‘विद्याभारती’चे संरक्षक ः सुभाष वेलिंगकर

0
47
  • – डॉ. सीताराम विठ्ठल कोरगावकर

मातृभाषेतील शाळा बंद करण्याचा अविचारी व घातक निर्णय सरकारने घेतला तेव्हा सर्व समाजाने पूर्ण ताकदीनिशी या निर्णयाविरुद्ध लढण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. जागे झाले, आवाज उठविला, कृती केली ती वेलिंगकरसर व त्यांच्या साथीनी. मातृभाषेच्या रक्षणासाठी सरांनी केलेले हे कार्य अतुलनीय असेच आहे.

सन १९९९ साली विद्याभारती- गोवा या शैक्षणिक संस्थेची घटना तयार झाली. सन १९९७ पासून शिशुवाटिका सुरू झाली. संस्कारमय, आनंदी वातावरण असलेले भारतीय पद्धतीचे पूर्वप्राथमिक शिक्षण/संस्कार देणारे केंद्र असे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. पुढे या प्रयत्नात खूप सुधारणा होत गेल्या. या शिशुवाटिकांना समाजात चांगला प्रतिसाद मिळाला. गावागावांत शक्य होईल त्या ठिकाणी स्थानिक संस्थांमार्फत शिशुवाटिका सुरू झाल्या. गेल्या २५ वर्षांत शिशुवाटिकांची संख्या ५०च्या वर पोचली आहे. प्राथमिक विद्यालये १५ आहेत. हायस्कूल ७ व हायर सेकंडरी १ अशा स्तरावर विद्याभारती- गोवा काम करत आहे. यात आणखीन भर आहे ती छात्रवास व वाचनालयाची.
शिशुशिक्षण हा बालकाच्या प्रथम जीवनकालातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. म्हणून हे शिक्षण सुधारण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले गेले व प्रशिक्षित ‘दीदी’ तयार केल्या. या ३१ जणींची पहिली तुकडी तयार केली. त्यांच्या कार्यशाळा घेतल्या, शिबिरे घेतली. गोवा शिशुशिक्षण परिषद भरवली, त्यांना मार्गदर्शन दिले. ही तुकडी गावागावांत शिशुवाटिकेचे कार्य सक्षमपणे करू लागली.

शिशुवाटिकेचे हे कार्य वेलिंगकर सरांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या सहकार्‍यांच्या परिश्रमाने आजवर अविरतपणे चालू आहे. शिशुवाटिकेचे कार्य सुरू करण्यास तसे कारण पण होते, ते म्हणजे, गोव्यात शिक्षणक्षेत्रात घुसत असलेली पाश्चिमात्त्य शिक्षणपद्धती. मॉण्टेसरी, किण्डरगार्डन यांतून लहान मुलांना शिक्षण देणे सुरू झाले व पालक आपल्या बालकांना ते शिक्षण देऊ लागले. शिक्षणाचा उद्देश ‘हा अभ्यास कर, जास्त मार्क्स मिळव’ असा आग्रह करणारा होता. मुलांना पहिल्या इयत्तेपासून शाळेत पाठवणे, पुस्तके, दप्तर, गृहपाठ, परीक्षा, गुण यातच त्याना शिक्षकांकडून अडकवले जात असे. यात लहान मुलांची मानसिकता व भारतीय जीवनपद्धतीचा विचार होत नव्हता. म्हणून भारतीय शिक्षणाबरोबर मुलांच्या मानसिकतेचा विचार करून तशी शिक्षणपद्धती तयार करण्यात आली. मातृभाषेतून शिकवणी ही शिक्षणपद्धती शिशुशिक्षण केंद्र म्हणजे ‘शिशुवाटिका’ या नावाने सुरू झाली.

जसे पहिली ते पदवीपर्यंत शिकण्यासाठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, हायस्कूल, हायरसेकंडरी, कॉलेज अशा टप्प्याटप्प्यातून जावे लागते, तशाच प्रकारचा एक टप्पा मुलाच्या जन्मापासून ते प्राथमिक शाळेत प्रवेश करीपर्यंत असावा व या टप्प्यात भारतीय परंपरा, संस्कार, संस्कृती इ.विषयी बाळकडू दिले जावे, हा उद्देश होता. या जीवनकाळातील हा कालखंड म्हणजे सुसंस्कारित व अर्थपूर्ण जीवनविकास होण्याची पहिली पायरी आहे.

