऑफर स्वीकारण्याचा निश्चयही रघुवीरजीनी केला होता. म्हैसूरचे महाराज त्यावेळी लंडनला गेले होते. व ते परत आल्यावर रामनाथकरांची नेमणूक व्हायची होती.

पण इथंही दुर्दैव आडवं आलं. रघुवीरजींची दोन वर्षांची मुलगी आजारी असल्याची तार अकस्मात गोव्यावरून आली. त्यासरशी रघुवीरजी गोव्याकडे धावले. म्हैसूरला पुन्हा जाण्याची संधी त्यांना नंतर मिळाली नाही व रघुवीरजीनाही तिकडे जाण्याची बुद्धी झाली नाही !

कोण्णूर नाटक मंडळी सोडल्यावर रघुवीरजींनी गोकाक कर्नाटक नाटक कंपनी व सिद्धारूढ प्रासादिक नाटक कंपनी अशा दोन कंपन्यात काम केले.

कानडी नाटक कंपन्यांत म करीत असतानाच मराठी नाटक कंपन्यांतील नटांशी व मालक मंडळीशीही रघुवीरजींचा परिचय होत होता. किर्लोस्कर व त्यानंतर गंधर्व या त्या काळातील मातब्बर नाटक कंपन्या. किर्लोस्कर आदींची. त्यामधून बालगंधर्व, गणपतराव बोडस वगैरे फुटले व गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली. किर्लोस्कर कंपनीपुढे आता बालगंधर्वाच्या तोडीच्या गायक अभिनेता कुठे मिळणार ? असा प्रश्‍न उभा राहिला. किर्लोस्करचे मॅनेजर शंकरराव मुजूमदार कायम अशा नटाच्या शोधात होते. एकदा मुंबईत त्यांची भेट रघुवीर रामनाथकर यांच्याशी झाली. सोबत चिंतोबा गुरव होते.

‘बालगंधर्वाच्या बदली कुणी मिळतो का पहा ना रघुवीरमामा’ मुजूमदारांनी आपली अडचण त्यांच्या कानावर घातली.

‘पण बालगंधर्वांच्या बदली येणारा नट तेवढ्या तयारीचा नको ?’ – रघुवीरजींचा प्रश्‍न.

शंकरराव उत्तरले – ‘आता तेवढ्या तयारीचा कुठून मिळणार पण नवखा असला तरी चालेल – आम्ही शिकवून तयार करू. जुजबी गाणारा मात्र हवा’

‘तसं असेल तर एक मुलगा आहे माझ्या पाहण्यात. चौदा-पंधरा वर्षांचाच आहे. पण आवाज एकदम पहाडी.’

‘कुठं आहे हा मुलगा ?’ मुझूमदारांनी उत्सुकतेनं विचारलं.

‘तो गोव्यात असतो. माशेलला रघुनाथ माशेलकर नावाचे मास्तर आहेत. बाबा म्हणतो आम्ही त्यांना.त्यांच्याकडे गाणं शिकतो.’- रामनाथकर म्हणाले.

‘पण त्याला आणायचा कसा ?’- चिंतोबानी चिंता व्यक्त केली.

‘नाटक घेऊन गोव्याच्या दौर्‍यावर जाल तेव्हा मला सांगा. मी बाबा माशेलकरना तसंच त्या पोराच्या आईला चिठ्ठी लिहून देतो. माझं म्हणणं ऐकतील ती दोघं’-रघुवीरजी आत्मविश्‍वासानं म्हणाले.

पुढे त्यांनी खरंच दोन चिठ्‌ठ्या लिहून दिल्या. त्या मुलांना उज्वल भवितव्य आहे, त्याला नाटक कंपनीत जाऊ द्या असं रघुवीरजीनी चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यांचं म्हणणं त्या मुलाची आई व गुरु दोघांनाही नाकारता आलं नाही. पहाडी आवाजाच्या त्या मुलाला घेऊन मुजूमदार महाराष्ट्रात आले आणि मराठी नाट्याच्या नभांगणात एका तेजस्वी तार्‍याचा उदय झाला – त्याचं नाव मा. दीनानाथ मंगेशकर !

