– डॉ. पांडुरंग फळदेसाई
गणेशचतुर्थी किंवा चवथ हा गोमंतकीयांचा अत्यंत आवडता सण. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागताच प्रत्येक गोवेकर आनंदित होतो. उत्साहाने गणपती उत्सवाच्या तयारीला लागतो. वर्षातून एकदा येणार्या या सणाचे कोण कौतुक असते गोमंतकीयांना.
गणपतीच्या दर्शनासाठी जो तो आतुरलेला असतो. त्याच्या आगमनासाठी आरास सजवली जाते. माटोळी बांधली जाते. देखावा कोणता करावा याची तजवीज असते. घरात गोडधोड असते. नेवर्या (करंज्या), लाडू, कपां, शंकरपाळे, तिखशे पोहे, शेव, चिवडा, चुरमा, मोदक, पातोळ्यो इत्यादी खाद्यपदार्थांची रेलचेल होते. मुलीबाळींना आवर्जून ‘वजें’ पाठविले जाते. दारूकामाची तयारी होते.
गणपती पूजन
गणपतीचे आगमन कुटुंबातील सर्वांसाठी अत्यंत आनंददायी असते. चित्रशाळेतून मातीच्या सुरेख गणेशमूर्ती तयार झालेल्या असतात. तिथून गणेशमूर्ती घरासमोरील अंगणात पोचताच ‘राट’ दाखवून म्हणजे प्रत्यक्ष कुंकवाचे लाल पाणी ओवाळून ती घरात घेतली जाते. तिचे यथासांग पूजन होते. भाद्रपद शुक्ल तृतियेला महादेव–पार्वतीची स्थापना आणि पूजन होते. चतुर्थीला गणपतीपूजन मोठ्या धूमधडाक्यात होते. चतुर्थी आणि पंचमीला एकूण चार वेळा महाआरती होते.
पारंपरिक कलाप्रकार
महाआरतीच्या वेळी पारंपरिक सुंवारी, चंद्रावळ असे लोकसंगीताचे प्रकार पुरुषमंडळी सादर करते. त्यानंतर घुमटावरील आरत्या गायल्या जातात. त्यात कुटुंबातील सर्व आबालवृद्ध सहभागी होतात. काही कुटुंबांतील स्त्रिया पारंपरिक फुगडी खेळतात. परंतु प्रत्येक कुटुंबात होणारी गणपतीपूजनाची संगीतसेवा ही एक परंपरा बनून राहिली आहे.
बंधुभावाची अभिवृद्धी
वाड्यावाड्यांवरील आणि घराघरांतील गणपतींचे दर्शन घेणे हादेखील गोमंतकीयांच्या आवडीचा भाग. तो प्रघातच आहे. किमान पाच गणेशमूर्तींचे दर्शन घ्यावे असा संकेतच आहे. त्यानिमित्ताने गावकर्यांशी सद्भाव वृद्धिंगत होतो.
गणपती विसर्जनसोहळा
भाद्रपद शुद्ध पंचमीचा दिवसदेखील भुर्रकन निघून जातो– आणि त्या संध्याकाळी गोमंतकीयांना गणपती विसर्जनाच्या कल्पनेने एक अनामिक हुरहूर जाणवते. अत्यंत प्रिय अशा– हवाहवासा वाटणार्या– गणपतीचे विसर्जन ‘गणपती बाप्पा मोरया| पुढच्या वर्षी लवकर या॥ या जयघोषात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन विहिरी, तलाव, ओढे किंवा नदीच्या प्रवाहात केले जाते. काही कुटुंबांत पाच, सात, नऊ दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाते. थेट अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जित करण्याची परंपराही काही घराण्यांत आहे.
महाराष्ट्र आणि इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. संगीत, नृत्य, नाटक, व्याख्याने, चर्चा, स्पर्धा असे विविध साहित्यिक– सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक गणेशोत्सवातून होतात.
देखाव्यांची विविधता
गणपती उत्सवाच्या निमित्ताने विविध देखावे तयार करतात. बहुतेक देखावे हे पौराणिक कथांवर आधारलेले असतात. काही देखाव्यांतून गणपतीची विविध रूपे दाखविण्याचा प्रयत्न असतो.
