विधवा आणि प्रथा-परंपरा

0
15
  • – डॉ. जयंती नायक

जग वेगाने बदलत आहे, जगापुढे खूप समस्या आहेत, खूप सामाजिक प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यास स्त्री-पुरुष दोघांनीही हातात हात घालून वावरण्याची गरज आहे. अशा वेळी स्त्रीचे बुरसटलेल्या प्रथा-परंपरांच्या आधारे मानसिक खच्चीकरण होता कामा नये. नव्या पिढीने नवी आव्हाने स्वीकारावीत, जुन्या पिढीने नव्याचे स्वागत करावे. हे जीवन अनमोल आहे; आपणही जगावे, दुसर्‍यालाही जगू द्यावे!

सध्या गोवा आणि महाराष्ट्रात एक विषय खूपच चर्चेत आहे, आणि तो म्हणजे विधवा आणि सामाजिक रूढी. नवर्‍याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीच्या वेळी त्या स्त्रीचं कुंकू पुसणं, तिच्या केसांतील फुलं काढून टाकणं, गळ्यातील मंगळसूत्र तोडणं, पांयातील जोडवी- विंचवा काढून टाकणं वा काढण्यास भाग पाडणं, त्यानंतर शुभकार्यात तिला सहभाग घेण्यास मज्जाव करणं, इत्यादी स्त्रीला अपमानीत करणार्‍या, तिला दुःख देणार्‍या, तिचा जगण्याचा आनंद आणि हक्क काढून घेणार्‍या ज्या सामाजिक रुढी कित्येक शतकांपासून समाजात रूढ आहेत त्यांवर बंदी घालणारा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावच्या ग्रामसभेने पारीत केला. या ठरावाचे समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील स्त्रियांसाठी कार्य करणार्‍या संघटनांनी, तसेच समाजातील पुरोगामी घटकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिलांचा उद्धार करण्याच्या, त्यांच्या सशक्तीकरणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा ठराव पारीत करण्यात आला असे पंचायतीने जाहीर केले आहे. हेरवाड ग्रामपंचायतीचा हा ठराव एवढा परिणामकारक ठरला की महाराष्ट्र शासनाने लगेचच संपूर्ण राज्यातून विधवा प्रथेला हटवण्याचा सर्व पंचायतींना आदेश दिला.

स्त्रीचा आत्मसन्मान सांभाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जे खंबीर पाऊल उचलले आहे त्याचे पडसाद आता त्याच्या शेजारील राज्यांमध्येही उठायला सुरुवात झालेली आहे. खास करून गोव्यात आता या विषयावरून सर्व स्तरांवर चर्चा होऊ लागलेली आहे. याचेच फलित म्हणजे, गोव्याच्या पेडणे तालुक्यातील धारगळ आणि कोरगाव गावांतील ग्रामसभांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला आहे. पण याही पुढे जाऊन गोवा सरकारनेसुद्धा महाराष्ट्र शासनासारखा सर्व पंचायतींना, नगरपालिकांना आपापल्या कक्षेत येणार्‍या नगर तसेच गावांना विधवा प्रथा हटवण्याचे आदेश द्यावेत तसेच जे लोक या प्रथा स्त्रियांवर लादण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी व तसे कायदेसुद्धा करावेत. मुळात ‘विधवा’ हा शब्दच हद्दपार करावा असे माझे मत आहे. जसे एखाद्या पुरुषाची बायको वारली तर त्या पुरुषाला कोणी विधूर म्हणून संबोधत नाही किंवा समाज त्याच्यावर कोणतेच निर्बंध घालत नाही; उलट कमरेला सुपारी खोवून शुभकार्य करायची (दांपत्य रूपाने) त्याला मुभा देतो, त्याच न्यायाने स्त्रीलासुद्धा विधवा म्हणून संबोधायचे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि तिलासुद्धा नारळ कमरेला खोवून शुभकार्य करण्यास मान्यता देण्यात यावी.