रंगदेवता रघुवीर सावकार यांचीही शिफारस रघुवीर मामांनीच केली होती व मुंबईतील कंपनीत त्यांना प्रवेश मिळवून दिला याची कहाणी मागं सांगितली आहेच.

१९१२ ते १९१७ पर्यंत सलग पाच वर्षं रघुवीरजीनी कानडी, मराठी, गुजराथी, ऊर्दु अशा अनेक नाटक मंडळीचे पडदे करुन दिले. १९१३ साली त्यांना गंधर्व नाटक कंपनीचे पडदे रंगवायचं काम मिळालं. बालगंधर्वांना ‘तुमचा मुलायम आवाज पेटीच्या साथीत नाहीसा होतोय. तुम्ही पेटीऐवजी ऑर्गन का वापरीत नाही?’ असा सल्ला देणारेही रघुवीरमामाच. त्यावेळी खुद्द बालगंधर्वानाही ऑर्गन म्हणजे काय ते माहित नव्हतं-तो ऑर्गन त्यांना रघुवीरजीनींच एस. रोझ कंपनीत नेऊन दाखवला व बालगंधर्वांच्या गायनाला ऑर्गनची साथ करुन दाखवली. बालगंधर्व खूष झाले आणि मराठी रंगभूमीवर ऑर्गनने प्रवेश केला. याचेही खरे श्रेय अर्थातच रघुवीर मामांचे.

चित्रकला, संगीत व नाटक या तिन्ही प्रांतात आपल्या प्रतिभेचा आविष्कार घडवणार्‍या रघुवीर मामांनी मूर्तीशिल्पकलेतही अद्भुत प्रावीण्य संपादन केले. गणेश चतुर्थीच्या दिवसांत बालपणापासून ते मखरे सजवण्याचे काम करीत. मखरे करता करताच त्यांनी मूर्तीकलेकडेही लक्ष वळवले. गावातल्या गणपतीच्या शाळेत चिकणमातीचे गोळे घेऊन ते गजाननाची मूर्ती करायला शिकले. पुढं त्यांनी ‘चित्रं’ करण्याचं काम हाती घेतलं. गणपती उत्सवातील विविध पौराणिक देखाव्यांसाठी अशी ‘चित्रं’ बनवण्याची पद्धत होती. गावच्या भजनी सप्ताहातही पाराच्या पालखीत देव-देवतांची चित्रं बसवली जात. रघुवीरजीनी ही कलासुद्धा पाहाता पाहाता आत्मसात केली. नंतर त्यांना बाहेरूनही निमंत्रणे येऊ लागली. केरीला दादा वैद्यांच्या घरी शेषशायी विष्णु व लक्ष्मीच्या मूर्ती त्यांनी करुन दिल्या. नागेशीचे राजे सौंदेकर यांचा एक सुबक पुतळाही त्यांनी बनवून दिला. काही देवस्थानांतील उत्सवमूर्तींचे मुखवटेही त्यांनी करुन दिले. आधी शाडूचा तोंडवळा घडवायचा, त्याबरहुकूम लाकडी मुखवटा तयार करायचा आणि त्यावर सोन्याचा किंवा चांदीचा पत्रा बसवून उत्सवमूर्तीचं श्रीमुख तयार करायचं हे तंत्र त्यांनी सूक्ष्म निरीक्षणाअंती शिकून घेतलं. कवळेच्या श्री शांतादुर्गेच्या उत्सवमूर्तीचं श्रीमुख त्यावेळी त्यांनीच बनवून दिलं होतं.

मूर्तीप्रमाणंच काही देवस्थानांच्या पालख्याही रघुवीरजींनीच करुन दिल्या होत्या. मडकईच्या नवदुर्गेची पालखी त्यांनी करुन दिली. रामनाथी देवालयाचे नूतनीकरण झाले त्यावेळी चौकाची तख्तपोशी व खांबावरच्या लाकडी कमानींचे डिझाईन रामनाथकरांनी मुंबईच्या व्हिटी इमारतीचे निरीक्षण करुन कसे बनवले त्याची कहाणी मागं सांगितली आहेच.

