विनासायास गृहकर्ज मिळविण्यासाठी

0
66

– शशांक मो. गुळगुळे

गृहकर्ज वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज ही प्रामुख्याने किरकोळ कर्जे या प्रकारात मोडतात. या कर्जांची रक्कम कॉर्पोरेट कर्जांच्या तुलनेत फार कमी असते. ही कर्जे बुडण्याचे प्रमाण फार कमी असते, आणि समजा या प्रकारातील कर्जे थकित झाली तर रकमेचा आकडा फार कमी असतो. ही कर्जे जास्त दिल्यामुळे ग्राहक संख्येत वाढ होते. हे कर्ज घेणारे त्याच बँकेत बचतखातेही उघडतात, त्यामुळे बचत खात्यातील खातेदारांची वाढ होते. बँका कर्जाच्या बाबतीत जशा किरकोळ कर्जे देण्याला प्राधान्य देतात तशा ठेवींच्या बाबतीत बचत व चालू खात्यातील ठेवी जमा करण्याला प्राधान्य देतात. चालू खात्यावर व्याज दिले जात नाही व बचत खात्यावर सुमारे चार टक्के व्याज दिले जाते. परिणामी बँकांचे नफ्याचे प्रमाण अधिक राहते.

गृहकर्ज

या किरकोळ स्वरूपातील कर्जांपैकी गृहकर्ज घेताना महत्त्वाच्या बाबी म्हणजे कर्जदाराला हवी असलेली रक्कम व त्यासाठीची त्याची पात्रता. कर्ज देताना कुठलीही बँक कर्ज घेणार्‍याची आर्थिक बाजू कितपत सुदृढ आहे याची खात्री करून घेते. गृहकर्जासाठी अर्ज करणार्‍याच्या आर्थिक उत्पन्नाच्या सुमारे पाच पट गृहकर्ज मिळू शकते. नवरा-बायको या दोघांचा पगार एकत्र दाखवून आर्थिक बाजू भक्कम दाखविण्याचीही सोय आहे. असे केल्याने गृहकर्जाची रक्कम जास्त मिळू शकते.
तणावमुक्त मानसिक स्थितीत गृहकर्ज मिळविण्यासाठी-
१) अर्ज करण्याच्या आधी, अर्ज करतेवेळी जी-जी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती-ती सर्व कागदपत्रे तयार ठेवा. २) आपल्या आर्थिक उत्पन्नामुळे व ‘टेकहोम सॅलरी’मुळे गृहकर्ज किती रकमेपर्यंत संमत होईल हे समजून घ्या. मग मागाहून नैराश्य येणार नाही. ३) आपला क्रेडिट रिपोर्ट काढून घ्या. जर या क्रेडिट रिपोर्टमधील शेर्‍यांमुळे आपल्याला कर्ज मिळण्यात अडचण निर्माण होणार असेल तर शक्य झाले तर हा क्रेडिट रिपोर्ट सुधारून घ्या. ४) गृहकर्ज घेण्यापूर्वी आपली अगोदरची काही कर्जे असल्यास शक्यतो त्यांचा भरणा करा. ५) तुमच्या मते तुमची कागदपत्रे योग्य आहेत तरी कर्ज देणारी संस्था नकारात्मक धोरण अवलंबित असेल तर त्या संस्थेच्या प्रमुखाला भेटा. तुम्हाला वाटले की प्रमुखालाही तुमच्याकडून ‘कट’ची अपेक्षा आहे तर अशा संस्थेकडून कर्ज घेऊच नका.
गृहकर्ज संमत न होण्यास एक प्रमुख कारण असते ते म्हणजे, अर्जदाराचा क्रेडिट रिपोर्ट! प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्याच्या आधी आपला क्रेडिट रिपोर्ट म्हणजेच आपण आधी कुठले कर्ज घेतले आहे का? ते वेळेवर फेडले आहे का? आपण नियमित पैसे भरता का? आपले चेक ‘बाऊंस’ झाले आहेत का? या सगळ्या गोष्टींची नीट तपासणी करून घेतली जाते. यात नियमितपणा असल्यास आपला क्रेडिट रिपोर्ट चांगला आहे असे स्पष्ट होते. जर कर्जाचे हप्ते उशिरा दिले गेले असतील किंवा एखादा चेक खात्यात पैसे नसल्यामुळे परत आला असेल तर आपला रिपोर्ट चांगला नाही, असे समजले जाते. त्यामुळे आधी सगळे कर्ज फेडा व आपला क्रेडिट रिपोर्ट सुधारून घ्या.
