विशेष संपादकीय सोनाराने टोचले कान!

0
176

‘कोरोनाबाबत निश्‍चिंत राहण्याची ही मानसिकता योग्य नव्हे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वच्छ शब्दांत ठणकावले आणि रविवारी २२ मार्च रोजी स्वेच्छा संचारबंदीचे आवाहनही जनतेला केले. कोरोनाच्या समस्येचे खरे गांभीर्य पंतप्रधानांना उमगलेले आहे आणि ही अभूतपूर्व समस्या हाताळण्याताठी त्यांचे सरकार अगदी प्रारंभीपासून अतिशय प्रभावीपणे पुढे सरसावलेले आहे.
गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांचे राज्य सरकार मात्र कोरोनाच्या बाबतीत पूर्णपणे कोमात गेल्यागत वागत आले आहे. सावंत यांनी गेल्या वर्षभरामध्ये जे कमावले, ते या गेल्या आठ – पंधरा दिवसांत कोरोना हाताळणीत गमावले आहे हे आम्ही अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो. जनतेमध्ये त्यांच्या सरकारच्या कोरोना हाताळणीबाबत तीव्र असंतोष आणि संताप आहे. राज्यात अजून एकही कोरोना रुग्ण नाही याची शेखी मिरवत सगळे मंत्रिगण जिल्हा पंचायतींच्या निवडणूक प्रचारात स्वतःच गर्दीत रंगले असले तरी उद्या जर एकाएकी राज्यभरातून हजारो रुग्णांना एकाच वेळी कोरोनाची लक्षणे दिसू लागली तर काय करणार आहात? ज्या तर्‍हेने राज्य सरकारकडून कोरोनाबाबत सर्व बाबतींत सुस्त हाताळणी चाललेली आहे, परराज्यांतून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीबाबत अजूनही सारा आनंदीआनंदच आहे ते पाहाता ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही. मोदींनी व्यक्त केलेली भीती हीच आहे, कारण हा जगभरातल्या देशांना आलेला अनुभव आहे. गोमेकॉतील मोजक्या खाटांचा तथाकथित विलगीकरण कक्ष या रुग्णांना पुरे पडेल काय? राज्याच्या आरोग्ययंत्रणेचा बोजवारा उडण्यास संकटाचे काही तास पुरेसे ठरतील! गोव्यात जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत दंग झालेल्या राज्य सरकारला मोदींनी जणू जनता संचारबंदीने कानफटीत लगावली आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात कोरोना हाताळणीबाबत तीळमात्र समन्वय दिसत नाही आणि ही गोव्याची या घडीची शोकांतिका आहे. गेले काही दिवस कोरोनाबाबतच्या राज्य सरकारच्या बेफिकिरीचा हा विषय आम्ही सातत्याने लावून धरलेला आहे, परंतु नेेते येणार्‍या जिल्हा पंचायती जिंकण्याच्या गुर्मीत वावरत राहिले. बाबू आजगावकरांसारखे मंत्री कोरोनाबाबत ‘तुम्हाला हवे तर या’ ची जी भाषा करीत आहेत ती या समस्येबाबतच्या निव्वळ अडाणीपणाची निदर्शक आहे. कोरोनाचा हलकल्लोळ जगभरात चालला असताना आणि त्याचे टप्पे, त्यातून अचानकपणे वाढू शकत असलेले रुग्णांचे प्रमाण या सगळ्याचे शास्त्रीय निष्कर्ष समोर असूनही एखादा मंत्री अशी बेजबाबदारपणाची भाषा बोलूच कसा शकतो? हा सरळसरळ जनतेच्या जिवाशी मांडलेला खेळ आहे. राज्य सरकार आपल्या निर्णयांबाबत ठाम आणि स्पष्ट नाही हे तर आम्ही सतत सांगत आलो आहोत. ही संदिग्धता सरकारच्या शिगमोत्सव मिरवणुकांबाबतच्या कचखाऊ निर्णयात जशी दिसून आली तशीच आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबतच्या निर्णयातील सावळ्यागोंधळात देखील दिसली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून कोरोनावर लक्ष केंद्रित करावे असे आम्ही काल म्हटले होते. राज्यात सध्या जी नेतृत्वहीनता दिसते आहे, त्यातून कोरोनासंदर्भात जवळजवळ अराजक येऊ घातले आहे. व्हॉटस्‌ऍपवरील अफवांना बळी पडून नागरिक राज्यात धान्य आणि सामानसुमानाची बेगमी करण्यात गुंतले आहेत. पेट्रोलचा अनावश्यक साठा चालला आहे. दुकानदारांकडून साठेबाजी आणि काळाबाजार सुरू झाला आहे. सॅनिटायझरच्या बाबतीत लुटालूट चालली आहे. ज्या तडफेेने आणि अत्यंत प्रभावीपणे केंद्र सरकार कार्यरत आहे त्याच्याशी तुलना करता राज्य सरकारच्या कामगिरीची लाज वाटू लागते. या संकटाच्या घडीला राज्याच्या जनतेला विश्‍वास देणे, आश्वस्त करणे ही राज्य सरकारची जबाबदारी होती, पण नेत्यांनी तर स्वतःच शिमगा घातला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा कालचा संदेश जनतेसाठी मोठाच दिलासा आहे यात शंका नाही.