विवेकानंदांचे पणजीत स्मारक

0
54

स्वामी विवेकानंद सार्धशती शोभायात्रेच्या आझाद मैदानावर झालेल्या समारोप सोहळ्यात स्वामिजींच्या पवित्र विचारांपासून युवकांना सतत प्रेरणा मिळावी यासाठी पणजीत स्मारक उभारण्याची मागणी समितीचे अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी केली होती. त्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे दखल घेतली. आपण कन्याकुमारीला भेट दिल्यानंतर जीवनाकडील दृष्टीकोन पूर्ण बदलून गेला. त्यामुळे जागेलाही महत्त्व असते. अशा थोर पुरुषांच्या स्मारकासाठी पावित्र्य असलेली जागा महत्त्वाची असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

कन्याकुमारी येथील स्वामिजींच्या स्मारकाला युवकांनी भेट देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी योजना तयार केली आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक यांनी या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना वरील स्मारकाचे दर्शन घेण्याची संधी मिळवून द्यावी, असे आवाहन पर्रीकर यांनी केले.

स्वामिजींचे कार्य भारतापूर्ते मर्यादित नसून त्यांच्या विचारांचा जगभर गौरव होत आहे. आजच्या युवकांच्या ओठावर स्वामिजींचे गीत आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आपल्या देशात व्यक्तिगत व राष्ट्रीय चारित्र्याची वानवा निर्माण झाली आहे त्यामुळेच नको त्या घटना देशात घडत आहेत, त्यावर उपाय म्हणजे संस्कार होय, असे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अभ्यासक शरदराव कुंटे यांनी सांगितले. ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

शाळा विद्यालयांमध्ये असे संस्कार होण्याची गरज असते. याबाबतीत ही यंत्रणा कोलमडून पडल्याने देशासमोर समस्या निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कायदे आहेत. त्याला विशेष महत्त्व नाही. ते घडू नयेत यासाठी उपाय झाले पाहिजेत, असे कुंटे यांनी सांगितले. स्वतःच्या जीवनात तसेच सामाजिक जीवनात कसे वर्तन असावे याचा विचार झाला पाहिजे. आज त्याचाच अभाव असल्याचे ते म्हणाले.

आपल्या देशाच्या चारित्र्याची ध्वज स्वामिजींनी विदेशात फडकावली. भारतीय समाज उच्च नैतिक तत्त्वज्ञावर उभा आहे हे स्वामिजींनी जगाला दाखवून दिले. भारताकडे असलेली सर्व प्रकारची शक्ती जागृत करण्याचा त्यांनी मंत्र दिला होता. जे भारतीय ते आपले असल्याचे वाटले पाहिजे. हा विचार रुजविणे शक्य झाले तरच स्वामिजींना जे घडविण्याचे होते ते शक्य होऊ शकेल, असे कुंटे म्हणाले.

समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, स्वामिजींनी या देशाला अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. विश्‍वबंधुत्वाची पताका त्यांनी उंचावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. १५० व्या जयंतीच्या निमित्ताने कांपालवरून निघालेली शोभायात्रा भव्य होती. पणजीच्या इतिहासातील ही एवढी मोठी व शिस्तबद्ध अशी शोभायात्रा असल्याचे सांगून त्यात सहभागी झालेल्यांची धेंपो यांनी प्रशंसा केली.

व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, महापौर वैदेही नाईक, गौरीश धोंड, प्रा. सुभाष वेलिंगकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास सतरकर यांनी केले. राज्यपाल भारतवीर वांछू यांनी शोभायात्रेचा शुभारंभ केला.