विधानसभा निवडणुका; आयोगाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा

0
12

आता लवकरच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र त्यावेळी देशात कोरोनाची तिसरी लाट धडकलेली आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका कशा घ्यायच्या, त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उभा आहे. त्या संदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली आहे. तसेच आयआयएमएस, आसीएमआर या संस्थांकडून सूचना मागवलेल्या आहेत.

पाच राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुकीसंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाची काल गुरूवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव उपस्थित होते. त्यांनी देशातील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. तसेच या संबंधित अनेक विषयांवर चर्चाही करण्यात आली.

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून ओमिक्रॉनच्या बाधितांही मोठ्या संख्येने वाढ होताना दिसून येत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांमध्ये नियंत्रणात आली नाही तर पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी कशी करायची, त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.