वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता ‘एआय’ची नजर

0
10

1 जुलैपासून 21 ठिकाणचे एआय ट्राफिक सिग्नल्स कार्यान्वित; नियमभंग करणाऱ्यांना दंड आकारणार

राज्यभरात 21 ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ट्राफिक सिग्नल्स बसवले असून, ते येत्या 1 जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे. या यंत्रणेला खात्याने ‘इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ असे नाव दिले आहे. या यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना 1 जुलैपासून स्वयंचलित यंत्रणेद्वारे दंड ठोठावण्यात येणार आहे.
मेरशी, वेर्णे, मडगाव, नुवे, वास्को, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, कुडचडे व म्हापशासह राज्यभरातील 26 ठिकाणच्या जंक्शनवर ही यंत्रणा यापूर्वीच बसवण्यात आलेली असून, ती सध्या प्रयाोगिक तत्त्वावर चालू आहे. मात्र, येत्या 1 जुलैपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ही यंत्रणा चलन देणे सुरू करणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना विविध प्रकारच्या उल्लंघनासाठी 500 रुपयांपासून तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत एवढा दंड ठोठावला जाणार आहे.

ट्राफिक सिग्नल्सचे उल्लंघन करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, सीटबेल्ट न घालणे, गाडी वेगाने चालवणे, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन अशा वाहनांना अडथळा आणणे, बेकायदा पार्किंग, दुचाकीवरून तिघा जणांनी प्रवास करणे, धोकादायकरित्या ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मालवाहू गाडीतून प्रवाशांना नेणे, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणे आदी उल्लंघनासाठी 500 रुपयांपासून 10000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.
वाहन चालवताना मोबाईलचा वापर व धोकादायकरित्या वाहन चालवणे अशी कृती एकापेक्षा जास्तवेळा करणाऱ्या वाहनचालकांना 10000 रुपये एवढा दंड देण्यात येईल. इतर काही प्रकारची वाहने धोकादायकरित्या चालवल्यास 10000 रुपये दंड ठोठावला जाईल. रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या वाहनाला अडथळा आणल्यास 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे.
वाहनचालकांना त्यांच्या वाहनांच्या नोंदणी तपशीलात त्यांचा चालू मोबाईल क्रमांक नोंदवण्याची सूचना वाहतूक खात्याने केली आहे. परिवाहन पोर्टलद्वारे ही माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.