26 C
Panjim
Saturday, October 31, 2020

विशेष संपादकीय –नटसम्राट

 

मराठी रंगभूमीवरील खरेखुरे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे काल झालेले निधन हा कलाजगताला बसलेला मोठा हादरा आहे. त्यांचे वय झाले होते, गात्रे थकली होती हे सगळे जरी खरे असले, तरीही डॉ. लागू नावाचा सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक बुद्धिनिष्ठ आणि शिस्तप्रिय गुणी अभिनेता आता आपल्याला कायमचा सोडून गेला आहे ही जाणीवच अस्वस्थ करणारी आहे. गेली अनेक वर्षे ते आपल्या आवडत्या अभिनयक्षेत्रापासून वृद्धापकाळामुळे दूर होते, परंतु त्यांनी रंगभूमीवर आणि चित्रपटांमधून साकारलेल्या भूमिका आजही जशाच्या तशा रसिकांच्या मनात ताज्या आहेत. शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ अनेकांनी अनेक प्रकारे रंगवला. परंतु डॉ. लागू यांनी रंगवलेल्या नटसम्राटामध्ये त्या भूमिकेचा आत्मा जसा पकडला गेला होता तसा तो इतरांना क्वचितच सापडला. लागूंचा ‘नटसम्राट’ नाटकी वाटला नाही. त्यांची ती डुगडुगती मान, ते भेदक डोळे आणि धीरगंभीर आवाजातली सोलोलॉकी काळजाचा थरकाप उडवून जायची. ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ अशा अनेक अजरामर नाट्यकृतींमध्ये लागूंच्या अभिनयाने प्राण भरला. ‘हिमालयाच्या सावली’ च्या शेवटच्या प्रवेशात अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर चालत विंगेत जाण्याचा त्यांचा हुबेहूब अभिनय प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणायचा. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ मधील अधःपतनाच्या वाटेने निघालेल्या ध्येयवादी मास्तराच्या भूमिकेत डॉ. लागूंच्या अभिनयगुणांचे संपन्न दर्शन घडले आहे. ‘सामना’, ‘सिंहासन’सारख्या चित्रपटांना त्यांच्या जिवंत अभिनयामुळे अभिजातता लाभली. वाट्याला येणार्‍या प्रत्येक भूमिकेचा सर्वांगाने अभ्यास करून, त्या भूमिकेचे मर्म समजून घेऊन रंगभूमीवर सहजतेने ती जिवंत करण्यात डॉ. लागूंचा हातखंडा होता. त्यांचा अभिनय कधीच अभिनय वाटला नाही आणि मेलोड्रामाच्या वाटेने तर कधीच गेला नाही. महाविद्यालयीन जीवनामध्येच भालबा केळकर यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या तालमीत मिळालेल्या मार्गदर्शनावर आणि शंभू मित्रांसारख्या गुरूने दिलेला ‘अभिनेता हाच वाद्य असतो आणि वादकही’ या गुरूमंत्रावर दृढ विश्वास ठेवून प्रत्येक भूमिकेचे रूपांतर बावनकशी सोन्यामध्ये करणारा परिसस्पर्श डॉ. लागूंना लाभला होता. त्याच कसदार अभिनयाच्या बळावर ते रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत तळपले. परंतु यशाच्या, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ते त्या यशाने हुरळून गेले नाहीत. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी दिलेले तनमनधनाचे योगदान न विसरता येणारे आहे. पुरोगामी वैचारिक पाया असल्याने त्यांची काही मते वादग्रस्तही ठरली. ‘देवाला रिटायर करा’ या त्यांच्या विधानाने एके काळी फार मोठे वादळ उठले. परंतु त्याची तमा न बाळगता ते आपल्या भूमिकेशी ठाम राहिले होते. लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले, तसा द्वेषही केला. परंतु आपल्या कलेशी आणि विचारांशी ते सदैव एकनिष्ठ राहिले. त्यांची ती कसोशीची शिस्त, रंगभूमी ही गांभीर्याने वागण्याची जागा आहे ही सदैव जागी असलेली जाणीव, त्यांची ती थरारून टाकणारी स्वगते, तो अस्वस्थ करून सोडणारा जातिवंत अभिनय, ती धीरगंभीर शब्दफेक, ती डुगडुगती मान.. हे काही आता दिसणार नाही. आता मागे उरल्या आहेत त्या त्यांनी साकारलेल्या हिंदी आणि मराठीतील असंख्य भूमिकांच्या अनंत आठवणी आणि त्यांच्या त्या रंगभूमीवरील सहज अभिनयाचे आणि सजग वावराचे अगणित प्रेक्षकांच्या मनात उमटलेले अक्षय ठसे!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मेहेरनजर का?

राज्याच्या राजधानीमध्ये मांडवीच्या उरावर गोमंतकीय जनतेला वाकुल्या दाखवत तरंगणारे कॅसिनो येत्या एक नोव्हेंबरपासून पुन्हा खुले होणार आहेत. पन्नास टक्के क्षमतेने ते सुरू...

आयआयटी प्रकल्पासाठी सहकार्य द्या

>> मुख्यमंत्र्यांचे मेळावलीत आवाहन, स्थानिकांचा प्रखर विरोध मेळावलीत आयआयटी प्रकल्प उभारायचा की नाही हे आताच सरकार ठरवणार नाही. त्यासाठी...

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच कॅसिनो परवान्यांचे नूतनीकरण

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती पणजी महानगरपालिकेने कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण केलेले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...

मायकल लोबोच भाजप सोडण्याच्या तयारीत ः साळगावकरांचा आरोप

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याकडून सरकारच्या धोरणाविरोधात वक्तव्ये केली जातात. यावरून मंत्री लोबो भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा...

सिलिंडर, बँक व रेल्वे वेळापत्रक नियमांत १ पासून महत्त्वाचे बदल

संपूर्ण देशभरात रविवार दि. १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज तसेच रेल्वे वेळापत्रकाच्या नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.१ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूक केल्यानंतर...

ALSO IN THIS SECTION

मेहेरनजर का?

राज्याच्या राजधानीमध्ये मांडवीच्या उरावर गोमंतकीय जनतेला वाकुल्या दाखवत तरंगणारे कॅसिनो येत्या एक नोव्हेंबरपासून पुन्हा खुले होणार आहेत. पन्नास टक्के क्षमतेने ते सुरू...

कानपिचक्या

दक्षता खात्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध खातेप्रमुख आणि कर्मचार्‍यांना योग्य कानपिचक्या दिल्या. राज्यातील ढेपाळलेल्या प्रशासनाचे खापर सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांवरच...

उद्योगाय नमः

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आपल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सात नव्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यातील एक...

राजकीय आव्हान

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कोणाशीही हातमिळवणी न करता आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश...

प्लाझ्मा थेरपी हवीच

कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये अगदी सुरवातीपासून नवप्रभा अग्रेसर राहिला आहे. भले कोणी त्याला ‘कोविड योद्धा’ म्हटले नसेल, परंतु पावलोपावली गोमंतकीय जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारला भानावर...