विराटने दिले रघूला श्रेय!

0
156

>> त्याच्या’मुळेच वेगवान गोलंदाजीविरुद्धची फलंदाजी सुधारली

भारतीय खेळाडू जलदगती गोलंदाजांसमोर निर्धास्तपणे खेळण्याचे सारे श्रेय रघू याला जाते, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने सांगत पडद्यामागील कलाकाराचे नाव उघड केले.

‘थ्रो डाऊन स्पेशलिस्ट’ डी. राघवेंद्र हा ‘साईडआर्म’च्या साहाय्याने ताशी १५०-१५५ किलोमीटर वेगाने नेट्‌समध्ये चेंडू टाकत असल्याचा प्रचंड फायदा संघातील सर्व फलंदाजांना झाल्याचे कोहलीने सांगत रघू याचे तोंडभरून कौतुक केले. बांगलादेशचा स्टार खेळाडू व सलामीवीर तमिम इक्बाल याच्याशी ‘इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट’मध्ये त्याने गुपीत उघड केले. खेळाडूंचे पदलालित्य, त्यांचे कच्चे दुवे, त्यांच्या बॅटची हालचाल ओळखून रघू उचूकपणे चेंडू फेकतो. २०१३ पासून संघासोबत असलेल्या रघूने काळाप्रमाणे चेंडू फेकण्याचे तंत्र अधिक विकसित केले आहे. त्यामुळे मैदानावर एखाद्या जलदगती गोलंदाजाचा सामना करताना जास्त वेळ मिळतो, असे कोहली म्हणाला.

राघवेंद्र याची पाठ थोपटून झाल्यानंतर कोहली याने दबावाखाली खेळताना अधिक मजा येत असल्याचे सांगितले. धावांचा पाठलाग करताना किंवा दुसर्‍या टोकाने झटपट गडी बाद होत असताना कधीच स्वतःच्या क्षमतेविषयी शंका घेतली नाही. प्रत्येक माणसाची बलस्थाने व कच्चे दुवे असतात. नकारात्मक बाजूदेखील असते. विदेशी भूमीवर सराव सत्रात चेंडू व्यवस्थितपणे बॅटवर न आल्यास किंवा चेंडूंचे टायमिंग साधण्यात अडचणी आल्यास थोडीशी चिंता वाटते. परंतु, हा काळ खूप अल्प असतो. आपण काहीही करू शकतो ही भावना अंगी बाळगल्यास काम सोपे होते, असे कोहली म्हणाला. सामन्यावेळा अधिक विचार करण्याची गरज नसते. परिस्थिती पाहून खेळ केल्यास काम सोपे होते, असे भारताकडून ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकलेल्या विराटने सांगितले. खरे सांगायचे झाल्यास लहानपणी मला भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना हरल्यानंतर खूप दुःख व्हायचे. आपण असतो तर ३८० धावांचा पाठलाग नक्कीच केला असता असे वाटून आपण झोपी जायचो, असे कोहली म्हणाला. २०११ साली होबार्ट येथे ३४० धावांचा पाठलाग आम्ही ४० षटकांत केला होता. या लढतीत मी रैनाला दोन टी-ट्वेंटी सामने सलग खेळतोय, असा विचार करून फलंदाजी करायला सांगितले होते. पहिली वीस षटके खेळून नंतर उर्वरित वीस षटकांचा विचार करू, असे ठरविल्यानेच पाठलाग शक्य झाला होता, असे कोहली पुढे बोलताना म्हणाला. आपल्या ‘स्टान्स’मध्ये केलेल्या बदलाची माहितीदेखील कोहलीने दिली. स्थिर राहून फटके खेळणे कठीण होत असल्यामुळे ‘स्टान्स’मध्ये थोडा बदल केल्याचे कोहलीने सांगितले. कंबरेची स्थिती व्यवस्थित असली तर कोणताही फटका खेळणे सहज शक्य होत असल्याचे कोहली म्हणाला. सचिन तेंडुलकर याचा स्टान्स स्थिर होता. परंतु, त्याचे तंत्र खूप सरस होते. डोळे व हातांचा ताळमेळ अप्रतिम होता. त्यामुळे त्याला स्थिर स्टान्सने खेळणे सोपे गेले, असे सांगत कोहलीने मास्टर ब्लास्टरचे कौतुक केले. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरीसुद्धा लहान-लहान गोष्टींचे प्रयोग करण्याचे थांबवू नका. एकावेळी एक प्रयोग करून त्याचा भरपूर वापर करा. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मग दुसर्‍याकडे वळा, असा सल्ला कोहलीने नवोदित तसेच प्रस्थापितांना दिला.