अद्याप कोणालाही अटक नाही
मायमोळे-वास्को येथील दुहेरी खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची तपास चक्रे वेगाने फिरू लागली असून लवकरच या खुनाचा छडा लागणार असा विश्वास दक्षिण गोव्याचे पोलीस निरीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले.
काल सकाळपासून पोलीस अधिकारी वेगवेगळ्या शक्यतेच्या दृष्टीने तपास करीत असून आतापर्यंत पोलिसांनी गॅस एजन्सीकडे मोर्चा वळवून वास्कोतील सर्व गॅस एजन्सीकडे तसेच गॅस कंपन्यांकडे चौकशी केली आहे. तसेच जखमी सौ. प्रतिमा नाईक यांच्या कुटुंबियांची जबानीही घेतली आहे.शुक्रवारी मायमोळे येथे श्री कामत पॅलेस इमारतीतील डुप्लॅक्स फ्लॅटमध्ये घडलेल्या खुनी हल्ल्यातून सौ. प्रतिमा नाईक वाचल्या. सध्या त्यांच्यावर चिखली येथे खाजगी इस्पितळात उपचार चालू असून त्यांची अद्याप जबानी घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांना गॅस स्टोव दुरुस्तीचेनिमित्त करून दोघेजण मयतांच्या फ्लॅटमध्ये गेले होते अशी माहिती मिळाली आहे. त्यानुसार काल पोलिसांनी वास्को पोलीस स्थानकात सर्व गॅस एजन्सीकडे तसेच गॅस कंपनीकडे चौकशी सुरू केली. तथापी चौकशी अंती गॅस स्टोव्ह किंवा गॅस सिलिंडरच्या तपासासाठी कोणालाच पाठविले नसल्याचे गॅस एजन्सी तसेच कंपनीवाल्यांकडून सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी सौ. प्रतिमा यांच्या बहिणी सौ. पौर्णिमा, सौ. प्रियंका यांची जबानी घेतली. तसेच सौ. प्रतिमाचे वडील कृष्णमूर्ती कदम, श्री कामत पॅलेस मधील रहिवाशांचीही जबानी घेण्याचे काम दिवसभर सुरू होते.
सिद्धार्थ, प्रवीण येणार
ज्या रात्री सदर घटना घडली तेव्हा त्यांच्या शेजार्यांनी आपण रात्री १२.३० वाजेपर्यंत जागे होतो असे सांगितले. तेव्हा कोणतीच गडबड ऐकू आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मयत उषा नाईक यांचे दोन्ही मुलगे विदेशात नोकरीला असून प्रवीण हा फिलिपिन्सला तर सिद्धार्थ कॅरीबीयन देशात आहे. त्या दोघांनाही सदर घटनेची कल्पना दिली असून सिद्धार्थ हा उद्या रविवारी संध्याकाळपर्यंत गोव्यात दाखल होणार आहे. प्रवीण हा सोमवारी गोव्यात पोचणार असल्याची माहिती मिळाली आहे.
चोरट्यांच्या घुसखोरीचे कोडे
खून झालेल्या फ्लॅटमध्ये सदर चोरटे कसे घुसले हे सध्या एक मोठे कोडे आहे. कारण सहजासहजी आत शिरणे कोणालाही शक्य नाही असेच या फ्लॅटच्या बाहेरील असलेल्या लोखंडी ग्रिल्सवरून वाटते. बाहेरून ग्रिल्सचा दरवाजा असून नंतर मुख्य दरवाजा लागतो.
अनेक तर्क-वितर्क
दरम्यान, या खून प्रकरणात अनेक तर्क-वितर्क ऐकू येत आल्याने पोलिसांनी त्या त्या दृष्टीने आपली चक्रे फिरवल्याचे सांगण्यात आले. मयत उषा नाईक यांच्या दोन्ही मुलांच्या आगमनानंतरच सदर चौकशीला वेग येऊ शकेल. धाकटी सून प्रतिमा नाईक यांची जबानी हेच खरे चौकशीचे धागे असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. सध्या प्रतिमा नाईक खाजगी इस्पितळात असून त्यांना पोलीस संरक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाही. त्यांची आई त्यांच्याबरोबर आहे. तसेच त्यांच्या तब्येतीचा अहवाल पोलिसांना डॉक्टरकडून देण्यात आला नसल्याचे पोलीस अधीक्षक प्रभुदेसाई यांनी सांगितले.