गृहकर्ज घेणारा असा विचार करेल की, बँका व वित्तीय संस्था बर्‍याच आहेत. एकाने नाही दिले तर दुसरीकडे जाऊ अशा भ्रमात राहू नका. क्रेडिट रिपोर्ट तपासल्याशिवाय कोणीही कर्ज देणार नाही. पण गृहकर्ज घेताना बर्‍याच बँकांकडे विचारपूस करा व ज्या बँकेचा व्याजदर कमी आहे व जी बँक छुपे ‘चार्जेस’ वसूल करणार नाही अशा बँकेची निवड करा. नाहीतर एखादी बँक प्रथमदर्शनी व्याजाचा दर कमी दाखवेल व मग इतर मार्गे रक्कम वसूल करेल. असे होऊ नये म्हणून योग्य विचारपूस करा. गृहकर्ज घेताना तुमच्यावर इतर काही कर्जे आहेत का? याचा पण बँक विचार करते. आपण आर्थिकदृष्ट्या जरी सबळ असलो तरी आधीच तुम्ही वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज वगैरे घेतले असल्यास तुम्हाला सहजासहजी गृहकर्ज मिळणार नाही. याचे कारण असे की, आपल्या डोक्यावर आधीच कर्जाचे बोजे असल्यामुळे तात्पुरती का होईना, आपली आर्थिक बाजू कमी लेखली जाते. कुठल्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून किती रकमेचे कर्ज घेतले आहे? याची परतफेड कशाप्रकारे केली जात आहे? अशा प्रकारची माहिती ‘सिबिल’ बँकांना पुरविते. काही अपरिहार्य कारणांमुळे बँकेच्या कर्जांचे हप्ते चुकल्यास ‘सिबिल’च्या सी.आय.आर. रिपोर्टमध्ये आपल्याला खराब रेटिंग्ज मिळण्याची शक्यता असते. आपला सी.आय.आर. व त्यातील क्रेडिट इन्फर्मेशन योग्य आहे याची खातरजमा कर्जदार आता सिबिलकडून थेट करू शकतात. आपण ज्या ‘बिल्डर’कडून घर घेताय तो कितपत विश्‍वसनीय आहे, याची पण हल्ली दखल घेतली जात आहे.
‘बिल्डर’नी एकच घर बर्‍याच वेळा बर्‍याच जणांना विकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गृहकर्ज घेताना कर्जाची प्रक्रिया फी किती आहे? याचीही माहिती करून घ्या. हल्लीच बर्‍याच बँका प्रक्रिया शुल्क आकारात नाहीत. मूल्यांकन शुल्क आकारले जाते ते किती आकारले जाणार याचीही माहिती करून घ्या. गृहकर्जाबाबत आता पोर्टेबिलिटीही अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या बँकेची सेवा अयोग्य वाटल्यास किंवा तिचे सेवादर अधिक वाटल्यास आर्थिकदृष्ट्या सुसह्य वाटत असेल तर पोर्टेबिलिटीने तुम्ही तुमचे मूळ बँकेतील गृहकर्ज खाते दुसर्‍या बँकेत बदलून घेऊ शकाल. गृहकर्जाबाबत बँका दोन प्रकारे व्याज आकारणी करतात. पहिला प्रकार म्हणजे फिक्स्ड व्याजदर. यात कर्ज घेताना जो व्याजदर ठरविला जातो तो कर्ज फिटेपर्यंत तसाच राहतो. दुसरा प्रकार म्हणजे फ्लोटिंग व्याजदर. या प्रकारात बँक दरात जसा बदल होईल तसा व्याजदरात बदल होणार. यात कर्जदाराला कधी वाढीव दर द्यावा लागेल, तर कधी कमी झालेल्या दराचाही फायदा मिळू शकेल. ग्राहकाला गृहकर्ज त्याला शक्य झाले तर मुदतपूर्वही फेडता येते.