31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे

  • श्रेया काळे
    (पर्वरी)

समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू व वाढवू ही क्षमता आपल्यात नक्कीच आहे. भावी काळात हीच क्षमता तरुणाईत वृद्धिंगत होवो व विज्ञान क्षेत्रात भारतासाठी परत ‘नोबेल’ येवो हीच या विज्ञानदिनी सदिच्छा!

२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. शालेय, महाविद्यालयीन, सरकारी व बिगरसरकारी संस्थांकडून विज्ञानाच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारताचे भौतिकविज्ञानाचे शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन व त्यांचे विद्यार्थी श्रीकृष्णन् यांनी प्रकाशकिरणांच्या प्रसारणावर आधारित ‘रामन इफेक्ट’चा शोध लावला. या दिवसाचे औचित्य साधून नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सरकारशी १९८६ साली हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून घोषित व्हावा असा प्रस्ताव मांडला व त्याच्या दुसर्‍याच वर्षी २८ फेब्रुवारी १९८७ साली पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला.

अत्यंत सनातनी अशा तामिळी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर व्यंकटरामन जन्मजात तल्लख बुद्धीचे व चिकित्सक वृत्तीचे होते. मद्रास युनिव्हर्सिटीतून भौतिक विज्ञानाची स्नातकोत्तर पदवी अव्वल स्थान मिळवून प्राप्त केल्यानंतर ते स्वातंत्र्यपूर्व भारतात इंडियन फायनान्स सर्व्हिसेसमध्ये नोकरी करू लागले. पण त्यांच्यामध्ये दडलेला संशोधक त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी कलकत्त्यातील तत्कालीन विज्ञान संशोधन संस्थेशी स्वतःला जोडून घेतले. भारतीय संगीतातील तंतुवाद्यांच्या ध्वनी संशोधनात त्यांना विशेष रुची होती. या क्षेत्रात त्यांनी कामही सुरू केले होते. त्यांच्या संशोधन कार्याकरिताच त्यांना युरोपियन देशांचा दौरा करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांचा परिचय प्रख्यात अणुसंशोधक जे. जे. थॉम्‌सन व लॉर्ड रूदरफोर्ड यांच्याशी झाला. युरोपहून भारतात परतताना सोळा दिवसांच्या जलसफरीमध्ये भूमध्य सागराच्या निळ्याशार पाण्याने त्यांच्या मनातील कुतूहल जागे झाले. समुद्राचे पाणी निळे का? यावरचे उत्तर लॉर्ड रीले यांनी यापूर्वीच दिले होते. सूर्यप्रकाशाची किरणे पाण्यावर परावर्तित होतात व त्यामुळे पाणी निळे दिसते हा त्यांचा सिद्धांत तोपर्यंत जगमान्य होता. परंतु तेवढ्यावरच सी. व्ही. रामन यांचे समाधान झाले नाही. कलकत्याला परतल्यावर याच विषयावर त्यांनी पछाडलेल्या वृत्तीने काम करण्यास सुरुवात केली. प्रकाश किरणांच्या प्रसरणामुळे किरणांच्या व्हेवलेंग्थ आणि ऍम्प्लिट्यूडमध्ये बदल होतो. हा शोध त्यांनी लावला ज्याला आपण‘रामन इफेक्ट’ या नावाने ओळखतो.

क्वॉटम फिजिकल व मेकॅनीकस ऑप्टीकसच्या या क्षेत्रात क्रांतिकारक ठरलेल्या या शोधामुळेच १९३० साली त्यांना ‘नोबेल पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले. विज्ञान क्षेत्रात हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते एकमेव भारतीय ठरले. रामन इफेक्टच्या शोधाची पार्श्‍वभूमी पाहता एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते ती अशी की सर रामन यांचे संपूर्ण शिक्षण व संशोधन हे भारतात झालेले आहे व तेही स्वातंत्र्यपूर्व भारतात. त्यांच्या प्रयोगांसाठी लागणारी सामग्रीही टेबलाच्या एका खणात मावण्याएवढीच होती. आत्ताच्या युगात मिळणारा एका क्लिकवरचा माहितीचा पुरवठाही त्यांना उपलब्ध नव्हता. तरीही ‘रामन इफेक्ट’ जन्मास आला. सचोटी, सातत्य, कुतूहल व चिकित्सक वृत्ती अंगी असल्यास आपल्या देशातही क्रांतिकारी शोध लागू शकतात, आविष्कार घडविता येतात याचे हे प्रमाणच नाही का?
खरे तर विज्ञान- तंत्रज्ञान हे कुठल्या एका विशिष्ट वर्गाची वा उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी नव्हे. ते सर्वांचेच आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोचले पाहिजे. विज्ञानाने भौतिक विकास साधता येतो. जीवनस्तर उंचाविता येतो हे जरी खरे असले तरी विज्ञानामुळे मानवाच्या वैचारिक क्षमतेच्या कक्षाही विस्तारल्या जातात. एखाद्या घटनेकडे, वस्तूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होतात. जीवनातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अनेक पर्याय, अनेक उपाय उभे केले जाऊ शकतात. समाजातील गैररूढी, अंधश्रद्धा, अघोरी परंपरा, जादू-टोना, तंत्र-मंत्र यांना आळा बसून समाज प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतो.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल व आंतरजाल सेवेमुळे तंत्रज्ञान वेगाने पसरते आहे. परंतु सर्वांचे हित साधणारे विज्ञान भारतासारख्या देशात सर्वांपर्यंत पोचतेय का? प्रत्येकात ते रुजतेय का? हा मोठा प्रश्‍न आहे. जोपर्यंत या देशातील स्त्रिया अजूनही अश्रू गाळत, खोकत, चूल फुंकून अन्न शिजवतील; जोपर्यंत घराघरांत ओल्या व सुक्या कचर्‍याचं विलगीकरण होत नाही; जोपर्यंत पाणी व विजेचा घराघरांत यथायोग्य वापर होत नाही; जोपर्यंत स्वच्छता आणि मूलभूत मानवी गरजांसाठी साधनसुविधा उपलब्ध होत नाहीत… तोपर्यंत विज्ञान प्रत्येकापर्यंत पोचले असे आपणास ठोसपणे सांगता येणार नाही. हा हेतू साध्य करण्यासाठीच एन.सी.टी. ही संस्था विज्ञानदिनाच्या आयोजनासाठी नवनवीन विषय घोषित करते जेणेकरून विविध स्तरावर त्या विषयानुसार जागृती अभियाने, प्रदर्शनी, ग्रामसभांमधून प्रचार, रोड शोज यामधून समाजामध्ये विविध वैज्ञानिक, पर्यावरण, आरोग्य याबाबत सकारात्मक बदल घडवून आणता येतील. शिक्षणसंस्था, शिक्षक व विद्यार्थी हे विज्ञान प्रसार व प्रचारासाठी केंद्रबिंदू ठरवलेले आहेत म्हणून अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी शिक्षणसंस्थांना निधी पुरविण्याचे कामही एन्‌सीएससीटी करते.

