26.2 C
Panjim
Sunday, July 25, 2021

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना तंतोतंत लागू होतो असे ‘राजकीय चाणक्य’ म्हणता येतील असे बुजुर्ग नेते म्हणजे अर्थातच शरद पवार. एखाद्या पुरातन वटवृक्षासारखे शरद पवार सर्व भाजपेतर छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांसाठी एक आधारस्तंभ बनून राहिले आहेत. आपली हीच वडिलधार्‍याची भूमिका बजावीत पवारांनी आज दिल्लीतील आपल्या निवासस्थानी सर्व विरोधीपक्षीयांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. पवार जेव्हा अशा प्रकारची बैठक बोलावतात तेव्हा साहजिकच ‘विरोधी आघाडी’ची चर्चा रंगत असते. खरे तर अद्याप लोकसभा निवडणुकीला बराच वेळ आहे. तत्पूर्वी उत्तर प्रदेशसारख्या देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या राज्याची विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीत गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडसोबत होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये हिमाचल प्रदेशची आणि डिसेंबरमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून ह्या सगळ्या राज्यांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवार ही विरोधकांची मोट बांधायला जातीने निघाले आहेत असे दिसते.
काही दिवसांपूर्वी निष्णात राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी पवारांची मुंबईत ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेऊन राजकीय चर्चा केली होती. त्यानंतर काल ते पुन्हा पवारांना दिल्लीत भेटले. पवारांच्या मनात नेमके काय चालते ह्याचा अंदाज बांधणे कोणालाही शक्य होणारे जरी नसले तरीही ही पार्श्वभूमी लक्षात घेता आजच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या आगामी राजकीय वाटचालीची चाचपणी निश्‍चित होईल असे म्हणायला हरकत नसावी.
पश्‍चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडूसारख्या राज्यांमधील देदीप्यमान विजयामुळे भाजप विरोधकांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलेला आहे. शिवाय देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये आज भाजपेतर पक्षांची सरकारे आहेत. पश्‍चिम बंगाल, उडिसा, आंध्र, तेलंगण, तामीळनाडू, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, छत्तीसगढ अशा सर्व राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता असल्याने येणार्‍या निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्र येण्याचे बेत रचले जाणे साहजिक आहे. शिवाय पंतप्रधान मोदींची लोकप्रियता त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत ह्या दुसर्‍या कार्यकाळात बरीच ओसरलेली दिसते आहे. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून विरोधी पक्ष एकजुटीने भाजपाला एकाकी पाडून सत्तेपासून वंचित ठेवण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. प्रमुख भाजपेतर विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस मात्र आज निर्नायकी स्थितीत असल्याने ह्या विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत नाही आणि भाजपेतर पक्षांमध्ये बहुतेक प्रादेशिक पक्षच ताकदवान असल्याने त्या पक्षांच्या नेत्यांभोवती राष्ट्रीय नेत्याचे वलय नाही. ह्या परिस्थितीमध्ये पवारांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले तर नवल नाही. पंतप्रधान मोदींच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत समर्थ चेहरा विरोधकांना हवा आहे. तत्पूर्वी निवडणुका होणार असलेल्या राज्यांमधून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचीही जरूरी विरोधकांना भासते आहे. त्यासाठी एकत्र आल्याखेरीज प्रत्यवाय नाही हे विरोधकांना आजवरच्या अनुभवातून कळून चुकले आहे. त्याच दृष्टीने ही बैठक व व्यूहरचना असू शकते. अर्थात, पवारांसारखा मुरलेला नेता आपले पत्ते कधीच पूर्णपणाने खोलणार नाही हे तर उघड आहेच. पण किमान विरोधी पक्ष कितपत एकत्र येऊ शकतील ह्याचे अंदाज आजच्या बैठकीतून बांधता येऊ शकतील. अलीकडेच तृणमूल कॉंग्रेसच्या आसर्‍याला गेलेले यशवंत सिन्हाही पवारांसोबत ह्या व्यूहरचनेसाठी पुढे सरसावलेले आहेत. कॉंग्रेस पक्ष मात्र अजूनही आपल्या गतवैभवाच्या दिवास्वप्नांत गुरफटलेला दिसतो. पक्षाने पवारांच्या निमंत्रणाला अजून तरी थंडा प्रतिसाद दिलेला आहे. ‘कॉंग्रेसविना विरोधकांची आघाडी शक्य नाही’ अशा वल्गना कॉंग्रेसी नेते अजूनही करीत असले, तरी खरोखर ह्या विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत कॉंग्रेस पक्ष आहे का ह्याचा विचार त्यांनी करायला हवा. कॉंग्रेस जर यातून बाहेर राहणार असेल तर ‘तिसरी आघाडी’ साकारण्याच्या दिशेने प्रादेशिक पक्षांची हालचाल राहील. मोदी आणि भाजपा विरोध हा एकमेव अजेंडा ठेवून ही मंडळी एकत्र येत असली तरी भाजपच्या प्रचंड संघटनात्मक आणि आर्थिक ताकदीचा ती सामना खरेच करू शकतील का आणि त्यासाठी मुळात आपापले स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतील का ह्याबाबत अर्थातच मोठे प्रश्नचिन्ह आहेच!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

ALSO IN THIS SECTION

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...