डिचोली येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बळजबरी करून तिचा लैंगिक छळ व नंतर मारहाण केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी पडोसे-पर्ये, सत्तरी येथील गौरीश बारकेलो गावकर (19) या युवकास अटक केली. ही घटना गेल्या 14 ऑक्टोबर रोजी दुपारी वाठादेव सर्वण डिचोली येथे एका निर्जनस्थळी असलेल्या मंदिराच्या ठिकाणी घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर जलदगतीने चौकशी हाती घेऊन डिचोली पोलिसांनी सदर युवकास अटक केली. या प्रकरणी संबंधित पीडित मुलीच्या भावाने डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीला वाठादेव सर्वण येथे एका निर्जनस्थळी असलेल्या मंदिराजवळ नेले होते. तेथे तिच्यावर बळजबरी करून नंतर तिला अमानुष मारहाण केली. तिच्या तोंडावर मुक्के मारून तिचे दात तोडले आणि तोंडाला गंभीर दुखापत केली. तसेच तिचे तोंड जमिनीवरील आदळले. या प्रकरणाचा व्हिडीओ त्या युवकाने आपल्याच मोबाईलवर चित्रित केले होता. तसेच त्या मुलाने पालकांना व इतरांना सदर प्रकरण सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे सदर मुलगी व तिचे पालकही गप्पच होते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी या घटनेचा एक व्हिडिओ व्हाट्सअपवर व्हायरल झाला. त्यामध्ये सदर मुलगी पायऱ्यावर पडलेल्या अवस्थेत तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत होते. त्याची डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी स्वतः गंभीर दखल घेत संशयित युवकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

