विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी काँग्रेस तयार

0
10

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पवन खेरा यांचे प्रतिपादन

राज्यातील आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या व्यापक आघाडीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे, असे निवेदन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, राज्यसभा खासदार पवन खेरा यांनी गोवा रक्षण यात्रेनिमित्त काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केले.
आम आदमी पक्षाचे नेते पक्षातून फुटून गेलेल्या आमदारांचा मुद्दा उपस्थित करून कॉँग्रेस पक्षावर टीका करीत आहे. या आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील 6-7 खासदार फुटले आहेत. त्यामुळे त्या पक्षाने पक्षांतराच्या मुद्यांवरून कॉंग्रेसवर टीका करू नये, असेही खासदार पवन खेरा यांनी सांगितले.

भाजप सरकारने गोव्यातील जमीन, नद्या, समुद्रकिनारा, पर्यावरण, रोजगाराच्या संधी आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्याशी पद्धतशीरपणे तडजोड केल्याचा आरोप खासदार खेरा यांनी केला. गोव्यातील जमीन, समुद्र, नद्या आणि पर्यावरण नष्ट केले जात आहे. बेरोजगारी, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि कायदा-सुव्यवस्थेची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी काम करत असल्याचा भाजपचा दावा खोटा आहे, असेही खेरा यांनी सांगितले.

गोव्यातील अमली पदार्थांची समस्या गंभीर बनली आहे. गोवा सरकारच्या कॅसिनो धोरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गोवा रक्षण यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते थेट जनतेपर्यंत पोहोचत असून, रोजगार, जमीन, पर्यावरण, अमली पदार्थ, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. काँग्रेस पक्ष सुरक्षित, पर्यावरणाचे संरक्षण करणारा, रोजगार केंद्रीत, अमली पदार्थमुक्त आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या गोव्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहे, असेही श्री. खेरा यांनी सांगितले. यावेळी गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, निशांत आनंद आणि मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते.

गोवा फॉरवर्डने भूमिका
स्पष्ट करावी ः आप

गोवा फर्स्ट आघाडीबाबत गोवा फॉरवर्डने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीसाठीच्या गोवा फर्स्ट आघाडीची घोषणा केल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करून या आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचा समावेश करण्याची भूमिका घेतली आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फर्स्टमध्ये सर्व विरोधी पक्षांचा समावेश होण्याबाबत भूमिका मांडली आहे.

पितृपक्ष संपल्यावर भूमिका ः कामत
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे गोवा फर्स्ट या आघाडीबाबत राज्यातील लोकांची मते जाणून घेत असून पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या काळात गोवा फर्स्ट या आघाडीबाबत आपली भूमिका मांडतील, असे गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनी सांगितले.