विवेकानंदांच्या विचारांचा गोव्यात वर्षभर जागर

0
90

राज्यस्तरीय समिती स्थापन 

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्ताने देशभराप्रमाणेच गोव्यातही त्यांच्या विचारांचा येत्या काळात जागर करण्यात येणार असून त्यासाठी काल पणजीत उद्योगपती मोहनदास नायक यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यव्यापी समिती स्थापन करण्यात आली. संकल्पदिन, शोभायात्रा, सामूहिक सूर्यनमस्कार आणि साहित्य प्रसार अशा विविधांगी कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली असून येणार्‍या काळात हे कार्यक्रम राज्यभरात आयोजित केले जाणार आहेत.

पणजीत काल झालेल्या एका बैठकीत मडगावचे उद्योगपती मोहनदास नायक यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ज्या सुब्राय नायक यांच्या मडगावातील घरात स्वामी विवेकानंद यांचे काही काळ वास्तव्य होते, त्याच कुटुंबातील श्री. नायक यांच्या नेतृत्वाखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय समितीप्रमाणेच प्रत्येक तालुका पातळीवर व गटनिहाय अशा १८ समित्या स्थापन केल्या जाणार असून ४५० गावांमध्ये विवेकानंदांचे विचार आणि साहित्य पोहोचावे असा प्रयत्न केला जाणार आहे.
ज्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शीलेवर तीन दिवस ध्यान करून राष्ट्रीय संकल्प केला, त्याच दिवशी म्हणजे येत्या २५ डिसेंबर रोजी तालुका पातळीवर संकल्प दिन पाळला जाणार असून राज्यभरातील वीस कार्यक्रमांतून ४००० जण त्या दिवशी राष्ट्रीय संकल्प करतील. विवेकानंदांच्या येत्या जयंतीदिनी १२ जानेवारी २०१३ रोजी पणजी व मडगाव शहरात भव्य शोभायात्रा काढल्या जाणार असून पणजीतील शोभायात्रेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक श्रीनिवास धेंपो यांची निवड करण्यात आली आहे. सदर शोभायात्रेमध्ये विवेकानंदांच्या जीवनावरील चित्ररथ, विविध पथके सहभागी होणार आहेत. विवेकानंदांनी देशातील तरुणांना  बलोपासनेची दिलेली हाक लक्षात घेऊन १९ फेब्रुवारी रोजी तेरा ते अठरा वयोगटातील तरूणांच्या सामूहिक सूर्यनमस्कारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून पाच हजार विद्यार्थी दीड लाख सूर्यनमस्कार घालतील. विवेकानंदाचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी गावोगावी व घरोघरी संपर्क साधून स्वामी विवेकानंदांचा लॅमिनेट केलेला फोटो आणि पत्रक भेट दिले जाणार आहे. अशी किमान दोन लाख पत्रके व फोटो गोवाभर वितरीत केले जातील. तरूण, ग्रामायण (ग्रामीण), संवर्धिनी (महिला), प्रबुद्ध (बुद्धिवादी) आणि अस्मिता (जन जाती) अशा पाच घटकांपर्यंत विवेकानंदांचे विचार जावेत या दृष्टीने येत्या वर्षभरात प्रयत्न होतील. विवेकानंदाच्या विचारांची एक लाख पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून या सर्व कार्यक्रमांसाठी लोकवर्गणीतून निधी उभा राहावा म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येकी दीडशे रुपये देणगी स्वीकारण्याचेही ठरवण्यात आले आहे.
याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमाचे एक प्रांत संयोजक शरद कुंटे व अभय बापट उपस्थित होते. श्री. कुंटे यांचे यावेळी स्वामी विवेकानंदांविषयी व्याख्यान झाले. आपल्या देशात चारित्र्याचा अभाव ही सर्वांत मोठी समस्या असून ती दूर करण्यासाठी विवेकानंदांच्या विचारांची देशाला आज गरज आहे असे ते म्हणाले. भारतको जानो, भारतको मानो, भारतके बनो आणि भारतको बनाओ हा संदेश स्वामीजींनी दिलेला असून त्याचे अनुकरण करणे आज गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवडण्यात आलेल्या समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मीना काकोडकर व कृष्णराज सुकेरकर, सचिव – आनंद शिरोडकर, सहसचिव – किरण नायक, प्रकाश देसाई, भिवा मळीक, स्वाती केरकर, तर खजिनदार म्हणून सुभाष देसाई यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उत्तर गोवा संयोजक म्हणून वल्लभ केळकर व दक्षिण गोवा संयोजक म्हणून सुदेश कवळेकर यांचीही निवड करण्यात आली. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष श्री. मोहनदास नायक यांनी केवळ वर्षभर हे कार्यक्रम करणे पुरेसे नसून त्यानंतर समिती बरखास्त झाल्यानंतरही तरूणांपर्यंत विवेकानंदांचे कार्य पोहोचवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन केले. प्रकाश देसाई यांनी आभार मानले.