‘विद्या विनयेन शोभते’

0
96

योगसाधना – ५२३
अंतरंग योग – १०८

 • डॉ. सीताकांत घाणेकर

आपले पूर्वज किती थोर होते ज्यांनी या सर्व ज्ञानाचा सखोल अभ्यासच नव्हे तर चिंतन केले, ज्ञानसाधना केली व आमच्यापर्यंत या ज्ञानाची खरी महती पोचवली. नाहीतर आमच्या अल्पबुद्धीला याचे आकलनच झाले नसते.

आज चौफेर नजर फिरवली तर लक्षात येते की विश्वभर ज्ञानाचा पूर आलेला आहे. या कलियुगातील मानवाने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे व करीत आहे. अभिमानास्पद गोष्ट आहे. अशीच प्रगती होत राहो, हीच ईशचरणी प्रार्थना!

त्याचबरोबर काही क्षेत्रातील ज्ञानाचा हवा तसा उपयोग होत नाही अथवा दुरुपयोग होतो आहे. उदा. – अणुशास्त्र – एका बाजूने मानवाच्या सुखसोयींसाठी वापरले जाते जसे विद्युत निर्मिती, कर्करोगावरील उपचार..इ. पण त्याचबरोबर अणुबॉंबसारखी भयानक शस्त्रेसुद्धा बनवली जातात. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे स्वतःला अत्यंत प्रगत म्हणवणार्‍या व जगाचा स्वामी मानणार्‍या अमेरिकेसारख्या देशाने दुसर्‍या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर बॉंब टाकून त्यांचा विध्वंस केला. मानवी क्लेश वाढवले.
तसेच आज आतंकवादही वाढतोच आहे. तेसुद्धा अणुशास्त्र संहारासाठी वापरतील अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे.

 • इलेक्ट्रॉनिक्स ( मुक्तकण, विद्युत्कणांचे शास्त्र) –
  हे एक अत्यंत उपयोगी शास्त्र आहे. भल्यासाठी वापरले जाते पण त्याचबरोबर संगणकाचा दुरुपयोगही होतो आहे.
  …. अशी विविध शास्त्रे आहेत. ती मानवाच्या सुखसोयींसाठी अवश्य वापरली जावीत. त्यामुळे जीवन सुलभ होईल पण दुरुपयोग व विध्वंस करू नये.
  याची कारणे अनेक आहेत – स्वार्थी- आत्मकेंद्री- विकार-वासनांनी बरबटलेला मानव. परंतु आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्ञानाबद्दलचा दृष्टिकोन. भारतीय विचारांप्रमाणे ज्ञान पवित्र मानले जाते. म्हणूनच आपल्या ऋषींनी ज्ञानाची देवता ही देवी सरस्वती ठरवली. त्याचबरोबर धनाची देवता- श्रीमहालक्ष्मी व शक्तीची देवी श्रीदुर्गा ठरवली.

आता तर नवरात्र चालू आहे. शक्तीची पूजा व उपासना. पण ज्ञानाबद्दल व या शक्तींबद्दल नक्की दृष्टिकोन न समजल्यामुळे फक्त उत्सव मनवले जातात. मौजमस्ती केली जाते.
या सदरात आपला विचार चालू आहे श्री सरस्वतीपूजनाचा!
ज्ञान हे फक्त जीविकेसाठी नसून जीवनासाठी आहे, जीवनविकासासाठी आहे.. हा विचार पक्का व्हायला हवा. त्यासाठी ज्ञानाची पवित्रता लक्षात घ्यायला हवी. असे हे ज्ञान वेदकाळात, ऋषींच्या पवित्र आश्रमात दिले जात असे. त्यामुळे त्याचा उपयोग मानव व विश्वकल्याणासाठी करावा हे शिकवले जाई. यालाही काही अपवाद होतेच जे या ज्ञानाचा दुरुपयोग करीत, परंतु त्यामानाने अल्प होते.

मराठी प्राथमिक शाळेत असताना आमचे गुरुजी आम्हाला ज्ञान किती श्रेष्ठ आहे ते समजण्यासाठी सांगायचे….

 • ज्ञान पवित्र आहे, त्याचा उपयोग सत्‌कर्मासाठीच करावा.
 • ज्ञानदान हे सर्वांत श्रेष्ठ आहे. त्यामुळे पुष्कळ पुण्यप्राप्ती होते. इतरांना दिले तर आपल्याजवळील ज्ञानाची वृद्धी होते.
 • ज्ञान राजा हिसकू शकत नाही. चोर चोरू शकत नाही.
 • धनाची वाटणी होऊ शकते किंवा वाटल्याने धन कमी होते पण ज्ञान मात्र वाढते.
 • धनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे.
  म्हणून ज्ञान प्राप्त करताना हे सर्व लक्षात ठेवावे तसेच ज्ञानी व्यक्तीने असेच आचरण करावे – ‘‘विद्या विनयेन शोभते’’.
  या संदर्भात गुरुजी एक श्‍लोक म्हणायचे –
  ‘‘न चोरहार्यं न च राज्यहार्यं न भातृभाज्यं न च भारकारि |
  व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्या धनं सर्वधनप्रधानम् ॥
  काही धनवान व्यक्ती धन पुष्कळवेळा भोगासाठीच वापरतात- खाणे- पिणे- मजा करणे. त्यामुळे त्यांना अनेक रोग व पीडा जडतात. मग त्यातील पुष्कळ धन उपचारांवरच खर्च होते. त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच.