उत्तुंग प्रतिभा लाभलेल्या माणसांनासुद्धा नियती कधी कधी हतबल बनवते. रघुवीरजी रामनाथकरांची गत अशीच झाली. नव्वद वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं. पण वयाची सुरुवातीची साठ-सत्तर वर्षं भटकंतीतच खर्ची पडली. चित्र, नाट्य, शिल्प, गायन, वादन इत्यादी कलांशी ‘सलगी’ करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, नाटकं बसवण्यासाठी – पडदे रंगवण्यासाठी केलेली पायपीट, मूर्ती-शिल्पकलेच्या ध्यासापोटी घेतलेली मेहनत-सगळंच अपूर्व आणि अद्भुत ! पण शेवटी बाकी काय ? – तर शून्य ! एका कलेची आराधना पूर्ण झाली नाही तोच दुसर्‍या कलेची मोहिनी. उजव्या हातात ब्रश तर डाव्या हातात हार्मोनियमचा भाता, पायांना भिंगरी तर डोक्यात संशोधनाचे वेड… असं हे कलंदर जीवन रामनाथकरांच्या वाट्याला आलं. पुत्र मोहनलालचा अकाली मृत्यू पहावा लागला आणि दुसरे सुपुत्र पं. रत्नकांतजी रामनाथकर यांचा श्रेष्ठ शास्त्रीय गायक म्हणून झालेला गौरवही ‘याचि देही याचि डोळां’ पाहिला.

२१ डिसेंबर १९५७ रोजी रामनाथकरांचा एक भव्य सत्कार वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्याबद्दल गोमंतक मराठा समाज या संस्थेतर्फे करण्यात आला. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना रघुवीरमामांनी म्हटले होते –

‘‘जीवनाच्या सारीपाटावर आपण डाव मांडावा व तो कोणीतरी उधळून लावावा; उत्तम मूर्ती घडवायला घ्यावी, ती कल्पनेतील मूर्ती साकार व्हावी पण तेवढ्यातच ती कोणीतरी छिन्नभिन्न करुन टाकावी.. तशी माझ्या आयुष्याची परवड झाली आहे. जाणकार व कलेचे दर्दी म्हणतात – ‘रघुवीरला कोणत्या कलेत गती नाही ? गायन, चित्र, नाटक सर्व कला त्यांना अवगत आहेत !’ परंतु आज मात्र मी सर्व कलेत अगतिक होऊन पडलो आहे. ऐंशी वर्षात अनेक कलांशी सलगी केली, काही कला आत्मसात केल्या, काही अर्धवट सोडून द्याव्या लागल्या, अनेक नामांकित कलावंतांचा सहवास घडला. परंतु प्रत्यक्षात पदरी काय पडलं ? मी ज्या गोष्टी माझ्या हातानं केल्या त्यांचं तरी श्रेय माझ्या पदरी कुठं पडलं ?’’

पुराण कथात लहानपणी मी अनेकदा शापित यक्षांच्या कथा वाचायचो. कुणा ऋषीच्या, देवाच्या अथवा गंधर्वाच्या शापामुळं यक्षांना आपला यक्षलोक सोडून पृथ्वीवर रहायला जावं लागतं. तिथं अनेक कष्ट भोगावे लागतात. रघुवीरमामा रामनाथकरांच्या वाट्याला आलं ते असल्या या यक्षाचं जिणं. ‘मूर्ख भोगीतो राजवैभवा-पंडित फिरत भिकारी – उधो ! जीवनगती न्यारी – दैव किती अविचारी’ हे गीत जेव्हा जेव्हा कानावर पडतं तेव्हा ‘रघुवीर रामनाथकर’ हे नाव डोक्यात चमकतं. श्रुतींच्या या महान संशोधकाला माझा शिरसाष्टांग नमस्कार !