Home बातम्या विधानसभा वृत्त

विधानसभा वृत्त

0

बाळ्ळी व केपे आरोग्य केंद्रात विजेचे काम शिल्लक : पार्सेकर

दर्जा वाढवण्यात आलेले बाळ्ळी प्राथमिक आरोग्यकेंद्र व केपे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले असले तरी दोन्ही इमारतीत विजेचे काम शिल्लक आहे, असे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. या पार्श्‍वभूमीवर ही दोन्ही केंद्रे कधी सेवा देऊ शकतील हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. केपे मतदारसंघाचे आमदार बाबू कवळेकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला सदर प्रश्‍न उपस्थित केला होता.

गेली दोन वर्षे सरकारवरील आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवण्यासाठीचे काम करीत आहे. पण अजून ते पूर्ण का होत नाही. गेल्या अधिवेशनात आपणाला दोन महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. ते कसे काय, असा प्रश्‍न कवळेकर यांनी यावेळी केला. भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच वरील केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते, असे असताना गेल्या दोन वर्षांत हे काम का पूर्ण झाले नाही असा संतप्त सवाही यावेळी कवळेकर यांनी केला.
यावर हस्तक्षेप करताना बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करीत असते. बाळ्ळी केंद्रात विजेचे तर केपे केंद्रात लिफ्टचे काम शिल्लक आहे. कंत्राटदारामुळे ते काम धिम्या गतीने होत असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.

मावळिंगेतील जमिनींचा प्रश्‍न सोडवणार : मुख्यमंत्री

मावळिंगे येथील जमिनीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत उपसभापती अनंत शेट यांच्या लक्ष्यवेधी सूचनेवर दिले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न करण्याची सूचनाही पर्रीकर यांनी केली.

विजय देसाई यांचे अभिनंदन

गेल्या दि. २२ डिसेंबर रोजी बिगफूटमध्ये सात तास पुतळ्याप्रमाणे राहून जागतिक विक्रम केल्याबद्दल काल विधानसभेत विजय देसाई यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. सांतआंद्रचे आमदार विष्णू वाघ यांनी हा ठराव मांडला होता. देसाई यांच्या कलेची दखल घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. या ठरावावर दिगंबर कामत, नीलेश काब्राल यांचीही भाषणे झाली.

रेजिनाल्ड व मुख्यमंत्र्यात रुबी प्रकरणावरून चकमक

कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना काहीजणांनी रुबी रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप केल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व रेजिनाल्ड यांच्यात शाब्दिक चकमक झडली. आपण कर्ज घेऊन फ्लॅट खरेदी केल्याचा खुलासा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी केला. सभागृहातील वातावरण तापल्याने सभापतींनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 

विधानसभेतील प्रश्‍नांचा दर्जा उंचावणे गरजेचे : मुख्यमंत्री

विधानसभेतील प्रश्‍नांचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. आपण नवीन आमदार असतानाही सभापतींनी आपल्याला कधीही अडथळा आणला नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. रोहन खवटे यांनी केवळ पर्वरीपुरते प्रश्‍न उपस्थित न करता गोव्याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. भारतीय छात्र विद्यार्थी संसदेचा पुरस्कार प्राप्त झालेल्या आमदार खवटे यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर मुख्यमंत्री बोलत होते. कोणतीही गोष्ट चुकली असे दिसल्यास ती दुरूस्त करण्याची आपली नेहमीच तयारी असते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी मांडलेल्या ठरावावर दिगंबर कामत, विष्णू वाघ, नीलेश काब्राल, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, वनमंत्री एलिना साल्ढाणा, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, ग्लेन टिकलो, मायकल लोबो, लवू मामलेदार, विश्‍वजित राणे आदींची भाषणे झाली.

जंगली जनावरांच्या हैदोसावर चर्चा

शेजारच्या राज्यातील गुरे, गवे रेडे गोव्याच्या हद्दीत येऊन शेतीचे नुकसान करतात. त्यावर कोणीही नियंत्रण ठेवण्यास तयार असल्यास त्याला सरकार शंभर टक्के आर्थिक साहाय्य देण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विश्‍वजित राणे यांच्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले. 
जंगलात फळे देणार्‍या वृक्षांची लागवड केल्यास गावात येणार्‍या माकडांवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रश्‍नावर वनाधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

फा. आल्मेदांना श्रद्धांजली

सेंद्रीय शेती, पारंपरिक औषधी व शेती व्यवसाय यात उल्लेखनीय असे कार्य करणार्‍यांना दर वर्षी फादर इनासियो आल्मेदा यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा विधानसभेत त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले. आमदार विष्णू वाघ यांनी फा. इनासियो आल्मेदा यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी कृषी क्षेत्र व पारंपरिक औषधी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वरील घोषणा केली. भारतीय शास्त्रीय संगीतात चांगले योगदान दिलेले गायक कलाकार पुरुषोत्तम होन्नावरकर यांनाही काल विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

माहिती आयुक्तांची अद्याप निवड नाही : मुख्यमंत्री

राज्य माहिती आयुक्तांची अद्याप निवड झालेली नसून यासंबंधीची फाईल आपल्याकडे आलेली नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल एका प्रश्‍नावर सांगितले.

लेखानुदान संमत

काल विधानसभेत सरकारने ४३८६ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचे लेखानुदान संमत करून घेतले.