विदेशातून येणार्‍या गोमंतकीयांना ‘दाबोळी’वर उतरवण्याची तयारी

0
118

>> मुख्यमंत्री ः पहिले विमान पुढील आठवड्यात शक्य

ाबोळी विमानतळावर विदेशातून येणार्‍या गोमंतकीयांना उतरवून घेण्याची तयारी ठेवली आहे. विदेश मंत्रालयाला दाबोळी विमानतळ खुला करण्याची विनंती करण्यात आलेली असून पुढील आठवड्यात विदेशातून गोमंतकीयांना घेऊन येणारे पहिले खास विमान दाबोळी दाखल होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या फेसबुक पेजवरील प्रश्‍नोत्तरी कार्यक्रमात बोलताना काल दिली.

गोव्यात कोरोनाचा रुग्ण आढळून येऊ नये म्हणून प्रशासन कार्यरत आहे. रेल्वेगाड्यांतून गोव्यात येणार्‍या प्रवाशांची कोविड चाचणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी परत पाठविण्यासाठी खास रेल्वेगाड्या सुरू केलेल्या आहेत. गोव्यात केवळ मडगाव स्थानकावर खास रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे. रेल्वेतून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी स्टेडियम, महाविद्यालयाच्या इमारतीचा वापर केला जाऊ शकतो, असेही सावंत यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष एक
महिन्याने उशिरा
राज्यातील २०२० ते २०२१ हे शैक्षणिक वर्ष एक महिना उशिराने सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात सुट्‌ट्या कमी करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रम लवकर पूर्ण करण्यासाठी ऑन लाइन शिकवणी पद्धतींचा अवलंब उच्च स्तरावर केला जात आहे. शालेय पातळीवर ऑन लाइन शिकवणी पद्धतीचा वापर करण्यावर विचार केला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यातील प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांची संख्या कमी असल्याने बसमध्ये सामाजिक अंतर नियमांचे पालन होत नाही, अशी कबुली सावंत यांनी दिली. राज्यातील खासगी बसमालकांनी आपल्या बसगाड्या सुरू केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात थोडे नुकसान सहन करून खासगी बसमालकांनी बसगाड्या सुरू करून योगदान देण्याची गरज आहे, सावंत यांनी सांगितले. राज्यातील खाण प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे खाण प्रश्‍न सोडविण्यात उशीर होत आहे. केंद्र सरकारकडे कायद्यात दुरुस्ती करून खाण प्रश्‍न सोडविण्याची विनंती करण्यात आली आहे. केंद्राकडून गोव्यातील खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

९५ टक्के कंपन्यात काम सुरू
राज्यातील ९५ टक्के कंपन्यांमध्ये काम सुरू झाले आहे. या कंपन्यांमध्ये कामगारांची कमतरता आहे. काही कंपन्यांनी परराज्यात असलेले कामगार आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील कंपन्यांनी स्थानिक कामगारांना सेवेत सामावून घेऊन काम सुरू ठेवण्याची गरज आहे, असेही सावंत यांनी सांगितले.