गजमुखी गणपती
गणपती गजमुख होण्यामागे काही कथा आहेत. शनिदेवाची ताकद अजमावण्याची पार्वतीला इच्छा झाली. तिने शनिला आपल्या पुत्रावर दृष्टिक्षेप टाकण्यास सांगितले. शनिने तसे केले. तेवढ्यात त्या पुत्राचे शिर जळून खाक झाले. शोकाकूल पार्वती ब्रह्मदेवाकडे गेली. वर घेतला– ‘जो पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर लाव.’ पार्वतीला हत्ती दिसला. त्याचे शिर लावले आणि गजमुखी पुत्र झाला.
दुसरी कथा सांगते की, शिव–पार्वती हिमालयात फिरत असताना एक हत्तीचे जोडपे रतिक्रीडा करीत होते. ते पाहून शिव–पार्वतीने हत्तीचे रूप घेऊन रतिक्रीडा केली. त्यातून गजमुख पुत्र झाला.
आणखी एक सर्वश्रुत कथा सांगते की, पार्वतीने आपल्या अंगावरील मळ काढून एक पुरुष तयार केला. स्नानगृहात जाताना तिने त्या पुरुषाला द्वाररक्षकाचे काम दिले. काही वेळाने शंकर तिथे आला आणि स्नानगृहात जाऊ लागला. द्वाररक्षकाने त्याला अडविले. शंकर कोपला आणि त्याने रक्षकाचे शिर धडावेगळे केले. स्नानगृहातून बाहेर आलेल्या पार्वतीला ते कळल्यावर तिने शोक केला. मग शंकराने इंद्राच्या हत्तीचे शिर आणून गजमुखी पुत्र जिवंत केला.
अजून एक कथा गजमुखी गणपतीच्या निर्मितीविषयी सांगते– गणपतीची निर्मिती शिवाने आपल्या तपाच्या सामर्थ्यावर केली. तेजस्वी शिवपुत्र तयार झाला. पार्वतीला त्याचा हेवा वाटला. शंकराला अद्दल घडविण्यासाठी तिने शाप देऊन त्या तेजस्वी पुत्राला गजमुखी केले.
ऋग्वेदकाळापासूनची परंपरा
गणपतीला ऋग्वेदात ब्रह्मणस्पती म्हटले आहे. त्या वर्णनानुसार तो सुवर्णपरशू धारण केलेला ज्ञानदाता, राजाधिराज असा देव आहे. शिवगणपतीच्या संकल्पनेनुसार शिव आणि गणपती हे एकरूप आहेत. तो भालचंद्र आहे. तो नागभूषणे ल्यालेला असून त्रिनेत्र आहे. गणेशाच्या कमरेभोवती नागबंध आहे.
कथा एकदंत गणपतीच्या
गणपतीच्या एकदंत होण्यामागील कारणे वेगवेगळी सांगतात. भगवान परशुरामाने युद्धप्रसंगी गणपतीवर परशू फेकून एक दात मोडला. शंकराने रागाच्या भरात गणपतीचा एक दात मोडला. आपल्याकडे उपहासाने पाहत हसणार्या चंद्राला अद्दल घडविण्यासाठी त्याने आपला दात मोडून चंद्रावर फेकला. गजमुख असुराशी लढताना त्याचा एक दात मोडला. गणपतीने देवान्तक असुराशी लढाई केली, त्यात असुराने त्याचा दात मोडला. मग गणपती क्रूद्ध होऊन त्याने देवान्तकाच्या मस्तकाच्या ठिकर्या उडविल्या.
मानवी चित्ताच्या पाच भूमिका सांगितल्या आहेत. त्या म्हणजे, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र व निरोधक. या सर्व भूमिकांना प्रकाशमान करणारा तो चिंतामणी. त्याच्या पूजनाने आयुष्यातील चिंतांचा नाश होऊन पूर्ण शांती लाभते.
आध्यात्मिक गणपतीच्या संकल्पनेत गणपती सर्वस्व आहे. तोच तत्त्व, तोच प्रत्यक्ष ब्रह्म, तोच आत्मा आणि ज्ञान–विज्ञानमय अर्व सर्वस्व आहे. तो प्रकाशमान आहे. दिव्याची ज्योत म्हणजे प्रकाशपर्व. ती लाल असते. उगवणारा सूर्यदेखील लाल असतो. म्हणून या प्रकाशपर्वाचा महामेरू तो गणपती. म्हणूनच त्याला रक्तवस्त्र, रक्तपुष्प आणि रक्तचंदन यांची आवड.
विनायक अवतार
गणपतीचे महोत्कट विनायक, गुणेश, गणेश आणि धूम्रकेतू असे चार अवतार असल्याचे गणेशपुराणात वर्णन आहे.