वास्को येथील एका खासगी विद्यालयात बलात्कार झालेल्या ७ वर्षांच्या मुलीच्या वडिलांनी येथील बाल न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आज ७ रोजी आपला निवाडा देणार आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शार्लेट फुर्तादो, वर्ग शिक्षिका दिशा कवठणकर व मुख्य कारकून ब्राझिना गुदिन्हो यांच्याविरुध्द बाल लैंगीक शोषण कायदा २०१२ च्या कलम १६ खाली गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
गुन्हेगाराला संरक्षण दिल्यामुळे वरील कलमाखाली कारवाई व्हावी तसेच पुरावे नष्ट केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या २०१ कलमाखाली मुख्याध्यापिका तसेच इतर संबंधितांविरुध्द गुन्हा नोंद केला जावा अशी मागणी ऍड्. आयरिश रॉड्रिग्स यांनी पीडीत मुलीच्या वडिलांची बाजू मांडताना न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी पीडीत मुलीच्या वडिलांना ५ लाख रु.चा डिमांड ड्राफ्ट देण्याची तयारी दर्शविणार्या मुरगांव पोर्ट ट्रस्टाच्या अधिकार्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना देण्याची मागणीही ऍड्. रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