खरे तर समाजात नित्य परिवर्तने घडत असतात आणि काळानुरूप ती घडावीत अशीच अपेक्षा असते. समाजातील प्रथा-परंपरांचा उदय हा त्या-त्या काळानुरूप, समाजाच्या भल्यासाठी घडलेला असतो; परंतु तो काळ उलटला की त्या प्रथा-रूढी कालबाह्य होतात. त्यामुळे समाजाने त्या टाकून द्यायच्या असतात. कारण संस्कृती ही कधी एकांगी जगत नसते तर तिच्या सोबतीला अर्थकारण आणि समाजकारणही असते. समाज जसजसा सुधारतो तसतशा त्याच्या उद्धारात अडथळा आणणार्‍या, किंबहुना कोणताच उपयोग नसलेल्या प्रथा सुटत जातात. ही प्रक्रिया तशी सहज घडत असते. मात्र काही प्रथा-पंरपरा एवढ्या चिवट असतात की त्या सहजपणे नष्ट होत नाहीत. कारण समाजातील विशिष्ट घटकांनी त्यांचा उदोउदो केलेला असतो आणि त्या टाकून द्यायला वा सोडून द्यायला ते सहजासहजी तयार नसतात. तसं करण्यामागे त्यांचा काही विशिष्ट उद्देशही असतो. स्त्रियांसंबंधी प्रथा-परंपरांचंसुद्धा तसंच घडलेलं आहे. कारण स्त्रीवर आधिपत्य गाजवण्यासाठी या प्रथा-रूढी महत्त्वपूर्ण साधन ठरलेल्या आहेत.

भारतातील स्त्री-मुक्ती चळवळीचा इतिहास बघता त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता विधवा प्रथांच्या बंदीचा शासकीय स्तरावरील निर्णय महाराष्ट्रातूनच होतोय ही घटना मुद्दाम नोंद करण्यासारखी आहे. शासकीय स्तरावरचा हा निर्णय समाजाने स्वखुशीने स्वीकारला पाहिजे. स्त्री हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. स्त्री नाही तर ते घर अपूर्णच राहते. स्त्रीच्याच कुशीत जीवनाचं सातत्य राहतं. स्त्रीमध्ये निर्मितीची असामान्य अशी शक्ती असते, खास असे गुण असतात. पुरुषसत्ताक समाजात शतकानु शतके शोषणाला बळी पडलेली आणि आपले सत्त्व विसरलेली स्त्री आज जागृत होत आहे. पृथ्वीतलावरच्या सर्व क्षेत्रांत आपली कामगिरी दाखवून तिने अवकाशातही झेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशावेळी समाजाने तिला रुढी-प्रथांच्या कक्षेत बंदिस्त करून न ठेवता उडण्यासाठी संपूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा, तिचे मार्ग मोकळे करायला हवेत, तरच हा समाज सुज्ञ होईल.
‘आज जे तुला ते उद्या मला’ किंवा ‘आज जे तुझ्या घरातील स्त्रीला ते उद्या माझ्या घरातील स्त्रीला’ याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी आणि विधवा स्त्रीचं मन, भावना ओळखून, त्यांचा आदर राखून या प्रथा-परंपरा स्वखुशीने सोडून द्यायला हव्यात. गोव्याचा विचार करता, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा बराच पुरोगामी आहे. कित्येक शिक्षित अथवा पुढारलेल्या घरांनी या प्रथा बंदही केलेल्या आहेत. अशा बर्‍याच स्त्रिया आज मंगळसूत्र घालून, कुंकू लाऊन फिरताना दिसतात. विधवांना हळदीकुंकवाला बोलावण्याच्या पण बातम्या ऐकू येतात. मुलगा नसेल तर मुलींनी आपल्या आई-वडिलांना मंत्राग्नी दिल्याच्या घटनाही घडत आहेत. स्वहाताने धार्मिक कार्य केलं नसलं तरी अशा कार्यात नवरा वारलेल्या स्त्रिया वावरतानाही दिसत आहेत. मात्र समाजाच्या सर्व स्तरांवर हा बदल दिसत नाही हेसुद्धा तेवढंच खरं. ग्रामीण भागात, सनातनी, कर्मठ विचारांच्या घरांमध्ये अजूनही विधवा स्त्रीची विटंबना केली जाते. त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. शिवाय अशा विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या स्त्रिया नवरा मेल्यावर कुंकू लावायला, फुलं माळायला, मंगळसूत्र घालायला मागं-पुढं करतात.

