बिट्स पिलानीमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूसत्राची राज्य सरकारकडून दखल; डिसेंबरपासून आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू
कुठ्ठाळी-सांकवाळ येथील बिर्ला इन्स्टिट्यूट टेक्नोलॉजी अँड सायन्स या उच्च शैक्षणिक संस्थेच्या (बिट्स पिलानी गोवा) कॅम्पसमधील वसतिगृहात काल आणखी एक 20 वर्षीय विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. ऋषी राकेश नायर (रा. बंगळुरू) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. बिट्स पिलानीमध्ये गत डिसेंबरपासून आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची प्रकरणे समोर आली असून, या पार्श्वभूमीवर पाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पणजीत पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर माहितीनुसार, बिट्स पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहाच्या ज्या खोलीत ऋषी राकेश नायर हा राहत होता, त्या खोलीचा दरवाजा सकाळपासून बंद होता. तो बाहेर येत नसल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला, त्यावेळी तो खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. बिट्स पिलानीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, तेथे त्याची तपासणी केली असता तो मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले. ज्या ठिकाणी ऋषीचा मृतदेह सापडला होता, तेथे त्याने उलट्या केल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सेनंतर स्पष्ट
होणार आहे.
सखोल चौकशी करा : आलेमाव
बिट्स पिलानीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याने त्याची तातडीने दखल घेऊन उपाययोजनांची गरज आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.
‘आप’कडून न्यायालयीन चौकशीची मागणी
आम आदमी पक्षाने बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधील अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. आम्ही या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सखोल आणि पारदर्शक न्यायालयीन चौकशीची मागणी करतो, असे आम आदमी पक्षाच्या वास्को गटाने म्हटले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित दूर करण्यासाठी सरकारने पुरेसे उपाय केले आहेत का याचा तपास करणे गरजेचे आहे, असेही आपने म्हटले आहे.
बिट्स पिलानीतील वर्षभरातील मृत्यू प्रकरणे
गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ओम प्रियन सिंग (बीई संगणक विज्ञान, एमएससी कॅमिस्ट्री) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.
मार्च 2025 मध्ये अथर्व देसाय (तिसरे वर्ष डुअल डिग्री) याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते.
मे 2025 मध्ये कृष्णा कसेरा (दुसरे वर्ष डुअल डिग्री मॅकॅनिक बीई इलॅस्ट्रिकल) याने आत्महत्या केली होती.
ऑगस्ट 2025 मध्ये कुशाग्र जैन (तिसरे वर्ष इकॉनॉमिक संगणक विज्ञान) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
यानंतर काल, 4 सप्टेंबर 2025 रोजी 20 वर्षीय ऋषी नायर याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या पाचही प्रकरणांचा तपास वेर्णा पोलीस करीत आहेत.
प्रकरणे गंभीर स्वरूपाची : मुख्यमंत्री
बिट्स पिलानी या शिक्षण संस्थेत मागील वर्षभरात पाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची झालेली नोंद गंभीर स्वरूपाची आहे. राज्य सरकारने या शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकारणांची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणांची दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षण संस्थेला आवश्यक सूचना व उपाययोजना हाती घेण्याची सक्ती केली जाणार आहे. पोलीस खात्याकडून देखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऋषी बिट्स पिलानी गोवाचा विद्यार्थी नव्हता
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी नायर हा मूळ बिट्स पिलानी हैद्राबाद येथील विद्यार्थी असून, तो तणावाखाली होता. त्यामुळे पालकांनी त्याची बदली गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये केली होती. तो गोवा बिट्स पिलानीचा विद्यार्थी नव्हता.
ऋषी नायर हा गेल्या महिन्यातच गोव्यातील कॅम्पसमध्ये आला होता. एमएसस्सी फिजिक्स दुसऱ्या वर्षात तो शिकत होता. हैदराबाद बिट्स पिलानीमध्ये वैयक्तिक कारणास्तव त्याला नैराश्य आल्याने तो तणावाखाली होता. त्यामुळे त्याला तेथून गोवा कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या तणावाखालीच त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उच्च शिक्षण खात्याकडून देखरेख समितीची स्थापना
शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण खात्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा जिल्हास्तरीय देखरेख समितीची स्थापना काल केली.
सुखदेब साहा विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार खटल्यामध्ये शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्या रोखण्याबाबत उपाययोजना हाती घेण्याचा आदेश सर्वोच्य न्यायालयाने 25 जुलै 2025 रोजी दिला होता.
या आदेशानुसार उच्च शिक्षण खात्याने दक्षिण गोवा देखरेख समितीची स्थापना केली आहे. या देखरेख समितीमध्ये तांत्रिक शिक्षण, शिक्षण, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, आरोग्य, दिव्यांग, कौशल्य विकास, आदिवासी कल्याण या खात्यांचे संचालक, अवर सचिव (कायदा), नोंदणीकृत एनजीओचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. उच्च शिक्षण संचालक ह्या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