अशा प्रकारच्या शिशू शिक्षणातील नवीन कार्याला प्रेरणा दिली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे संघचालक वेलिंगकरसर यांनी. त्यांच्या प्रयत्नाने हे कार्य गती घेऊ शकले. ही गती वाढण्यास राजकीय स्तरावर एक कारण घडले. गोवा सरकारने एप्रिल २००१ च्या दरम्यान निर्णय घेतला की ज्या सरकारी प्राथमिक शाळेत १२ किंवा १२ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शाळा बंद केल्या जातील. बहुतेक या सर्व शाळा मराठी भाषेतून चालत होत्या. या निर्णयामुळे रा. स्व. संघात खूप खळबळ माजली. वेलिंगकरसर त्यावेळी कोकण प्रांताचे संघचालक म्हणून कित्येक वर्षे जबाबदारी सांभाळत होते.
वरील सरकारी निर्णय हा मातृभाषेवर व मातृभाषेतील शिक्षणावर मारलेली कुर्‍हाड होती. सरांनी या निर्णयासंबंधी सरकारची भेट घेतली व सरकारला प्रस्ताव दिला की त्या बंद पडणार्‍या शाळा आम्ही चालवतो, त्या बंद करू नका. या निर्णयामुळे मुलांचे व पर्यायाने भावी पिढीचे अतोनात नुकसान होईल. मुलांना मातृभाषेतून शिक्षण चालू ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी काही अटी घालून बंद पडलेल्या शाळा विद्याभारती- गोवा या संस्थेला चालवायला दिल्या. त्यावेळी घातलेल्या अटी अशा होत्या-
१) शिक्षकांना पगार सरकार देणार नाही, २) शाळा इमारत व त्यातील साहित्य वापरायला हरकत नाही, ३) शाळा फक्त ५ वर्षांकरिता दिल्या आहेत, ४) एकाच संस्थेला सर्व शाळा देणार नाही.
सर्व अटी मान्य करून मातृभाषेच्या संरक्षणासाठी सरांनी बंद पडलेल्या शाळा परत सुरू करायचे शिवधनुष्य उचलले. त्यावेळचे विद्याभारतीचे प्रथम अध्यक्ष ज्ञानेश्वर पेडणेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर, गजानन मांद्रेकर, अनिल सामंत, सुखाजी नाईक, पांडुरंग नाडकर्णी अशा दिग्गज सहकार्‍यांच्या पाठबळावर वेलिंगकरसर निर्धाराने उभे राहिले. या कार्यासाठी लागणारे आर्थिक बळ उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रशिक्षणाची सोय केली, स्थानिक पातळीवर संस्था उभ्या केल्या. हे सर्व सरांनी अवघ्या काही महिन्यांतच साध्य केले. यासाठी सरांना व संघाला आरोप-प्रत्यारोप, विरोध यांना तोंड द्यावे लागले. वेलिंगकरसर सतत विरोधकांना तोंड द्यायचे, त्यामुळे कार्यकर्ते निवांतपणे आपली वाटून दिलेली कामे कशाचीही पर्वा न करता करू लागले. सरांनी कार्यकर्त्यांचे मनोबल खचू दिले नाही. त्यांची निराशा होऊ दिली नाही. अशाप्रकारे बंद पडलेल्या शाळा सुरू झाल्या.

या प्रयोगाचा उत्कृष्ट परिणाम साध्य झाला. गोव्याच्या शिक्षणक्षेत्रात कार्य करणारी ‘विद्याभारती’ ही एक उत्तम संस्था म्हणून नावारूपास आली. बंद पडलेल्या शाळा ही संस्था चांगल्याप्रकारे चालवू शकते, हा संदेश समाजात गेला. त्याचे फलित म्हणून पुढे बंद पडत चाललेल्या अनेक शाळांना ‘विद्याभारती’ हा एक नवा पर्याय मिळाला. शाळांची संख्या पुढे वाढू लागली. शाळा चांगल्या चालू लागल्या. विद्यार्थीसंख्या वाढत गेली. अशाप्रकारे हा प्रयोग यशस्वी ठरला.

