विदेशातून येणार्‍यांच्या क्वॉरंटाईन कालावधीत घट

0
163

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार (एसओपी) विदेशातून येणारे खलाशी आणि अडकलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईऩ नियमांमध्ये बदल करण्यात आला असून सरकारी क्वारंटाईऩ आणि होम क्वारंटाईनचा कालावधी प्रत्येकी १४ दिवसांवरून प्रत्येकी ७ दिवसांवर आणण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात रस्ता मार्गाने प्रवेश करणार्‍या प्रवाशांसाठी नवीन नियमावलीची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे. नवीन नियमावलीची अंमलबजावणी केवळ विमान व रेल्वेतून आलेल्या प्रवाशांसाठी काल करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करून प्रवेश करणार्‍या प्रवाशांकडून हमीपत्र घेतले जात आहे. प्रवाशांना सादर केलेल्या प्रमाणपत्राची योग्य पडताळणी केली जाणार आहे. प्रवाशाने बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांना आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. आयसीएमआरच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची यादी सरकारकडे उपलब्ध आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

निवास सोय नसलेल्यांनी गोव्यात येऊ नये
राज्यातील हॉटेल, गेस्ट हाउस बंद आहेत. त्यामुळे निवासाची सोय नसलेल्या नागरिकांनी गोव्यात प्रवेश करू नये, असे जाहीर करण्यात आलेले आहे. केवळ क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेतलेली हॉटेल सुरू आहेत. विमानातून येणार्‍या एखाद्या प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास नियमानुसार त्या प्रवाशाच्या जवळच्या प्रवाशांना क्वारंटाईऩ केले जाणार आहे. संपूर्ण विमानातील प्रवाशांना क्वारंटाईऩ केले जाणार नाही, असेही मोहनन यांनी सांगितले.