Home Featured विरोधी पक्षांच्या आघाडीचा निर्णय आज

विरोधी पक्षांच्या आघाडीचा निर्णय आज

0

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर होणार अंतिम निर्णय; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला, तरी देखील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या पक्षांच्या आघाडीबाबत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आघाडीच्या विषयावर शुक्रवारी अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती गोवा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा प्रदेश निवडणूक समितीच्या बैठकीनंतर कॉँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी यांच्या आघाडीविषयी चर्चा सुरू आहे. तथापि, अजूनपर्यंत जागा वाटपाच्या विषयावरून आघाडीबाबत एकमत झालेले नाही. त्यात काँग्रेसने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल आरजीपीने देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीची तातडीची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसच्या काही उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून नावे निश्चित केली आहेत. काँग्रेसकडून आणखी काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील जागा वाटपाबाबत गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. गोवा फॉरवर्डसोबत विधानसभा निवडणुकीपासून आघाडी आहे, तर आरजीपीसोबत काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. ज्या जागांबाबत कोणताही वाद नाही, अशा 11 मतदारसंघात काँग्रेसने उमेदवाराच्या नावांची घोषणा केली होती. आता, आरजीपीने उमेदवारांची नावे जाहीर केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांताक्रूझ मतदारसंघात विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य काँग्रेसचा आहे. त्या ठिकाणी आरजीपीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे, असेही अमित पाटकर यांनी नमूद केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या आघाडीच्या विषयावर काँग्रेस पक्ष गंभीर आहे. राज्याच्या हितार्थ ही आघाडी झाली पाहिजे. आघाडीच्या विषयावर वक्तव्य करून सनसनाटी निर्माण करायची नाही. पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत अंतिम निर्णय
काँग्रेसच्या बैठकीत आघाडीच्या विषयावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे शुक्रवारी गोव्यात येणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत आघाडीच्या विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

आघाडी झाली पाहिजे : डिकॉस्टा
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कॉँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडी झाली पाहिजे, असे मत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले. राजकीय पक्षांना या आघाडीसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागत असेल, तर त्याग करायची तयारी ठेवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.