आजच्या पत्रकारितेच्या स्वरूपाबाबत समाजामध्ये सातत्याने ओरड ऐकू येत असते आणि ‘पेड न्यूज’ सारख्या विषयांनी तर पत्रकारितेची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये हयात घालवलेले मान्यवर आपले या व्यवसायाविषयीचे चिंतन जेव्हा समाजापुढे ठेवतात, तेव्हा पत्रकारांना आजच्या पत्रकारितेच्या मर्यादा आणि तिच्यापुढील आव्हाने समजून घेण्याच्या दृष्टीने आणि समाजाला त्यांचा त्या क्षेत्राकडे बघण्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन तपासून घेण्याच्या दृष्टीने एक दिशा मिळत असते. कुमार केतकर, अरुण टिकेकर, सुरेश द्वादशीवार आदी मराठीतील मान्यवर व आदरणीय संपादकांची व्याख्याने अलीकडच्या काळात गोव्यात झाली व त्यातून उद्बोधक विचारमंथनही झाले. द्वादशीवार यांचे प्रसारमाध्यमांच्या सामाजिक बांधिलकीविषयीचे जे व्याख्यान राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने काल पणजीत आयोजित केले गेले होते, त्यामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेचे अभिनिवेशरहित, अत्यंत वास्तववादी चित्र तर उपस्थितांपुढे ठेवलेच, परंतु त्याचबरोबर या आव्हानात्मक कालखंडामध्ये स्वत्व कसे जपावे यासंबंधीचे मौलिक मार्गदर्शनही केले.
आजची पत्रकारिता ही व्रतस्थ पत्रकारिता नसून ती व्यावसायिक पत्रकारिता आहे हे एकदा समजून घेतले की, जुन्या काळाशी तुलना करीत आजच्या पत्रकारितेच्या नावाने बोटे मोडण्याची जी एक प्रवृत्ती दिसते, त्यामधील उथळपणा उघडा पडतो. व्यावसायिकता वाईट नसते, परंतु तिचा अतिरेक वाईट असतो. आपल्या व्यावसायिक मर्यादांच्या चौकटीमध्ये राहूनही प्रबोधनाचा पूर्वसुरींचा वारसा पुढे चालवता येतो, हे द्वादशीवारांनी अधोरेखित केले. ‘व्यावसायिकता वाईट नसते, तर बाजारूपणा वाईट असतो’ असे ते म्हणाले. प्रश्न फक्त एवढाच आहे की या दोन्हींमधली सीमारेषा आज फार पुसट होत चाललेली आहे आणि बाजारू संस्कृतीचा पगडा पत्रकारितेवर वाढत चाललेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ही व्रतस्थांची पत्रकारिता होती आणि टिळक – आंबेडकरांच्या नियतकालिकांतील मजकूर लोक बातमी म्हणून वाचत नव्हते, तर संदेश म्हणून वाचत होते. त्यांच्या त्या शब्दांना मंत्राचे सामर्थ्य आले होते, हे तर खरेच, परंतु आजच्या वेगळ्या काळामध्ये, व्यावसायिक स्वरूपातील पत्रकारितेमधूनही मूल्यांचा आग्रह धरता येतो आणि असा मूल्यजागर करीत प्रबोधनाची परंपरा पुढे चालवता येते. त्यासाठी राजकारण्यांप्रती नव्हे, तर वाचकाप्रती निष्ठा असावी लागते. त्याच्या सुखदुःखाशी समरस व्हावे लागते. त्याचा आवाज बुलंद करावा लागतो. आजची व्यावसायिक पत्रकारितेची आव्हाने पेलत असताना स्वतःच्या विवेकबुद्धीचा कस लावण्याचा सल्ला यासंदर्भात द्वादशीवारांनी आजच्या पत्रकारांना दिलेला आहे, तो महत्त्वाचा आहे. आपल्या वाचकाशी आणि त्याचबरोबर स्वतःच्या विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहा असे ते म्हणाले. स्वतःची विश्वसनीयता वाढतेय की कमी होतेय याचे आत्मपरीक्षण पत्रकारांनी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ‘तडजोडी कराव्या लागतात, परंतु किती खाली झुकावे एवढाच सवाल आहे’ हे त्यांचे सांगणे व्यावहारिक आहे. आजची या व्यवसायापुढील आव्हाने पेलत असताना मूल्यांशी निष्ठा राखण्याची जी विलक्षण कसरत आजकालच्या पत्रकारांना करावी लागते आहे, त्यामध्ये सुवर्णमध्य गाठणे अगदीच अशक्य नाही, हे द्वादशीवारांच्या एकंदर व्याख्यानाचे सार आहे. केवळ व्रतस्थ पत्रकारितेची कास धरून आजच्या काळात पुढे जावे म्हटले तर तसे करणार्यांची कशी ससेहोलपट होते हे अनंत भालेरावांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, परंतु त्याचबरोबर बाजारूपणापुढे सपशेल शरणागती न पत्करता ताठ कण्याने सामोरे जाण्याचे बळ स्वतःच्या विवेकबुद्धीला जागी ठेवत कसे प्राप्त करता येऊ शकते याचेही मौलिक दिशादिग्दर्शन त्यांनी केले. वृत्तपत्रांनी आणि पत्रकारांनी स्वतःची विश्वसनीयता जपली तर समाजही साथ देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, परंतु ऐश्वर्या रायच्या कन्येच्या आगमनाच्या बातमीत अधिक रस असलेला आजचा वाचक खरोखरच अशा मूल्यनिष्ठ पत्रकारितेमागे आपले बळ उभे करतो का, की तोही बाजारू संस्कृतीचाच ग्राहक बनलेला आहे, या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर मात्र वाचकांनीच द्यायला हवे.