नैतिक आधार देण्यासाठी आपण मुलीच्या वडिलांबरोबर चर्चा केल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण सध्या उच्च पातळीवरून हाताळण्यात येत असून निरीक्षक सुनिता सावंत या प्रकरणाच्या प्रमुख आहेत. जनतेला काही माहिती असल्यास त्यांनी सहकार्य करण्याचे करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस तक्रार करायला उशीर झाल्याबद्दल विचारले असता डॉ. मिश्रा म्हणाले की, सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिले असून योग्य दिशेने तपास सुरू आहे. तक्रार द्यायला उशीर झाला असला तरी चौकशीच्या दरम्यान सापडणार्या व्यक्तिंना निश्चितपणे ताब्यात घेण्यात येईल असे ते म्हणाले.
गोव्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने यापुढे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात जबाबदारी घ्यावी लागणार असून शिक्षण खात्यातर्फे त्या पद्धतीने आदेश जारी केलेला आहे. शिक्षण खात्यालाच हे काम करावे लागणार आहे. तपास कामाबद्दल सध्या तरी आपण तूर्त काहीच जास्त बोलू शकत नसल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. यावेळी गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक निळू राऊत देसाई, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई उपस्थित होते. उपअधीक्षक सॅमी तावारीस, निरीक्षक सुनिता सावंत, निरीक्षक सागर एकोस्कर, उपनिरीक्षक रवी देसाई वगैरे अधिकारी सध्या वास्कोमध्येच ठाण मांडून आहेत.
पालकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले
दरम्यान, पालकांच्या एका शिष्टमंडळाने काल सकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वीजमंत्री मिलिंद नाईक, मुलीची आई व महानिरीक्षक डॉ. ओ. पी. मिश्रा उपस्थित होते. यावेळी बोलताना पर्रीकर यांनी तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपीला अटक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलीस खात्यातर्फे दहा स्वातंत्र गट तयार करण्यात आले असून गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून हे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत. मुलीच्या आईने कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता उघडपणे सहकार्य करावे. व्यवस्थापनाने नोकरीतून काढून टाकले तरी त्याची सर्व जबाबदारी शासन द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शाळा बंद करून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पर्रीकर यांनी यावेळी केले. दरम्यान, पाच लाख रुपयांचा धनादेश घेऊन मुलीच्या घरी गेलेल्या व्यवस्थापनाच्या पदाधिकार्यांना मुलीच्या वडिलांनी हाकलून लावल्याचे शेजार्यांनी सांगितले.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
मुरगाव विकास समितीचा संशय
सडा येथील सात वर्षीय मुलीवर शाळेत झालेल्या बलात्कार प्रकरणाला सहा दिवस पूर्ण झाले तरी आरोपीला अटक होत नाही, म्हणजेच हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय असून आरोपीला अटक होईपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा मुरगाव कृती व विकास समितीचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.
राज्यपाल भारत वीर वांछू यांना निवेदन सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदर प्रकरणाला बळी पडलेल्या मुलीला पाठिंबा देण्यासाठी दुसर्या दिवशी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणला जात असून ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मात्र विद्यार्थी व पालकांनी अशा दबावाला बळी न पडता हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा आरोप केल्यासंबंधी बोलताना आमोणकर म्हणाले की, नवी दिल्ली येथील १६ डिसेंबर रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणी गोमंतकीयांमध्ये जागृती करण्यासाठी महिला नेत्या स्मृती इराणी गोव्यात आल्या होत्या. मग सडा येथील प्रकरणानंतर भाजपा नेते गप्प का? असा प्रश्न त्यांना केला. बळी पडलेल्या मुलीच्या घरी भाजपाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते किती वेळा गेले असा प्रश्न करून सर्व राजकीय नेत्यांनी वैयक्तिक मतभेद दूर ठेऊन सदर मुलीला न्याय मिळेपर्यंत संघटीतपणे लढा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदर प्रकरणाचा तपास संथगतीने होत असल्याचा संशय असून केवळ मुख्याध्यापिकेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यादिवशी ड्युटीवर असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान, वर्ग शिक्षिका, आया या सर्वांना ताब्यात घेऊन मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आमोणकर यांनी यावेळी केली. यावेळी सखाराम अमेरकर, सचिन भगत, हिलेरी त्रावासो, गुरुदास तारी, नीळकंठ देसाई, संदेश मेस्ता, मुकुंदी पासी वगैरे उपस्थित होते.
राज्यपालांना निवेदन
त्याआधी मुरगाव कृती आणि विकास समितीच्या शिष्टमंडळाने काल सकाळी राज्यपाल भरत वीर वांछू यांची दोनापावल येथील राजभवनावर भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सदर घटनेच्या तपासाची गती पाहून नाराजी व्यक्त करताना सीआयएसएफचे जवान असतानाही बलात्कार होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राज्यपाल वांछू यांनी सदर प्रकारामुळे आपल्यालाही धक्का बसलेला असून हे प्रकरण जलदगतीने धसास लावण्यासाठी पोलीस प्रमुखांना त्वरित पाचारण करून आवश्यक त्या सूचना करणार असल्याचे सांगितले.