विधवा प्रथा समाजातून हद्दपार होणे ही अतिशय आवश्यक बाब बनली आहे. कारण आम्हाला समाज निरोगी आणि सशक्त बनवायचा असेल तर सर्वात आधी सर्वस्तरांवरील स्त्रीचे सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. आणि अशा प्रथा-परंपराच त्या सशक्तीकरणाच्या वाटेवरील मुख्य अडथळा बनून आहेत. म्हणून त्या सर्वप्रथम नष्ट करणे गरजेचे आहे. एक काळ असा होता की स्त्रिया घराच्या चार भिंतीतच कोंडून राहत असत. परंतु आज त्यांनी या भिंती फोडून सर्व क्षेत्रांत झेप घेतलेली आहे. अशा स्थितीत या कालबाह्य प्रथा त्यांचे मानसिक तसेच सामाजिक शोषण करताहेत. त्यांचे मनोबल कमकुवत करताहेत. आपलं जीवन आनंदीत जगण्याचा प्रत्येकाला जन्मसिद्ध हक्क आहे. चांगलं नेसून-सजून जगण्यात जर स्त्रीला आनंद वाटत असेल तर तो हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. फक्त विधवा स्त्रियाच नाहीत तर परित्यक्ता आणि प्रौढ कुमारिका यांचासुद्धा समाज कित्येक वेळा अपमान करतो. त्यांना सामाजिक आणि धार्मिक उत्सवांत सहभागी होण्यापासून वंचित करतो. हेसुद्धा बंद व्हायला पाहिजे. यासाठी शासकीय कृतीबरोबरच समाजाचे योग्य समुपदेशन होणेही गरजेचे आहे. बर्‍याचदा अशा स्त्रियांचे अपमान स्त्रियांच्याच हस्ते होतात, त्या स्त्रिया पुरुषप्रधान मानसिकतेत जगणार्‍या असतात. त्यासाठी अशा स्त्रियांचे समुपदेशन व्हायला पाहिजे.

कोणतीही नवी गोष्ट पचनी पडायला थोडा त्रास होतो, परंतु एकदा सुरू झाली की आपोआप समाजाच्या अंगवळणी पडते. उदाहरणच द्यायचं झालं तर मासिक पाळीच्या वेळीचं सोवळं-ओवळं. मासिक पाळी आली की स्त्रियांना पाच दिवस कोनाड्यात वेगळं बसावं लागायचं. तिचा स्पर्श निषिद्ध मानला जायचा. यात तरुण मुलींचासुद्धा समावेश असायचा. पाळी आली की भरल्या घरात मग त्यांना संकोचानं मरायला व्हायचं. सर्व जाती-जमातींत ही प्रथा होती. आज ही प्रथा ९५ टक्के बंद झाली आहे. कारण आजच्या युगात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, करिअर… हे सगळे करताना स्त्रीला या प्रथेच्या बंधनात अडकून राहणे शक्य नाही, हे समाजाने मानून घेतलेले आहे. स्त्रीच्या पुनर्विवाहाची प्रथासुद्धा समाजाने शंभर टक्के नसली तरी बहुसंख्येने मानून घेतलेली आहे.

लोकसंस्कृतीची एक संशोधक म्हणून विधवा संकल्पनेचा शोध घेताना एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, मुळात विधवेची संकल्पना संस्कृतीच्या उगमकाळच्या मातृप्रधान संस्कृतीत नव्हतीच. ती पुरुषप्रधान संस्कृतीत जन्माला आली. लग्नात कितीतरी सृजन प्रतीकांचा वापर केला जातो. काही प्रतीके स्त्रियांसाठी असतात, तर काही पुरुषांसाठी. तसेच जातीजमातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, प्रदेशाप्रमाणे ही प्रतीके बदलतात. लग्नाचा सृजनाशी संबंध असल्याने ही प्रतीके लग्नविधीशी जुळलेली आहेत. मूळ हळदीच्या रंगाने रंगवलेले वा कुंठ बांधलेल्या दोर्‍यातून जन्माला आलेले, नंतर काळ्या मण्यांच्या माळामध्ये रूपांतरित झालेले मंगळसूत्र हे सृजनाचे प्रतीक काळप्रवाहात हिंदूंच्या लग्नात महत्त्वाचे ठरले. तसेच नवरा जिवंत असेपर्यंत स्त्रीने ते धारण करण्याची प्रथासुद्धा जन्माला आली.

