विनोदी भूमिकांचे यश प्रेक्षकांवर अवलंबून

0
63

निर्मिती सावंत यांचे मत 

माझ्या विनोदी भूमिकांमधून रसिकांना मनस्वी आनंद मिळत असेल तर मला कॉमेडी क्वीन म्हणून घ्यायला व हे बिरूद मिरवायला निश्‍चितच आवडेल असे अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कलाकाराने चित्रपट, नाटक, दूरदर्शन या माध्यमांचा योग्य अभ्यास केला तर त्याला यश मिळू शकते असे त्यांनी सांगितले. 

‘अहो ! राहु द्यानं घरी !’ या आपल्या नाटकाच्यानिमित्ताने निर्मिती सावंत सध्या गोवा दौर्‍यावर आहे. टी.व्ही. व वाहिन्यांवरील मालिकांमुळे ग्लॅमर मिळते. लोकांपर्यंत दूर पोचता येते. सिनेमा हा ‘लॉंग लास्ट प्रोडक्ट’ असतो. असे असले तर नाटक करताना सलग अडीच तास प्रेक्षकांसमोर वावरावे लागते. रसिकांचा प्रतिसाद समोरासमोर लाभतो, त्यामुळे नाटकात जास्त रमते असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नाटकाबरोबर चित्रपट व दूरदर्शनही आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.
दूरदर्शन, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमात आपले स्वत:चे असे स्थान निर्माण केलेल्या निर्मिती सावंत यांच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यात आवड म्हणून भूमिका करीत होते. व्यावसायिक नाटकांचा कधीच विचार केला नव्हता. त्यांनी सांगितले की, दिग्गज निर्माते मोहन वाघ यांनी आपली भूमिका बघून ‘डबल ट्रबल’ या नाटकात भूमिका करण्याविषयी विचारले, तेच पहिले व्यावसायिक नाटक व व्यावसायिक रंगभूमीवरील पहिली एन्ट्री. त्याआधी गंभीर भूमिका केल्या होत्या व त्यासाठी पुरस्कारही लाभले होते. ‘डबल ट्रबल’नंतर विनोदी अभिनेत्री म्हणून ओळख प्रस्थापित झाली.
आपल्या नाटकाबाबत त्या म्हणाल्या, नाटकाचे अल्पावधीत ८० प्रयोग झाले. ‘खूप हसा आणि अंतरमुख व्हा’ असा संदेश हे नाटक देते, असे त्या म्हणाल्या.