सज्जन विद्वान व्यक्ती साहित्याचा अभ्यास करून, साहित्य वर्धित करून त्याचा आनंद घेतात. आपल्या जीवनाच्या तसेच निसर्गदर्शनातूनसुद्धा आत्मानंद घेतात.
सारांश – भोगानंदाच्या मागे लागून जीवन कष्टमय करायचे की आत्मानंद मिळवून जीवन सुखी करायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे.
पू. पांडुरंगशास्त्री या विषयावर एक सुंदर श्‍लोक सांगतात –
‘‘वापरल्यामुळे वाढणार्‍या या सरस्वतीच्या खजिन्याचे कवींनी अपूर्वरीत्या वर्णन केले आहे –
‘‘अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति |
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्‌॥
त्यानंतर शास्त्रीजी म्हणतात की शास्त्रकारांनी विद्येची कल्पकता म्हणून थोरवी गायिलेली आहे.
‘‘मातेव रक्षति पितेव हिते नियुङ्‌क्ते
कान्तेव चाभिरमयत्यपनीय खेदम् |
लक्ष्मीं तनोति वितनोति च दिक्षु कीर्तिम् |
किं किं न साधयति कल्पलतेव विद्या ॥

 • मातेप्रमाणे रक्षक आहे, पित्याप्रमाणे हितकार्यात जोडते. कान्तेप्रमाणे रमवून खेद दूर करते. लक्ष्मी वाढवते व सर्वत्र कीर्ती पसरवते. अशी कल्पकतेसमान असलेली विद्या काय साधून देणार नाही?
 • हे श्‍लोक वाचले, त्यावरील महापुरुषांचे मत ऐकले की विविध विचारतरंग मनात अगदी सहज येतात-
 • आपले पूर्वज किती थोर होते ज्यांनी या सर्व ज्ञानाचा सखोल अभ्यासच नव्हे तर चिंतन केले, ज्ञानसाधना केली व आमच्यापर्यंत या ज्ञानाची खरी महती पोचवली. नाहीतर आमच्या अल्पबुद्धीला याचे आकलनच झाले नसते.
 • आपल्यातील कितीतरी ज्ञानी संतमहापुरुषांनी हे विद्यादान निःस्वार्थपणे व विश्‍वकल्याणासाठी केले. विश्‍वात असे अनेकजण आहेत. पण भारतातील काही व्यक्ती अगदी सहज डोळ्यांसमोर येतात ज्यांनी प्रवचनांतून तसेच लिखित रूपात समाजासमोर हे ज्ञान मांडले… संत ज्ञानेश्‍वर = ज्ञानेश्‍वरी
  संत एकनाथ = एकनाथी भागवत
  संत तुकाराम = तुकाराम गाथा
  याशिवाय संत मीराबाई, संत बहिणाबाई…. अभंगांतून, संगीतातून…
  हे थोडे पूर्वीचे संत झाले. आजही अनेक संस्था, संप्रदाय आहेत जे हे पवित्र विद्यादानाचे कार्य उत्स्फूर्तपणे करत आहेत.
  या विषयावर चिंतन करता करता एक श्‍लोक अनेकवेळा प्रवचनांमधून ऐकलेला आठवतो-
  ‘‘विद्वत्त्वं च नृपत्त्वं च नैव तुल्यं कदाचन |
  स्वदेशो पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते ॥
  समाजात दोन क्षेत्रातील व्यक्ती सर्वांसमोर येतात – राजा व विद्वान.

खरे म्हणजे त्यांची तुलना होऊ शकत नाही. पण अज्ञानामुळे अथवा विपरीत ज्ञानामुळे आपण सत्तेची शक्ती असणार्‍याला जास्त मान देतो. विद्वानांना समाज योग्य तशी किंमत देईल याची खात्री नाही.

आपल्या कृतीतून याचे सहज दर्शन घडते. कसल्याही समारंभाला आम्ही राज्यकर्त्यांना बोलावतो. विद्वानांना बोलावूच असे नाही. तसेच विद्वानांना मानधन म्हणून देतो पण बहुतेकवेळा ते योग्य असेलच असे नाही.

काही समारंभात जरूर राजा व विद्वान दोघांनाही बोलावले जाते. पण दोघांना तेवढाच मान देऊ याची खात्री नसते.
या श्‍लोकामध्ये म्हणूनच साररूपात म्हटले आहे….
‘‘राजाची पूजा फक्त त्याच्या राज्यात होते पण विद्वान सर्वत्र पुजला जातो’’.
आपण सर्वांनी निदान योगसाधकांनी तरी ज्ञानार्जन करताना देवी सरस्वतीबद्दल हे सर्व मुद्दे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे संस्कृती पूजन)