वाहतूक कोंडीची न्यायालयाकडून दखल

0
6

>> पणजी परिसरातील वाहतूक कोंडी प्रकरणी पणजी मनपा, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम खात्यासह संबंधितांना नोटिसा

पणजी शहर व आसपासचा परिसर, तसेच पर्वरी ते बांबोळी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर दररोजच होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल स्वेच्छा दखल घेतली. गोवा खंडपीठाने या प्रकरणी वाहतूक खाते, पर्यटन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, पणजी महानगरपालिका आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड यांना नोटिसा जारी केल्या आहेत. न्यायालयाने या वाहतूक कोंडीची दखल घेतल्याने किमान आता तरी संबंधित सर्व यंत्रणा ही समस्या सोडवण्यासाठी हालचाली करेल, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिक बाळगून आहेत.

पणजी ते मेरशी, पणजी ते पर्वरी आदी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांचे जे हाल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल या प्रकरणी स्वेच्छा दखल घेत संबंधित सर्वांना नोटिसा पाठवल्या.
गेल्या महिन्यापासून या वाहतूक कोंडीच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. एका बाजूने डांबरीकरण आणि दुरुस्तीसाठी अटल सेतू वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने पणजी स्मार्ट सिटीच्या कामासाठी पणजी महानगरपालिकेने पणजी शहरात सगळीकडे खोदकाम केलेले असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून अटल सेतू काही दिवस पूर्णत:, तर काही दिवस अंशत: वाहतुकीसाठी बंद ठेवला जात आहे. परिणामी मडगाव व फोंड्याकडे जाणारी वाहने आणि त्याचबरोबरच पणजी शहरात जाणारी वाहनांना मांडवी नदीवरील अन्य नव्या व जुन्या पुलांचा वापर करावा लागत आहेत. सर्वच वाहने याच पुलांवरून पुढे जात असल्याने अधिक वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सकाळी 9 ते 11, काही वेळा दुपारच्या सत्रात आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत पणजी ते पर्वरी, पर्वरी ते पणजी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बांबोळी ते पणजी या मार्गावरही सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर अटल सेतू पूर्णत: वाहतुकीसाठी खुला करणे हा एकच उपाय असून, तो कधी खुला होतो, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या अटल सेतूवर चाललेल्या दुरुस्ती कामाची गती पाहता आणखी काही दिवस वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

पणजी शहरात देखील सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस हेच वाहतूक कोंडीचे दृश्य पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजी शहरात अनेक कामे एकाचवेळी सुरू करण्यात आली आहेत. त्यात जी-20 च्या बैठका राज्यात होणार असल्याने ही कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे; मात्र त्यात अद्याप म्हणावेसे तसे यश आलेले नाही.

डी. बी. बांदोडकर मार्गावरील रस्ता डांबरीकरण व सुशोभिकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण काही कामे शिल्लक असल्याने अधूनमधून या अचानक वाहतूक वळवली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा प्रत्यय येत आहे. 18 जून रोड, एम. जी. रोड, अन्य अंतर्गत भागातील रस्त्यांवर खोदकाम केलेले असल्याने त्या मार्गांवरही सदान्‌‍कदा वाहतूक कोंडीला वाहनचालक व नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खोदकामामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी देखील जागा मिळत नसल्याने कशाही पद्धतीने अस्ताव्यस्त स्थितीत वाहने उभी जात असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. तसेच याचा फटका पणजीतील दुकानदारांना बसू लागला आहे.

वाहतूक कोंडी अन्‌‍ चिखलच चिखल
सांतिनेज जंक्शन ते काकुलो मॉल या दरम्यानच्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. तसेच या रस्त्यावर येत्या 15 मेपर्यंत एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे, असा आदेश काढण्यात आला आहे. आदेश काढला खरा; मात्र तशा आशयाच्या सूचनेचे कोणतेही फलक या ठिकाणी लावलेले नसल्याने दुहेरी वाहतूक सुरू आहे. तसेच सांडपाणी देखील सध्या रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यातून वाहने सावकाश हाकावी लागत असल्याने वाहतूक संथ होऊन कोंडी होत आहे.

आता तरी प्रशासनाला जाग येईल का?
पणजी शहरातील बहुतांश मार्गांवर हीच शोकांतिका आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी समाधानकारक पावले उचलली जात नसल्याने या साऱ्या प्रकाराची आता उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तरी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागून नागरिक आणि वाहनचालकांची या वाहतूक कोंडीच्या महासंकटातून सुटका करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.