Home Featured विरोधकांच्या आघाडीचा तिढा कायम

विरोधकांच्या आघाडीचा तिढा कायम

0

उमेदवारांची घोषणा सुरुच; कालची बैठक टळली; माणिकराव ठाकरे आज गोव्यात; आरजीपीकडून स्वबळावर लढवण्याचे संकेत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) या तीन विरोधी पक्षांतील आघाडीचा तिढा कायम आहे. इंडिगोचे विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने काल काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे गोव्यात पोहोचू शकले नाही. परिणामी नियोजित बैठक न झाल्याने आघाडीविषयी कोणताही निर्णय झाला नाही. त्यातच काँग्रेस आणि आरजीपीने काल आणखी उमेदवार जाहीर केले. आरजीपीने आत्तापर्यंत 26 उमेदवारांच्या नावांची घोषणा करून स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांची आघाडी होते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल आघाडीविषयी भाष्य केले. काँग्रेस पक्षाने आघाडीसाठी चर्चा सुरू असलेल्या 23 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा अजूनपर्यंत केलेली नाही. ज्या 22 मतदारसंघांत आघाडीसाठी चर्चा सुरू नाही. त्याच मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्ष आघाडीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे इंडिगो विमानसेवेतील व्यत्ययामुळे काल गोव्यात येऊ शकले नाहीत. माणिकराव ठाकरे हे शनिवारी गोव्यात दाखल होणार असून, आघाडीच्या विषयावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आघाडीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 22 मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी व्हावी, या उद्देशाने 23 मतदारसंघात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. गोव्याच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने तडजोड करण्याची तयारी ठेवली आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

दरम्यान, गोवा फॉरवर्डने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अजूनपर्यंत उमेदवारांच्या नावांची रितसर घोषणा केलेली नाही. आघाडीच्या विषयावर चर्चा सुरू असल्याने गोवा फॉरवर्डने उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. तथापि, त्यांच्या उमेदवारांनी काही मतदारसंघात प्रचारकार्याला सुरुवात केलेली आहे.
सध्या, आरजीपीने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या विषयावरून आक्रमक भूमिका घेतल्याने हा पक्ष आघाडीत सामील होणार की नाही हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. तथापि, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित पाटकरांनी आरजीपीचे नाव घेणे टाळले
काल पत्रकारांशी बोलताना अमित पाटकर यांनी शनिवारी आघाडीच्या विषयावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आघाडीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे सांगितले. मात्र यावेळी त्यांनी आरजीपीचे नाव घेणे टाळले, तसेच त्यांच्यासोबत चर्चा होईल की नाही, यावरही कोणतेही भाष्य केले नाही.

आरजीपीकडून 14, तर काँग्रेसकडून 11 उमेदवार जाहीर

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) काल 14 उमेदवार, तर काँग्रेस 11 उमेदवार आणि आम आदमी पक्षाने 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आरजीपीने आत्तापर्यंत 26 उमेदवार, काँग्रेसने 22 उमेदवार आणि आपने 34 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने 40 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

आरजीपीने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची 14 उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी काल जाहीर केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या धारगळ मतदारसंघातून अनिल हरमलकर, कळंगुटमधून अनाया कांदोळकर, सुकूरमधून टियोटोनियो जॉन फेलिक्स लोबो, रेईश मागूशमधून अर्लिन ब्रागांझा, पेन्हा दा फ्रान्समधून रोहन धावडे, चिंबलमधून दीपिका काणकोणकर आणि नगरगावमधून निलेश गावकर यांना उमेदवारी दिली आहे.
आरजीपीने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या उसगाव गांजे मतदारसंघातून निरुपा गावडे, रायमधून आन्तोनिटा फर्नांडिस, कोलवामधून अँटोनी रॉबर्ट्स, वेळ्ळीमधून डग्लीझ फर्नांडिस, सावर्डेतून सप्नेश गावकर, धारबांदोड्यातून गीतेश गावकर आणि कुठ्ठाळीतून अँजेलिन टेलिस यांना उमेदवारी दिली आहे
आपकडून 5 उमेदवार जाहीर
आपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा काल केली. आपने आत्तापर्यंत एकूण 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तोरसे मतदारसंघातून केशव कांबळी, लाटंबार्सेतून छाया नाईक, कारापूर-सर्वणमधून राज गावकर, रेईशमागूशमधून प्रगती पेडणेकर आणि कुर्टीतून मीनू गावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

काँग्रेसकडून 11 उमेदवार जाहीर
काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा काल केली. काँग्रेसने आत्तापर्यंत एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या हळदोणा मतदारसंघातून मारिया मिनेझिस, पेन्हा दा फ्रान्समधून एल्ड्रिच ब्रूस डिसोझा, सांताक्रूझमधून शायनी ऑलिव्हेरा आणि होंड्यातून कृष्णनाथ रामा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कुर्टी मतदारसंघातून रामदास टेमयेकर, गिरदोलीतून संजय अर्जुन वेळीप, शेल्डेतून रोझारियो मारियानो फर्नांडिस, बार्सेतून रोशन रुपेश वेळीप, खोलातून सुमित्रा पागी, सांकवाळमधून वसंत नाईक आणि कुठ्ठाळीतून सँड्रा रॉड्रिग्ज यांना उमेदवारी दिली आहे.

39 उमेदवारी अर्ज दाखल
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी एकूण 39 उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले असून आत्तापर्यत एकूण 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.