विरोधक पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर

0
8

गांधी स्मृती स्थळावर केले अभिवादन

देशातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ः राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसह नवी दिल्ली येथील गांधी स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले. राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. काल गुरुवारी संध्याकाळी राहुल यांच्या निवासस्थानी एक सभा झाली. त्यानंतर, सर्वजण 30 जानेवारी मार्गासाठी बसने निघाले. मात्र, पोलिसांनी बसेस आणि बॅरिकेड्स लावून त्यांचा मार्ग आधीच अडवला होता. रात्री हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आला.

राहुल गांधींसोबत बसमध्ये असलेल्या खासदारांमध्ये शिवसेनेचे (यूबीटी) अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि सौगता रॉय, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ मांझी, राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) मीसा भारती आणि संजय यादव, सीपीएमचे जॉन ब्रिटास, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) केपी संतोष कुमार, समाजवादी पक्षाचे रामजीलाल सुमन आणि आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर यांचा समावेश होता.

यावेळी राहुल यांनी, आपण त्या विद्यार्थ्यांचे स्मरण करत आहोत ज्यांना आपण गमावले आहेत. ज्यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तसेच, न्याय आणि उत्तरदायित्वाची शांततापूर्ण मार्गाने मागणी करत असताना मारहाण झाल्यामुळे जे विद्यार्थी आज जखमी झाले आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

सीजेपीचे आज देशव्यापी आंदोलन
कॉक्रोज जनता पार्टीने आज शुक्रवारी राष्ट्रव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. देशभरात होणारे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, संपूर्ण देशभरात एकाच वेळी आंदोलन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांनी या सगळ्यात सहभागी व्हावे असेही आवाहन सीजेपीने केले आहे. या आंदोलनासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. सर्वजण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी सीजेपीकडून करण्यात आलेल्या चार मागण्या सर्वांना वाचून दाखवाव्यात असे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी आंदोलनस्थळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा द्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.

सीजेपीच्या चार मागण्या
सीजेपीने चार प्रमुख मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सीजेपी केलेली आहे.

जलदगती न्यायालयाद्वारे विद्यार्थ्यांना न्याय ः मोदी

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरील आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या एक्स वॉलवर पेपरफुटीच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन केले जाईल. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही असे लिहिले आहे. देशात आतापर्यंत पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र जलदगती न्यायालये नव्हती. अशा प्रकरणांची सुनावणी सामान्य न्यायालयांमध्ये होत असे, त्यामुळे निकाल येण्यासाठी अनेकदा अनेक वर्षे लागत असत. आता पंतप्रधानांनी पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून त्यांची सुनावणी आणि निकाल लवकर लागू शकेल.

चर्चेसाठी केंद्राचा चारवेळा प्रस्ताव

सरकारने गुरुवारी कॉक्रेज जनता पक्षासोबत कोणत्याही वेळी चर्चा करण्यास तयार आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत सीजेपीला जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात चर्चा करण्याचा प्रस्ताव चारवेळा देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सीजेपीने हा प्रस्ताव फेटाळला. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी, जर सरकारला चर्चा करायची असेल, तर त्यांनी जंतर मंतरवर यावे किंवा तटस्थ ठिकाणी चर्चा करावी. आम्ही कोणाच्याही घरी किंवा कार्यालयात जाणार नाही.

सलग चौथ्या दिवशीही
लोकसभा-राज्यसभा ठप्पसंसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चार दिवस झाले तरीही काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. 20 जुलैपासून अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवारीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सलग चौथ्या दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक दिसले. सरकारने आधी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, त्यानंतरच चर्चा करून अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. तर विरोधक अटींसह चर्चा करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हिंसाचार केलेल्यांचा पोलिसांकडून शोध

नीट पेपरफुटी प्रकरणी सीजीपीने संसदेवर काढलेल्या मोर्चाच्यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच पोलिसांच्या गाड्याही फोडण्यात आल्या होत्या. या आंदोलनात काही समाजकंटक घुसले होते व त्यांनी हा हिंसाचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या समाजकंटकांवर आता पोलिसांनी त्यांचा सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू केला आहे. हिंसाचार घडवून आणणाऱ्या आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. हिंसाचार घडवून आणणाऱ्या किंवा त्यात थेट सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जात आहे.

विरोधी पक्षाकडून चर्चेची टाळाटाळ ः नितीन नबीन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. त्यांनी, सरकार सभागृहात ‘नीट’सह तरुणांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे, परंतु विरोधी पक्ष ही चर्चा टाळत असल्याचे सांगितले.