विज्ञान फक्त अंगीकारून चालणार नाही तर ते वाढीस लागले पाहिजे. याची जबाबदारी युवा पिढीने उचलली पाहिजे. विज्ञान शाखा निवडून केवळ डॉक्टर- इंजिनिअरची स्वप्ने पाहणार्‍या तरुणाईने स्वबुद्धीने संशोधनाची कास धरली तर आपला देशही नवनवीन शोधांची व आविष्कारांची जननी होईल. विज्ञान हे फक्त ‘सोल्युशन टू प्रॉब्लेम’ नसून या दोन्ही गोष्टींमधला जो प्रवास आहे त्यालाच ‘विज्ञान’ म्हणतात. आपल्यासमोरील आव्हान, त्यावर पर्यायी उपाय, त्यातील योग्य उपाय शोधण्यासाठी केलेले वाचन, विविध प्रयोगांच्या मालिका, प्रत्येक फसलेल्या- जमलेल्या प्रयोगातून काढलेले निष्कर्ष, यशापयश, त्यामागचा दुःख- आनंद हेच खरे विज्ञान असते ‘आव्हान’ आणि ‘उपाय’ यामधल्या प्रवासातले! ते अनुभवायला भारताची युवाई समर्थ आहे हे निश्‍चितच. म्हणूनच होतकरू, कष्टाळू, युवक-युवतींनी विज्ञान- अनुसंधानाकडे वळणे ही काळाची गरज आहे.

आपला देश हा आशिया खंडातील सर्वांत वेगाने प्रगती करणारा विकसनशील देश आहे. विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर काळानंतरची आपली झेप वाखाणण्यायोजोगी आहे. गेल्या दोन दशकांमध्ये तर अवकाश संशोधन व संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून लक्षणीय कामगिरी बजावल्याने भारताने या क्षेत्रामध्ये अग्रणी मानल्या जाणार्‍या देशांच्या पंक्तीत येऊन बसण्याचे धाडस केले आहे. मंगलयान व चांद्रयान या महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमांच्या प्रयत्नानंतर अमेरिका, रशियासारखे देशही भारतासोबत आंतराळमोहिमेसंदर्भात करार करण्यास इच्छुक आहेत ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आण्विक शस्त्रे बाळगण्याची क्षमता असलेला देश असूनही अणुशक्तीचा वापर फक्त विधायक कार्यासाठीच केला जाईल अशी हमी देणारा भारत हा एकमेव देश आहे. आय.आय.ए..सी., बी.ए.आर.सी., डी.आर.डी.ओ., इस्रोसारख्या विविध विज्ञानविषयक संशोधन करणार्‍या संस्थाही भारतात निर्माण झाल्या व त्यांनी भारताला जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आणून उभे केले. आता वेळ आहे ती अथक परिश्रमांची, विज्ञानाधिष्ठित कार्यपद्धतीची व भारताला महासत्ता बनविण्याच्या इच्छाशक्ती बाळगण्याची. समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू व वाढवू ही क्षमता आपल्यात नक्कीच आहे. भावी काळात हीच क्षमता तरुणाईत वृद्धिंगत होवो व विज्ञान क्षेत्रात भारतासाठी परत ‘नोबेल’ येवो हीच या विज्ञानदिनी सदिच्छा!

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

साखळीचे लांच्छन!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांना अखेर त्या पदावरून काल पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गटाने दाखल केलेला अविश्वास ठराव...