मातृभाषेतील शाळा बंद करण्याचा अविचारी व घातक निर्णय सरकारने जेव्हा घेतला तेव्हा सर्व समाजाने पूर्ण ताकदीनिशी या निर्णयाविरुद्ध लढण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. जागे झाले, आवाज उठविला, कृती केली ती वेलिंगकरसर व संघप्रेरित मंडळींनी. मातृभाषेच्या रक्षणासाठी सरांनी केलेले हे कार्य अतुलनीय असेच आहे.
शाळा चालवायला घेतल्या तेव्हा काही शाळांत फक्त दोनच विद्यार्थी होते. पण त्यासुद्धा शाळा सुरू करण्यात आल्या. प्राथमिक शाळांच्या जवळ शिशुवाटिका सुरू केल्या. प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध केले गेले. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती कै. अनिल साळगावकर सरांच्या विनंतीला मान देऊन आर्थिक साहाय्य करण्यास पुढे सरसावले. त्यांनी दोन वर्षांपर्यंत आर्थिक पाठबळ देण्याचे सरांना वचन दिले व पाळलेसुद्धा. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या पगाराची व्यवस्था झाली. प्रशासकीय कामासाठी लागणारी गाडी, स्टाफ ही व्यवस्था साळगावकर यांनी केली. प्रशिक्षणाची धुरा दिलीप बेतककर, गजानन मांद्रेकर, अनिल सामंत, प्रा. रमेश सप्रे, सुखाजी नाईक, पेडणेकर आदी कार्यकर्त्यांनी सांभाळली. विद्याभारती- गोवाचे पहिले अध्यक्ष ज्ञानेश्वर पेडणेकर होते. त्यांच्याबरोबर समितीवर सुभाष वेलिंगकर, दिलीप बेतकेकर, अजित सामंत, सुखांती नाईक, रूपेश शंखवाळकर, पांडुरंग नाडकर्णी, गजानन मांद्रेकर, उदय कुडाळकर, संतोष रेडकर व वासुदेवराव पेशवे हे होते.

विद्याभारतीच्या बॅनरखाली विविध संस्थांच्या वतीने ४६ शाळा या संस्थेने ताब्यात घेतल्या आणि या शाळांचा स्तर उंचावत नेला. विद्यार्थीसंख्या वाढत गेली. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या, नाहीतर आज त्या पूर्णपणे बंद पडल्या असत्या.
सन २००३ साली पुंडलिक देवस्थान सभागृहात एक पालक परिषद आयोजित केली गेली. त्यात दोन हजारपेक्षा जास्त पालकांची उपस्थिती होती. ही गोव्यातील एकमेव पालक परिषद होय. इंदुमती काटदरे, प्रा. गोपाळ मयेकर, प्रा. दिलीप बेतकेकर हे प्रमुख वक्ते होते. शिशुवाटिकांचे महत्त्व व त्यांची आवश्यकता याविषयी त्यांनी पालकांना जागृत केले. परिषदेनंतर गावागावांत जाऊन शिशुवाटिकांचे महत्त्व पटवणे, विषय मांडणे ही जबाबदारी श्री. बेतकीकर, पांडुरंग नाडकर्णी, रमेश सप्रे, प्रमोद गणपुले व इतर कार्यकत्यांनी उचलली. तालुक्यांतील प्रवास, तेथील कार्यव्यवस्था व निरीक्षण हे काम नामदेव परब, सुखदा आजगावकर, बल्लम केळकर, संजय मुळगावकर, उदय सामंत, रजी गाडगीळ अशा अनेकजणांनी केले. उर्वरित कामासाठीचा अर्थभार राजेंद्र भोबे यांनी उचलायला.

नियमितपणे मासिक वर्ग, प्रशिक्षण वर्ग, सल्लामसलत हा नियोजनाचा भाग होता. या सर्वाचे नियोजन व त्याची व्यवस्था श्री. वेलिंगकरसर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामुळे सरांना विद्याभारतीचे संरक्षक मानले जाते.
सुभाष वेलिंगकर सरांनी नुकतेच आपल्या आयुष्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले. सरांचे सामाजिक, शैक्षणिक, तसेच पिढी सुसंस्कारित करण्याचे कार्य असेच पुढे चालू राहो, हीच श्रीचरणी प्रार्थना.

सरकारची अनास्था
२००१ मधील सरकारच्या निर्णयाला सन २००५ मध्ये नवीन सरकार आल्यावर खो बसला. नव्या सरकारने ‘विद्याभारती’कडे दिलेल्या शाळा परत घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैव म्हणजे परत घेतलेल्या शाळा चालू झाल्या नाहीत, बंदच पडल्या. गेल्या २५ वर्षांत विद्याभारती- गोवाच्या शाळांमधून कित्येक विद्यार्थी, विद्यार्थिनी आपले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत, काही छोटे-मोठे उद्योगधंदे यशस्वीपणे करत आहेत. हे विद्यार्थी सुसंस्कारित, देशप्रेमी नागरिक बनले आहेत.