काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून भाजपकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले. तसेच परदेश दौऱ्यांदरम्यान भारतीय दूतावासामधील लोक राहुल गांधींवर पाळत ठेवून असतात. तसेच अनेक परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नका, असे सांगितले जाते, असा आरोप पित्रोदा यांनी केला.

