तेहरिक ई तालिबानने काल पाकिस्तानात मानवतेला लाजवणारे कृत्य केले. ज्यांचा कोणताही गुन्हा नाही अशा निष्पाप, निरागस मुलांच्या रक्ताचा सडा या दहशतवाद्यांनी पाडला. उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जी ‘झर्झ ए अझ्ब’ ही लष्करी कारवाई गेले काही दिवस सुरू आहे, त्याचा पेशावरमधील लष्कराच्या शाळेवर सशस्त्र हल्ला चढवून सूड उगवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी केला आहे. पाकिस्तानने अशा कडव्या दहशतवादी शक्तींसंदर्भात जो दुटप्पीपणा आजवर अवलंबिला आहे, त्याचेच हे कटू फळ म्हणावे लागेल. भारतामध्ये घातपात घडवून निष्पापांचे असेच बळी घेणार्या दहशतवाद्यांची एकीकडे पाठराखण करायची आणि दुसरीकडे अमेरिकेच्या अब्जावधी डॉलरच्या मदतीकडे डोळा ठेवून, स्वतःला आव्हान निर्माण करणार्या पाक – अफगाण सीमेवरील तालिबान्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा अवलंबायचा हा दुटप्पीपणा पाकिस्तान सदैव दाखवीत आला आहे. सरकारे बदलली, तरी पाकिस्तानची ही नीती काही बदललेली नाही. भारतामध्ये शहरा शहरांतून फटाके फुटावेत तसे बॉम्ब फुटत होते, शेकडोंचे बळी जात होते, भारतीय संसदेवर हल्ला झाला, मुंबईमध्ये मृत्यूचे थैमान माजवले गेले, हे सारे घडत असताना त्याकडे पाकिस्तानने केवळ अलिप्तपणे पाहिले असे नव्हे, तर उलट त्या भारतविरोधी शक्तींची पाठराखण केली. लष्कर ए तोयबा, जमात उद दावा अशा नवनव्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या आयएसआयने पोसल्या, पाकिस्तानी लष्कराने ही विषवल्ली आपल्या पंखांखाली वाढवली. तेहरिक ई तालिबानचे कालचे अमानुष कृत्य कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसले, तरीदेखील पाकिस्तानने थोडे आरशात पाहण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे. जे भारताविरुद्ध लढतात, भारतामध्ये निष्पापांच्या रक्ताचा सडा पाडतात ते दहशतवादी चांगले आणि जे पाकिस्तानमध्येच घातपात घडवतात ते तेवढे वाईट हा कुठला न्याय? पाकिस्तानी राजवटीला आता तरी शहाणपण यायला हवे. दहशतवाद हा शेवटी दहशतवाद असतो. दहशतवादी हा कधीही कुणाचा मित्र असू शकत नाही. तो माणुसकीचा शत्रूच असेल. मग तो भारताविरुद्ध लढला काय, किंवा पाकिस्तानविरुद्ध लढला काय! शेवटी रक्त सांडेल ते निष्पापांचेच. भस्मासुराला वाढवाल तर शेवटी तो तुमच्याच डोक्यावर हात ठेवील! निष्पापांच्या मृत्यूची वेदना काय असते हे नवाज शरीफांपासून परवेझ मुशर्रफांपर्यंतच्या नेत्यांना आता तरी उमगेल अशी आशा आहे. दहशतवादाविरुद्धचा लढा वेचक पद्धतीने लढता येणार नाही. ही विषवल्ली समूळच उखडावी लागेल. भारतद्वेषाचे राजकारण संपवण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील. दहशतवाद हा मानवतेचा शत्रूच आहे हे सत्य पाकिस्तानला आता तरी उमगू शकेल का? पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेली दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे जोवर सुरू आहेत, मुंबई हल्ल्याचे आरोपी जोवर पाकिस्तानमध्ये मोकळे फिरत आहेत, तोवर पाकिस्तानला हे शहाणपण आले असे म्हणता येणार नाही. मानवतेचा हा शत्रू घरच उद्ध्वस्त करायला निघालेला आहे याची तरी जाणीव पाकिस्तानी नेतृत्वाला होणार आहे का? शेवटी जे पेराल तेच तर उगवते!

