एका सावकाराचे ऋण
ज्या सावकाराचे आपल्यावरील ऋण आजन्म फेडता येणार नाही हे माहीत असूनही ते सर्वांना हवेहवेसे वाटे, असे थोर गोमंतकीय गायक नट पं. सांबप्रसाद सावकार यांनी काल वयाच्या 98 व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरून आपली शेवटची एक्झिट घेतली. वृद्धापकाळ हा खडतर असतो, परंतु सावकारांच्या चिरतरुण सदाप्रफुल्लित वृत्तीने त्यांचे व्यक्तिमत्त्व सदा दरवळलेले असे. त्यामुळे वयाच्या नव्वदीत त्यांनी ‘मी नाटकवाला’ ह्या पुस्तकातून आपल्या आठवणींची पोतडी उघडली आणि जवळजवळ सात दशकांच्या प्रदीर्घ नाट्यजीवनातील असंख्य फर्मास किस्से – कहाण्यांचा खजिना खुला केला होता. प्रकृती साथ देत होती तोपर्यंत हे किस्से ऐकवत ते रसिकांशी गप्पांची हुकमी मैफलही रंगवत असत. ते एक उत्तम गायक नट तर होतेच, परंतु सदैव आनंदी वृत्तीने जीवनाकडे पाहणारा हा दिलखुलास जिंदादिल माणूसही होता.
मराठी संगीत रंगभूमीचा चढता – पडता काळ सावकारांनी खूप जवळून पाहिला. संगीत रंगभूमीला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांचे ते एकदा नव्हे, दोनदा साक्षीदार ठरले. विशेषतः विद्याधर गोखल्यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ ह्या नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीत नवा जीव ओतला. तेव्हा स्वतः सावकारांच्या खड्या आवाजातल्या ‘जय गंगे भागीरथी’, ‘नारायणा रमारमणा’, ‘भरे मनात सुंदरा’ सारख्या बहारदार गाण्यांनी संगीत रंगभूमीला नवी उभारी दिली. नाट्यकलेकडे आपण कधी व्यवहार म्हणून पाहिले नाही. नाट्यकला हे आपल्या उदरनिर्वाहाचे साधन हेोते हे खरे, परंतु तो आपला निदिध्यासही होता असे सावकारांनी एकदा आम्हाला सांगितले होते.
रंगदेवतेची सेवा म्हणून रंगभूमीकडे निष्ठेने पाहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यामुळे रंगभूमीचा अनादर होईल असे वर्तन आपल्याकडून कधीही झाले नाही हे ते सार्थ अभिमानाने सांगत असत.रंगभूमीवर आपण पाऊल टाकतो ते पूर्वसुरींनी समृद्ध केलेला वारसा पुढे नेण्यासाठी टाकतो आहोत ही विनम्र जाणीव त्यांच्या ठायी सदैव जागी असे. त्यामुळेच आपला आवाज गेला ही जाणीव होताच नाट्यकारकीर्द ऐन भरात असूनही त्यांनी रंगभूमीला रामराम ठोकला आणि 1986 साली ते कायमचे गोव्यात परत आले.
1928 च्या चौदा डिसेंबरला वडोदऱ्यात वडील रंगदेवता रघुवीर सावकार यांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ ह्या नाटक कंपनीच्या मुक्कामी त्यांचा जन्म झाला. ह्याच नाटक कंपनीत वयाच्या पाचव्या वर्षी ‘जिंजीहून सुटका’ नाटकात बालशिवाजी म्हणून त्यांच्या चेहऱ्याला प्रथम रंग लागला. मात्र, मुलाला नाटकाचे वारे लागू नये म्हणून आईने नाटककंपनीबरोबर राहू न देता शिक्षणासाठी त्यांना म्हापशाला पाठवले. त्यांच्या आजोबांचे तेथे सोन्याचांदीचे सराफी दुकान होते. परंतु चांदीच्या तलवारी, सोन्याचा वर्ख लावलेले मुकूट आणि घरचे शालू व सोन्याचे खरे दागिने घेऊन जेथे कलाकार रंगमंचावर उतरायचे, त्या नाट्यपंढरी म्हापशातही त्यांच्या चेहऱ्याला रंग लागणे काही चुकले नाही. स्थानिक उत्सवी रंगभूमीवर त्यांनी भूमिका केल्या. पुढे पं. विनायकबुवा पटवर्धनांकडे गाणे शिकण्यासाठी म्हणून ते पुण्याला गेले, परंतु तेथे नाटकांत काम करताना राजाभाऊ परांजप्यांनी त्यांचे ‘लग्नाची बेडी’ मधील काम पाहिले आणि त्यांना बोलपटाची संधी चालून आली. त्यातूनच ‘पेडगावचे शहाणे’ ह्या बोलपटामधील नृत्यशिक्षकाची भूमिका त्यांनी केली. ‘गोरा कुंभार’ ह्या चित्रपटामध्ये त्यांनी नामदेवाची भूमिकाही केली. ‘ऊठ पंढरीच्या राजा’ ही गाजलेली भूपाळी ह्याच चित्रपटातील. मात्र, ‘तुझे नाक मोठे आहे, पडद्यावर शोभणार नाही’ म्हणत ‘लाखाची गोष्ट’ मधील पुढे राजा गोसावींनी अजरामर केलेली भूमिका त्यांना नाकारली गेली. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील संधीही नायिका संध्यापेक्षा उंची जास्त असल्याने हुकली. त्यामुळेच प्रसाद सावकार बोलपटांऐवजी नाटकांकडे वळले.