गोव्यात सधवा स्त्रियांसाठी ग्रामीण भागात ‘आयाव’ (अहेव) हा शब्द प्रचलित आहे. त्याचीसुद्धा येथे फोडणी करणे जरूरीचे आहे. आयाव स्त्री म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री असा सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ काढतात आणि नवरा जिवंत असलेल्या स्त्रियांनाच सृजनकार्यात समाविष्ट करून घेतात. परंतु त्या शब्दाच्या मुळाशी गेलो तर ‘आयाव’ म्हणजे जी स्त्री ‘आय’ (आई) बनू शकते, जिच्या अंगात आई होण्याची क्षमता आहे अशी स्त्री, हे स्पष्ट होते. संततीनिर्मितीसाठी पुरुषाची गरज असल्याने त्याचा नवर्‍याच्या असण्याशी संबंध जोडला गेला. परंतु नवरा वारल्यावरही तिच्या अंगात आई होण्याची शक्ती असते हे समाजाने दुर्लक्षित केले अन् या शब्दाला मर्यादित केले.

माझ्या मते कुंकू, फुलं, मंगळसूत्र या तिन्ही वस्तूंशी स्त्रीचा जसा सांस्कृतिक संबंध आहे तसा तो सामाजिक आणि मानसिकही आहे. कुंकू, फुलं या दोन्ही वस्तू स्त्री जन्माला येते किंबहुना कन्या म्हणून जगते तेव्हापासून ती धारण करते. त्या तिला नवर्‍याने दिलेल्या नसतात. त्यांच्याशी खरंतर तिच्या सधवा असण्याचा काही संबंध नाही. म्हणूनच नवरा वारल्यावरही त्या धारण करण्यापासून तिला रोखण्याचा समाजाला नैतिक अधिकार नाही.

मंगळसूत्र हे लग्नात स्त्रीला नवर्‍याकडून मिळते हे खरे, आणि म्हणूनच ते तिला तो गेल्यावरही धारण करायला दिले पाहिजे. कारण ती त्याच्या प्रेमाची, त्याच्याशी असलेल्या तिच्या निष्ठेची खूण आहे. त्याच्याशिवाय जगलेल्या आठवणीचे प्रतीक आहे. नवरा वारल्यावर त्या स्त्रीला ते घालायचे असेल किंवा नसेल हा त्या स्त्रीचा खाजगी प्रश्‍न आहे. त्यात समाजाने कोणतीच जबरदस्ती करू नये. काही स्त्रिया मंगळसूत्र हे आपल्या सुरक्षेचे कवच मानतात. त्यांना जर तसं मानून जगायचं असेल तर मग त्यांना जगू द्यावे. त्यांच्या भावनांचा समाजाने अनादर करू नये असे माझे मत आहे.

जग वेगाने बदलत आहे, जगापुढे खूप समस्या आहेत, खूप सामाजिक प्रश्‍न आहेत. हे प्रश्न सोडवण्यास स्त्री-पुरुष दोघांनीही हातात हात घालून वावरण्याची गरज आहे. अशा वेळी स्त्रीचे बुरसटलेल्या प्रथा-परंपरांच्या आधारे मानसिक खच्चीकरण होता कामा नये.

विधवांची विटंबना थांबवण्याची सुरुवात प्रत्येक घरातून व्हायला पाहिजे. दुसर्‍याची मुलगी आपण घरात सून म्हणून आणतो, परंतु आपली मुलगी दुसर्‍याच्या घरात सून म्हणून देतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. असे घडले तरच सरकारीस्तरावर विधवा प्रथांच्या बंदीचा घेतलेला निर्णय पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो.
शेवटी मी म्हणेन, नव्या पिढीने जीवनाची नवी आव्हाने स्वीकारावीत, जुन्या पिढीने नव्याचे स्वागत करावे. हे जीवन अनमोल आहे, आपणही जगावे, दुसर्‍यालाही जगू द्यावे!