विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून

0
12

पाच दिवस कामकाज चालणार; बर्च नाईटक्लबमधील अग्नितांडवाचा मुद्दा गाजणार

गोवा विधानसभेचे पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन येत्या 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्यात सध्या गाजणाऱ्या उत्तर गोव्यातील किनारी भागातील हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमधील दुर्घटनेविषयी विरोधकांकडून आवाज उठविला जाण्याची शक्यता आहे.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सूचना काल जारी केली. त्यानंतर, गोवा विधानसभा सचिवालयाने हिवाळी अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.

दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर इतर कोणतेही कामकाज होणार नाही. 13 ते 16 जानेवारी दरम्यान प्रश्नोत्तरे व इतर कामकाज होणार आहे.
या हिवाळी अधिवेशनासाठी आमदारांना प्रश्न पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. 13 जानेवारीच्या कामकाजात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडील विविध खात्यांचे प्रश्न विचारात घेतले जाणार आहे.

14 जानेवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याकडील विविध खात्यांशी संबंधित प्रश्न विचारात घेतले जाणार आहे. 15 जानेवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो आणि पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याकडील खात्यांशी संबंधित प्रश्न विचारात घेतले जाणार आहेत, तर 16 जानेवारीला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि कला-संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांच्याकडील खात्यांशी संबंधित प्रश्न चर्चेला घेतले जातील.