गोपालकृष्ण भोब्यांनी त्यांना मूळच्या गोव्याच्या केरी – पेडण्याच्या मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ मध्ये नेले. सावकार नारायणराव व्यासांकडे संगीतही शिकले. तेथेच शालिनी यांच्या रूपाने त्यांना सहचारिणी भेटली. एकदा बालगंधर्वांनी आपल्या उतारवयात त्यांना तू माझ्याकडे ये, मी तुला छान गाणं शिकवीन असे सांगितले होते, ती आठवण सावकारांनी ह्रदयाशी जपली होती. मो. ग. रांगणेकरांची ‘नाट्यनिकेतन’, काका गोपीनाथ सावकारांची ‘कलानिकेतन’, प्रभाकर पणशीकरांची ‘नाट्यसंपदा’ आणि भालचंद्र पेंढारकरांची ‘ललितकलादर्श’ आदी नाटक कंपन्यांमधून सावकारांची नाट्यकारकीर्द बहरली. विशेषतः ‘ललितकलादर्श’च्या ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘जय जय गौरीशंकर’सारख्या नाटकांमुळे संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून कीर्तीपताका फडकत असताना त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या. मात्र, सतत चढ्या आवाजातील गाण्याने स्वरतंतूंवर ताण येऊन त्यांचा आवाज गेला आणि त्यांची गायक नटाची कारकीर्द भरारी घेण्याआधीच अकाली संपली. गायकी हेच ज्याचे सर्वस्व अशा कलाकारासाठी हा केवढा मोठा धक्का असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो, परंतु नाट्यरसिकांशी इमान राखणे सावकारांनी महत्त्वाचे मानले आणि ह्या परिस्थितीत रंगभूमीपासून ते कटाक्षाने दूर राहिले. कलाकारांच्या मनमानीमुळेच संगीत नाटके बिघडत गेली असे त्यांचे परखड मत होते. त्यामुळे आपला आवाज जाताच त्यांनी स्वतःहून रंगभूमीला रामराम केला.
गोव्यात परतल्यावर नाट्यजीवनापासून दूर राहण्यासाठी नदीवर जाऊन तासन्तास बसून मासे पकडण्याचा छंद त्यांनी जोपासला. एकेकाळी ते फुटबॉल खेळायचे, त्यामुळे तब्येत नव्वदीनंतरही चांगली होती. त्यामुळे नाट्यनिवृत्तीनंतर जवळजवळ बावीस वर्षांनी प्रभाकर पणशीकर पुतण्या अनंत पणशीकरांसह मीना नेरूरकरांच्या ‘अवघा रंग एक झाला’साठी त्यांना शोधत घरी आले आणि वयाच्या नव्वदीत हा निष्ठावंत नट पुन्हा एकवार संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देण्यासाठी रंगभूमीवर निष्ठेने उभा राहिला. खरे तर व्यक्तिगत जीवनात मुलाचे आजारपण, नातवाचे अपघाती निधन असे अनेक आघात त्यांच्यावर झाले होते. परंतु रंगभूमीची सेवा हे कर्तव्य मानून त्यांनी परत एकदा चेहऱ्याला रंग फासला.
सावकार अत्यंत आनंदी वृत्तीने जीवन जगले. नव्या नाट्यकलाकारांना, गायक कलाकारांना त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमी लाभला. आता मात्र हा जिंदादिल गायक नट आणि संगीत रंगभूमीचा अखेरचा शिलेदार आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. संगीत रंगभूमीचे एक युग संपले आहे. मात्र, मराठी संगीत रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ह्या सावकाराचे तुमच्या आमच्यावरील ऋण मात्र कधीच फिटणार नाही.

